मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२

त्सुनामी..



सांगू काही कसे कुणा मी जाता जाता
लोकांमध्ये ही बदनामी जाता जाता

माझ्या येण्या जाण्याचे ना कुणास काही
कशास माझ्या ठेउ खुणा मी जाता जाता

सुनी राहिली मैफ़िल माझी काय करावे?
सूरच झाले काय निकामी जाता जाता?

अडसर ठरले तुझ्या जीवनी, नकोच आता!
तुझ्या सुखांना दिली सलामी जाता जाता

पाठीवरचे ओझे संस्कारांचे माझ्या
फ़ेकुन केला आज गुन्हा मी जाता जाता

नको वादळा छेडून 'प्राजू' आणू आता
हृदयामध्ये पुन्हा त्सुनामी जाता जाता

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape