गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

नको कुणाची आता संगत!..

जीर्ण होऊन धागे विरले नाते अपुले गेले खंगत
खरेच आहे! तू हो किंवा नकोस होऊ याला सहमत

आदर करते दुनिया आणिक मान मिळतो येता जाता
तरी उपेक्षा पदरी माझ्या, घरात नाही माझी किंमत!

कसे लपेटू जगण्याला मी संसाराच्या अवती भवती
फ़ाटुन गेल्या आयुष्याचे ठिगळच आता गेले उसवत!

कधी झराव्या श्रावणधारा अन वळवाच्या तुफ़ान गारा!
का जगण्यावर दाटुन बसले मळभ जराही नाही उघडत?

दरी मिटुनी जाईल आणिक मधुमासांचे लाघव येइल
अशी मनाची समजुत काढुन उगा जगावे स्वत:स फ़सवत

निधड्या छातीवरती घेउन वार जरासे परिस्थितीचे
पेलावे शिवधनुष्यास त्या तुझ्यात नाही इतकी हिंमत

भांडुन झाले, सांगुन झाले, 'प्राजू' कसली आशा आता
स्वत: स्वत:चे जगून घे तू, नको कुणाची आता संगत!

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape