रविवार, ४ डिसेंबर, २०११

..झोक पुन्हा!!

नकोच सांगू हसावयाला जोक पुन्हा
हसता हसता रडतिल वेडे लोक पुन्हा

रोजच म्हणसी तरी तुला ना आठवती
संस्काराचे पाढे आता घोक पुन्हा

सुकल्या जखमेमधून कसली भळभळ ही
जुन्याच जागी पडली वाटे खोक पुन्हा

पुन्हा पाहिले मुडदे जेव्हा रुळावरी
सवयीने मग मीही केला शोक पुन्हा

झोळी फ़ाटुन निसटुन सारे क्षण गेले
ठिगळे लावुन कशास बुजवू भोक पुन्हा??

अचाट ओझे पाठीवर संस्कारांचे
कितिदा जाते आणिक येते पोक पुन्हा!!

आता सांभाळावे चढली नशा जरा
आयुष्याचा बघा जायचा झोक पुन्हा!!

प्राजू बुरख्यावाचुन फिरणे नसे इथे
होइल का जगणे इथले निर्धोक पुन्हा
-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape