सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१२

तू घाल घाव मीही बधणार आज नाही

तू घाल घाव मीही बधणार आज नाही
दैवा तुझ्यात उरली ती धार आज नाही

नेतात चोरुनी बघ, मूर्ती तुझ्या पुरातन
देवा तुलाच उरला आधार आज नाही

झाली दुज्याच घरची लक्ष्मी म्हणून का हो 
मातेघरी मुलीला अधिकार आज नाही? 

बघ थुलथुलीत झाली सत्तेवरील पोटे
बाल्यास मात्र पोषक, आहार आज नाही

जखडून राहिलेल्या, मातीतल्या तणाला
छाटून टाकणारी, तलवार आज नाही

लाटा तुझ्या सयींच्या येतात चालुनी पण
रोखू कशी?? पुरेसे अरमार आज नाही

बदल्यात वेदनेच्या, तू सौख्य वाटलेले
'प्राजू' तुझ्यात उरला, व्यवहार आज नाही

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape