मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२

आभाळ कोसळूनी, झरल्या कितीक धाराआभाळ कोसळूनी, झरल्या कितीक धारा
अश्रूस पापणीचा, ना गावला किनारा

सुकली फ़ुले परंतु, दरवळ कसा न झाला
सन्यस्त होउनी का, गेला निघून वारा??

जपतात बाग येथे, शिंपून औषधाला
जपण्या मना तुला मी, कसला करु फ़वारा?

कैफ़ात वेदनेच्या, झिंगून आज गेले
देवा जरा सुखाचा, देशील का उतारा?

ते कुंडलीत माझ्या बघतात का दशांना
त्यांना न ठाव तेथे, नाही सुखास थारा

आला शिशीर हृदयी, मुक्काम घेउनीया
स्वप्ने गळून जाता, नयनी थिजेल पारा

जन्मावरी कुणाचे का कर्ज राहिलेले?
ना श्वास मोकळा अन अश्रूंवरी पहारा?
-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape