मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१२

हसले मीही जगण्यावरती


हसले मीही जगण्यावरती
दुनियेने ठोकरल्यावरती

पेटुन उठले होते अगदी
स्त्रीजन्माच्या खुडण्यावरती

नावापुरत्या उरल्या जखमा
खपली त्यावर धरल्यावरती

कविता गझला सुचू लागल्या
काळिज चरचर जळल्यावरती

तुला हवी मी तशीच घडले
कळले हे मी घडल्यावरती

नकोस ठेवू असा पहारा
अश्रूंच्या ओघळण्यावरती

कशास मानू तुझा दरारा
तुझेच मंदिर लुटल्यावरती?

नकोस शोधू कारण 'प्राजू'
प्रश्नांच्या भिरभिरण्यावरती

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape