बुधवार, १४ मार्च, २०१२

राजा.. शिवछत्रपती झाला....

सह्याद्रीच्या दरीखोर्‍यांतुन ब्रह्मनाद गर्जला
मावळचा हा तेजस छावा, शिवछत्रपती झाला
राजा.. शिवछत्रपती झाला....

प्राचीलाही लगबग झाली धरेवर येण्याची
दहादिशांना किलबिल झाली प्रभातगाण्यांची
पंचमहाभूतांमधुनी उन्मेष ओसंडला
मावळचा हा तेजस छावा, शिवछत्रपती झाला
राजा.. शिवछत्रपती झाला....

बाजी, ताना, गड्यांसवे जे स्वप्न पाहिलेले
जिजाऊ मातेच्या आशिषे तडीस नेलेले
भवानीस त्या स्मरून त्याने शत्रू नि:पातीला
मावळचा हा तेजस छावा, शिवछत्रपती झाला
राजा.. शिवछत्रपती झाला....

सप्तनद्यांचे नीर मस्तकी अभिषेके सांडले
बत्तीसमण-स्वर्णसिंहासन दरबारी मांडले
सुर्याचे जणू तेज घेऊनी राजा विराजला
मावळचा हा तेजस छावा , शिवछत्रपती झाला
राजा.. शिवछत्रपती झाला....

कडे-कपार्‍या सह्याद्रीच्या, निर्झर खळखळते
सागरलाटा, आणि नभातील तारे लखलखते
श्वास रोखूनी जणू थांबले पहावया सोहळा
मावळचा हा तेजस छावा, शिवछत्रपती झाला
राजा.. शिवछत्रपती झाला....

पुलकीत झाली माय मराठी, भगिनी निवांतल्या
प्रसन्न झाली देव-देवळे, मूर्ती निर्धास्तल्या
चिणून गेल्या मनांमधूनी विश्वास हुंकारला
मावळचा हा तेजस छावा, शिछत्रपती झाला..
राजा.. शिवछत्रपती झाला....

ढोल-तुतार्‍या, तोफ़ांचेही पडघम निनादले
संतमहंतांच्या आशिषे स्वराज्य अवतरले
जय भवानी जय शिवाजी जयघोष दुमदुमला
गोब्राह्मणप्रतिपालक राजा, शिवछत्रपती झाला
राजा... शिवछत्रपती झाला....

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape