शुक्रवार, २९ जुलै, २०११

ए दिल ए नादान..

केव्हातरी अचानक एखाद्या गाण्याची आठवण होते आणि मग ते गाणं इंटरनेटवर शोधून ऐकावंसं वाटतं. आताच्या हायटेक जमान्यात हे करणं सहज शक्यही आहे. त्या गाण्याला ऐकण्याच्या मोहात आपण यूट्यूब, धिंगाणा अशी एखादी साइट उघडतो आणि ते गाणं वाजू लागतं. आपल्याही नकळत आपण त्या गाण्याच्या आधीन होऊन जातो आणि ब्रम्हानंदी टाळी का काय म्हणतात ते होतं.
ए-दिल-ए -नादान.. हे गाणं पहिल्यांदा केव्हा कानावर पडलं आत्ता आठवतही नाही मला. पण या गाण्याची गहराई जेव्हा पहिल्यांदा जाणवली तो प्रसंग मी विसरूच शकणार नाही. साधारण १०-१२ वर्षापूर्वी....तेव्हा मी कॉलेजला होते आणि मी आणि काही मैत्रीणी कुठूनतरी येत होतो. बहुतेक पुण्याहूनच. कोणतीतरी ट्रॅव्हल्सची बस होती. साधारण रात्रीची वेळ होती ८-९ वाजत आले असतील. बसमधले सगळे दिवे बंद होते आणि कोणती तरी एकच खिडकी उघडी होती आणि त्यामुळे अंगाला गार वारा झोंबत होता. आणि बसमधल्या कुणीतरी ट्रांझीस्टर चालू केला आणि त्यावर हे गाणं चालू झालं. त्या अंधार भरल्या बस मध्ये केवळ रस्त्त्यावरच्या दिव्यांचा येणारा जाणारा प्रकाश! चेहर्‍यांवर होणारा प्रकाश -अंधारचा खेळ, त्या एकाच उघड्या असणार्‍या खिडकीतून अंगाला जरासा झोंबून जाणारा वारा.. अर्धे पेंगणारे लोक आणि त्या गूढ वाटणार्‍या बसच्या घरघर आवाजातही स्वत:च्या आवाजाने काळजाला भेगा पाडणारा लताबाईंचा आवाज!! तेव्हा हे गाणं इतकं कसं खोलवर गेलं खरंच नाही समजलं. पण तेव्हापासून या गाण्याने मनांत जे घर केलंय ते कायमचं. काय लिहू या गाण्याबद्दल!!ए दिल-ए-नादान ए दिल-ए-नादान
आरजू क्या हैं, जुस्तजू क्या हैं


कुठेतरी अशाठिकाणी जाऊन बसावं जिथे केवळ मनाशीच संवाद होऊ शकेल. आणि त्या दुनिये मध्ये भरकटलेल्या मनाला, अंजारून गोंजारून विचारावं.. 'बोल रे वेड्या.. माझ्या मना बोल! तुला काय हवंय?? अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी तू इतका झुरतो आहेस?? इतकी सगळी सुख आहेत तुझ्या दाराशी.. मग कशाचा इतका शोध घेतो आहेस? नक्की काय शोधतो आहेस?? बोल रे.. माझ्या मना.. बोल रे!!"
मनाला काय हवंय? हा प्रश्न म्हंटलं तर खूप गहिरा आहे. आणि मन तरी कुठे जाग्यावर असतं हो..! त्याला काही विचारायला, बोलायला.. मन एक जागी थांबायला तर हवं. म्हणून तर बहिणाबाई म्हणतात, 'मन वढाय वढाय.. उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलं हाकलं.. फ़िरी येतं शिरावर' !

हम भटकते हैं, क्यों भटकते हैं दश्त-ओ-सेहरा में
ऐसा लगता हैं, मौज प्यासी हैं अपने दरीया में
कैसी उलझन हैं, क्यों ये उलझन हैं
एक साया सा, रुबरु क्या हैं


मनाशी चालेला संवाद! आपलीच कथा त्याला ऐकवायची. आपली म्हणजे आपली आणि मनाची अशी दोघांची मिळून. कोणाच्या शोधात, कशाच्या शोधात आपण भटकतो अहोत? का भटकतो आहोत? अशी कोणती गोष्ट आहे जी आसपास नाहीये.. की जिच्यासाठी रानावनातून, वाळवंटातून आपण भटकतो आहोत.. काहीच समजत नाहीये. मना.. तू तरी सांग अरे!! मी माझ्या या दुनियेत असूनही का परकी वाटतेय.. ? अथांग सागरातली एखादी लाट तहानेने व्याकुळ व्हावी.. तशी मी आहे? का आहे? सांग रे मना...! काय नेमका गोंधळ होतोय माझा? आणी का होतोय?
कुठेतरी कुणीतरी साद घालतंय का? नक्की कुठून येतेय ही साद? माझ्यासमोर मीच आहे का? की साद घालणारी ती अज्ञात छाया आहे?
एकांती संवाद होताना इतके सगळे प्रश्न पडावेत, मनाच्या गाभार्‍यात कुठेतरी काहीतरी हळूवार हलून जावं. पाण्यावर एखादं पान पडल्यावर जसे तरंग निर्माण होतात तसेच मनावर तरंग उमटावे.. पण उत्तर सापडू नये! काय अवस्था आहे ना!!

क्या कयामत हैं, क्या मुसिबत हैं
कह नहीं सकते, किस का अरमॉं हैं
जिंदगी जैसे खोयी खोयी हैं, हैरान हैरान हैं
ये जमीन चूप हैं, आसमान चूप हैं
फ़िर ये धडकन सी चार सू क्या हैं


नाही मिळाली उत्तरे..! ते प्रश्न वारंवार येऊन दारावर धडका देताहेत पण दार उघडत नाहीये. आणि म्हणून मनाची अवस्था इतकी हळवी झालीये की, उत्तरे नाही मिळाली तर आता प्रलय येईल..संकट येईल.. काहीतरी भयंकर घडेल . काय घडेल.. नाही सांगता येत. नक्की काय हवंय? कोणाची वाट पाहतंय हे मन..? माझं आयुष्य इतकं कुठे हरवून गेलं आहे? का हरवून गेलं आहे? इतकी कसली आस आहे मनाला की ज्याच्यामुळे संपूर्ण आयुष्य हैराण झालंय?? कोण देईल याची उत्तरे? कुठे मिळतील?? कोण सांगेल??
मनाच्या या अवस्थेचं वर्णन करताना जमीन आणि आकाश यांची घेतलेली मदत लाजवाब आहे. 'ये जमिन चूप हैं'.... एक गूढ शांतता. दूर पर्यंत फक्त आणि फक्त जमिनच आहे.. रखरखीत वाळवंटी !! जिथे साद घालावी आणि दूरपर्यंत केवळ आपलाच आवाज जावा पण जिवंतपणाचा काही मागमूसही नसावा. मग पुन्हा 'आसमान चूप है.." पुन्हा तेच! संपूर्ण आकाशात ओळखीचा असा एखादाही रंग नसावा..! या दोन्ही ठिकाणी असलेली शांतता काळजाला घरे पाडते. त्या जमिन आनि आसमानच्या मध्ये एका विचित्र अवस्थेत आपण अडकलोय हे मनाला जाणवतं आणि नकळत अंगावर एक शहारा येतो. आणि आता ही जमिन आणि हे आकाश दोन्हीही शांत आहेत.. चिडीचूप आहेत.. मग ही स्पंदने कोणाच्या हृदयाची आहेत .. मना!!! चहू दिशांतून ऐकू येणारी ही स्पंदने.. काय आहेत? ती माझ्यावर येऊन का आदळताहेत??
मग कुठेतरी मनाला अचानक झोपेतून जाग यावी तशी जाग येते आणि साक्षात्कार होतो प्रेमाचा!! त्या जमिनीचं, त्या आकाशाचं शांत असणं, आपल्याच मनाची छाया आपल्या समोर येऊन उभी राहणं , या सगळ्याच्या तळाशी असलेल्या प्रेमाचा चहू दिशातून येणारा हुंकार ऐकू यायला लागतो. आणि या परमोच्च आनंदासोबतच त्या प्रेमाला असलेली दु:खाची किनारही जाणवते. मनाची तरल अवस्था किती कोमल शब्दांत बांधली आहे पहा!

ए दिल-ए-नादान ऐसी राहोन में कितने कांटे हैं
आरजूओं ने हर किसी दिल को दर्द बांटे हैं
कितने घायल हैं, कितने बिस्मिल हैं
इस खुदाई में एक तू क्या हैं


वेड्या मना! तू खरंच वेडा आहेस! कशाला या प्रेमाच्या वाट्याला गेलास? अरे या वाटेवर असंख्य काटे आहेत. ज्यानी प्रेमाची इच्छा केली.. म्हणजेच ज्यांनी ज्यांनी प्रेम केल त्या सगळ्यांनाच अगणित वेदना मिळाल्या आहेत. अरे, किती दु:ख करून घेशील !! बघ जरा आजूबाजूला बघ...! प्रेमामध्ये घायाळ झालेली, जखमी झालेली, विद्ध झालेली इतकी लोकं आहेत.. !! मग अरे वेड्या... तुझं दु:ख घेऊन काय कुरवाळत बसला आहेस !!
मनाची काढलेली समजूत!! सुरूवातीला पडलेले असंख्य प्रश्न, त्यांची उत्तरं शोधण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा , त्यातून आलेली आगतिकता! मग.. मिळालेलं हे उत्तर!
आपलं प्रेम मिळू शकणार नाही याची झालेली बोचरी जाणिव, आणि मग मनानेच कढलेली मनाची समजूत! एक छोटिशी कथा अगदी कोमल आणि हळव्या शब्दांत बांधलेली.

या गाण्यातल्या नेमक्या कोणत्या बाजूबद्दल लिहू! जान निस्सार अख्तर यांचे शब्द तर लाजवाब आहेतच! पण खय्याम यांचं संगीत ! खरंच असं वाटतं की ते त्या जमिन आणि आसमान ला जाब विचारतंय, उत्तरं मागतंय. आणि या सगळ्याच्यावर.. या शब्दांना, त्या संगिताला न्याय देणारा लताबाईंचा आवाज! 'क्या कयामत है.. क्या मुसिबत है' गाताना टिपेला जाणारा.. तितकाच आर्त.. आणि 'ये जमिन चूप है' गाताना तितकाच हळवा होणारा!
काय काय लिहू! हे गाणं मनावर का कोरलं गेलं असावं याची कारणं शोधली पण मलाही नेहमी वेगवेगळी कारणं मिळाली. सांगितिक दृष्ट्या या गाण्यातली सौंदर्यस्थळं मी नाही दाखवू शकनार. तितकी माझी पोचही नाही. मात्र हे गाणं जसं मला भावलं तसं तुमच्यासमोर ठेआयचा प्रयत्न केला आहे. हे गाणं बनवून जान निस्सार अख्तर, खय्याम साहेब आणि लताबाईंनी जे उपकार केले आहेत.. त्याची थोडीशी परतफ़ेड माझ्याकडून!

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape