बुधवार, १४ मार्च, २०१२

कवितेची एक ओळ..

गूढ अंधाराची रात, चांद नाही अंबरात
चांदण्याची बात नाही, दिव्यामध्ये वात नाही
नाही नक्षत्रांचा चुरा.. नाही हळवासा वारा
भीव दाटली दाटली.. कशी मनात गोठली
कवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ

कोणी येईल का दारी.. आस अधांतरी सारी
वाट पाहतो उंबरा.. दीप उजाडेल घरा
पानांमध्ये सळसळ.. खोल उरी खळबळ
मनी भीतीचे तरंग.. उभी चोरुनीया अंग
कवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ

रातकिडे किरकीर.. पाकोळ्यांची भिरभिर
असा जहरी फ़ुत्कार.. हाय काळोखाचा वार
घाला घालतो जिव्हरी, मध्यरातीच्या प्रहरी
कधी होईल पहाट, वेडी पाहतेय वाट
कवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ

मग डोंगरापल्याड.. रवी डोकावला द्वाड
लागलाच हळू हळू.. काळोखही विरघळू
अंधाराच्या उरावर.. लख्ख बांधुनिया घर
एक गिरकी घेऊन, खेळे प्रसन्न हसून
कवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ

उंच फ़िरे आभाळात, हिरव्याश्या हिंदोळ्यात
पायी बांधुनीया चाळ, नाच नाचे लडीवाळ
उरले ने भय काही.. बागडते दिशा दाही
कल्पनांचा गं शृंगार.. सृजनाचा आविष्कार
कवितेची एक ओळ.. कवितेची एक ओळ

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape