गवळण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गवळण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ७ जानेवारी, २०११

घागर घेऊन निघाली गौळण..

घागर घेऊन, निघाली गौळण.. नजर चोरून, घुंघट ओढून
घुमते मुरली, थिरके पैंजण.. दिसतो त्या तिरी, सावळा साजण

वाट ही अधीर, पावले वेगात.. गुंतला जीव हा, मयूर पंखात
झुळझूळ वार्‍यास, शुक्राच्या तार्‍यास, घेऊन सोबत निघाली गौळण..
घुमते मुरली, थिरके पैंजण.. दिसतो त्या तिरी, सावळा साजण

भिजर्‍या धारांत, निजल्या रानांत, श्रीहरी मनांत, भिनला तनांत
मोहक निळाई, वेढते जीवांस, बेबंद श्वासांस, घालते गुंफ़ण
घुमते मुरली, थिरके पैंजण.. दिसतो त्या तिरी, सावळा साजण

दिसला मुरारी, साठवी दिठीत, विसावे क्षणिक, तयाच्या मिठीत
भिजली तहान, नुरे तीज भान, चरणी तयाच्या, झाली ती अर्पण
घुमते मुरली, थिरके पैंजण.. दिसतो त्या तिरी, सावळा साजण

-प्राजु

सोमवार, ३ जानेवारी, २०११

गोकुळीचा सखा हरी..

गोकुळीचा सखा हरी, राहतो दडून
दही दूध लोण्यासाठी, वाट अडवून

मोरपीस डोलते गं, मोहक मोहक
निळसर मोहनाचे, लाघवी हे रूप
जादूमयी खेळ बाई, गेले मी थकून!
गोकुळीचा सखा...

पावरीचा लावी सूर, मनी हूरहूर
गाई-गुरे गोकुळाचा, नादावला नूर
गारूड गं झाले असे, गेले हरवून
गोकुळीचा सखा..

रंग टाकूनिया कुठे, गेला गं हरीऽ
श्रीरंगाचा थर चढे, गोर्‍या कांतीवरी
सांगू कशी काय कुणा, पुसतील जन
गोकुळीचा सखा..

रास अशी रंगली गं, यमुनेच्या काठी
सोडविता सोडवेना, अंगभर मिठी
जाऊ कशी घरी , दिस गेला गं बुडून..
गोकुळीचा सखा..

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape