बुधवार, २० जून, २०१२

आहेस तू जगी हे दाखव कधी कधी


आहेस तू जगी हे दाखव कधी कधी
दगडास अंतरीच्या जागव कधी कधी

होतो जरा सुखाचा वर्षाव अन पुन्हा
वठल्या मनास होते पालव कधी कधी

नुसत्या हताशतेला गोंजारसी किती?
अंगार अंतरीचा पेटव कधी कधी

का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासती
तूही करून बघ ना आर्जव कधी कधी

स्वप्नांत रंगताना, पडला विसर असा
बघते सहल म्हणुन मी, वास्तव कधी कधी

मी एरवी तशीही, असतेच शांत पण
नसते विचार करती, तांडव कधी कधी!

आतूर मीच होते तुज पाहण्यास का?
आतूरतोस तूही, भासव कधी कधी!

ध्यानात ठेव 'प्राजू' हरलीस तू जरी
जेत्यापरी स्वत:ला वागव कधी कधी

-प्राजु

***************

राखून खास मर्जी, होतोच 'खुश' खुदा
पैलवान भासते मग गाढव कधी कधीPage copy protected against web site content infringement by Copyscape