मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

श्रावण श्रावण..

पाऊस पाऊस झाले अंगण
रस्त्यावरती लख लख कंकण
टपटपणार्‍या झाडे वेली
हासत गाती श्रावण श्रावण

मल्हाराची धून लाघवी
चैतन्याची लहर जागवी
पाऊस होतो चित्रकार अन
वारा होतो निसर्ग कवी

रंग फ़ेकूनी नभी सावळा
ऊन सरींशी करते चाळा
रंगपंचमी खेळ अवेळी
लाल केशरी निळा जांभळा

सळसळणार्‍या गर्द महाली
लक्ष फ़ुलांच्या गंध गजाली
लोलक चमचम हलते डुलते
रवीकिरणांच्या अल्लड चाली

नको साद वा नकोच अवतण
येऊन भिजवी माझे यौवन
बिलगुन वळणावळणा मधुनी
पाऊस माझा होतो साजण
-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape