शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

जीवघेणा खेळ आहे रे तुझी ही प्रेमिका!

प्राण ओतूनी जरी साकारली मी नायिका
शेवटी संपायला आलीच ही एकांकिका

लावले उधळून मी आयुष्य माझे ज्यावरी
'चक्रधारी' तो!! नि ठरले मीच वेडी राधिका!

जाळसी का तू पतंगा प्राण हे वेड्या परी
जीवघेणा खेळ आहे रे तुझी ही प्रेमिका!

बोचरे काटे कुटे, काही सुगंधी ताटवे
वाटते रमणीय मजला जीवनाची वाटिका

स्वप्न काही वेगळे मी पाहिले सुरुवातिला
सत्य सामोरीस आले होऊनी शोकांतिका

हासुनी लपवू नको भेगाळलेली ही कथा
मलुल डोळे सांगती गाऊनिया संगितिका

पाडुनी पडदा अता हे वाद सारे संपवा
घेउनी 'तरही' नवी आता गझल सारे शिका
- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape