सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१२

काळास तू ही जरा मात दे (कविता)

काळास तू ही जरा मात दे (कविता)

जरा झापडे दूर सारून सारी युगाला नव्या तू अता हाक दे
'जुने तेच सोने' नसे नेहमी जाण काळास तू ही जरा मात दे

मला पाहुनीया तुरे-हार घाला नसावी अपेक्षा कधीही तुझी
मनाने क्वचित मोकळ्या तू दुज्यांना प्रसंगी खुलूनी जरा दाद दे

'असे मी शहाणा', तुझा हाच हेका! स्वभावास औषध नसे पण तरी
जरा सोडुनीया अहंकार आता खुली आणि प्रेमळ पुन्हा साद दे

तुला हात देण्या किती सोबती हे तुला ना समजले कधी का कसे?
जरा एक पाउल पुढे टाक त्यांची जरा साथ घे अन तुझी साथ दे

बदल तू स्वत:ला, झुगारून सारे, जुन्या जोखडातून हो मोकळा
जुनी कात टाकून पोषाख, भाषा नव्यानेच शब्दांस तू घाट दे

असे खूप काही कराया जगी या तुझा कोष टाकून बाहेर ये
फ़ुलूनी खुलूनी जगी या अनोख्या नवे रंग सौंदर्य पंखात दे

तुला आज सारे इथे सांगती की 'प्रवाहासवे तू जरा चाल ना'
असा मी तसा मी इथे मी तिथे मी अशा स्वस्तुतीला जरा छाट दे

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape