मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०

दडपलेल्या पोह्यांची कहाणी..

"आय वॉन्ट येल्लो पोहाज फॉर लंच इन माय टिफिन, दॅट्स ईट!"

पिल्लू इरेला पेटलं होतं. का? तर त्याला डब्यात पोहे हवे होते. इतके दिवस, सकाळी ७.४५ ला केलेले कांदेपोहे/बटाटे पोहे दुपारी १२.२० ला हा खाईपर्यत ते नको इतके गार होणार आणि ते ही सध्याच्या थंडीच्या दिवसांत ते हडकून जातील , नो डाऊट! या विचाराने मी त्याला डब्यात पोहे देणे टाळत होते. पण गेल्या आठवड्यात शाळेतून घरी आल्या आल्या रणशिंग फुंकलं गेलं आणि पोह्यावरून आकाश पाताळ एक झालं! "आय वॉन्ट यल्लो पोहाज.. दॅट्स इट!" पिलू हेका सोडत नव्हत आणि मी उगाचच त्याची समजूत घालायचा प्रयत्न करत होते.. शेवटी मीच पांढरं निशाण दाखवून उद्या टीफीन मध्ये पोहे द्यायचं कबूल केलं..
दुसरे दिवशी बटाटे पोहे केले.. शेंगदाणे घालून केले अगदी! वर बचक भर कोथिंबीरही घातली. वाटलं.. आज दुपारी लेकरू हसत हसत बस मधून उतरेल आणि पोहे छान केले होतेस असं काहिसं म्हणेल. पण कसलं काय.. लेकरू उतरलं तेच धुसफुसत! "आता काय झालं याला?" माझं स्वगत! मग मोठ्याने.." मनू, पोहे आवडले का आज? खाल्लंस का लंच?".. माझा जरा त्याचा मूड ठिक करायचा केविलवाणा प्रयत्न! प्रचंड मोठं आठ्यांचं जाळं कपाळावर आणून 'काय बावळट आहे आपली आई!' या आविर्भावात पिलूने माझ्याकडे पाहिलं..घरी आल्या आल्या पुन्हा मी तोफेच्या तोंडी!! "यल्लो पोहाज, आई..! व्हाय कान्ट यू अंडरस्टॅन्ड? हे पोहाज आशिष ने आणले होते तसे नव्हते." इति पिल्लू. यल्लो पोहाज?? म्हणजे काय आता? माझे तर्क सुरू झाले..पण समजेना हा नक्की काय म्हणतो आहे ते.. आशिष ने आणले होते, म्हणजे आता आशिष च्या आईला जाऊन भेटले पाहिजे.. (माझ्यातल्या सुगरणीला हे चॅलेंज होतं!) कठीण आहे!

मध्ये आठवडाभर असाच गेला.. आणि एकेदिवशी संध्याकाळी मी चहासोबत खायला म्हणून दडपे पोहे केले होते. आणि पिल्लूला ते बाऊल मध्ये दिल्यावर तो एकदम किंचाळला आणि म्हणाला.."येस्स! यल्लो पोहाज!! यू नो आई.. आय वॉज टॉकिंग अबाऊट धिस्स पोहाज.. कॅन यू सेव सम पोहाज फॉर माय टूमॉरोज लंच? " आत्ता डोक्यात प्रकाश पडला हा यल्लो पोहाज म्हणजे दडपे पोह्यांबद्दल बोलत होता आणि मी त्याला कांदेपोहे, बटाटे पोहे देत होते डब्यात!

SDC13385

माझ्या पिल्लूलासुद्धा दडपे पोहे इतके आवडताहेत ही नवी माहिती होती त्यावेळी माझ्यासाठी. याच दडप्यापोह्यांनी एकेकाळी माझ्यावरही असंच गारूड केलं होतं. तिन्हीत्रिकाळ मला दडपे पोहे खायला दिले तरी माझी अजिबात तक्रार नसायची. आणि आता माझं पिलू तीच माझी आवड घेऊन माझ्याशीच भांडत होतं. माझं मलाच हसू आलं!

दडपे पोहे! या पोह्यांच्या सोबतीने अनेक रात्री जागून सब्मिशन्स पूर्ण केली आहेत. याच पोह्यांच्या संगतीने, पन्हाळगडावर झाडाखाली बसून भावंडांसोबत गप्पा ठोकल्या आहेत. याच पोह्यांच्या साक्षीने कित्येक गुपितं शेअर केली आहेत मैत्रीणींसोबत. आणि याच पोह्यांसोबत शालेय दिवसांतल्या रविवारच्या सकाळी चटपटीत केल्या आहेत.
रविवारी सकाळी ७.३० ला सुरू होणारी रंगोली तेव्हापासून सुरू झालेला टिव्ही दुपारी १.०० वाजता छायागीत संपल्यावरच बंद व्हायचा. रंगोली, मग हीमॅन, मिकी अ‍ॅण्ड डॉनल्ड कार्टून शो, मग रामायण्/महाभारत, असे होत होत मग छायागीत! रंगोली झाली की आमची अंघोळी करण्याची घाई सुरू व्हायची. तो पर्यंत आईने स्वयंपाक घरात कांदा, कोथिंबीर, टॉमेटो, मिरच्या, ओला नारळ, तळलेले पापड अशी पोह्यांची तयारी सुरू केलेली असायची. आणि मध्येच केव्हा तरी चुर्रर्रर्र.. आवाज यायचा आणि शिंकाही यायच्या पाठोपाठ, की लक्षात यायचं आईने त्या पोह्यांवर फोडणी ओतली आहे. मग आणखीनच घाईत सगळं आवरून टिव्ही पुढे येऊन बसायचं की आई त्या लाल टोमॅटो, हिरवी कोथिंबीर आणि शेंगदाण्यांनी सजलेल्या, ओल्या नारळाचा स्वाद असलेल्या आणि शेजारी ठेवलेल्या लिंबाच्या फोडीमुळे खट्याळ वाटणार्‍या पिवळ्या धमक पोह्यांच्या प्लेट्स घेऊन बाहेर यायची आणि पाठोपाठ आजी एका तसराळ्यात तळलेले पापड घेऊन यायची. संपलं!!! खाली बसून चवीचवीने एक चमचा पोहे आणि त्यावर पापडाचा तुकडा... !! काय पाहिजे हो दुसरं आणिक!! मग ते रामायण, महाभारत संपेपर्यंत त्या लावलेल्या दडप्या पोह्यांची परात पूर्ण रिकामी व्हायची. आपण पोळी-भाजी जशी खातो तसा माझा भाऊ पापड्-पोहे खातो.. अजूनही!!

जितकी वर्षं फक्त दूरदर्शन वाहिनी होती तितकी वर्ष.. रविवार सकाळचा हा सगळा कार्यक्रम ठरलेला होता. टिव्हीचे चॅनेल्स बदलले, कार्यक्रम बदलले, पण दडपे पोहे नाही बदलले. ती आवडही नाही बदलली. या पोह्याचं रूपडंच इतकं सुंदर असतं.. की ती रंगसंगतीच मनाला भुरळ पाडते. लाल, हिरवा, पिवळा, पांढरा... ! या पोह्यांचे प्रकार तरी किती!!

कांदा-टॉमॅटो, आणि फोडणी घालून केलेले, नुसतच हिरवं वाटण म्हणजे मिरची-कोथिंबीर, आलं, लसूण ओला नारळ वाटून लावलेले पोहे, तूपात तिखट्-मीठ, साखर घालून, लावलेले पोहे.. फोडणीमध्येच दही घालून ती फोडणी पोह्यांवर घालून केलेले पोहे.. चिंचेचा कोळ घालून केलेले कोळाचे पोहे. कित्ती वेगवेगळे प्रकार हे!! सगळे लागणारे सगळे जिन्नस पोह्यात घालून ते कशाखाली तरी दडपून म्हणजेच घट्ट झाकून ठेवायचे.. आणि म्हणून त्याला दडपे पोहे म्हणायचं! पूर्वी पाट्या-वरवंट्यातल्या पाट्या खाली झाकून ठेवायचे म्हणे!

या दडपे पोह्यांची गम्मत अशी की, कोणत्याही पद्धतीने ते केले तरी चांगलेच लागतात. नारळाचं पाणी शिंपून केलेले पोहे.. एखाद्या नऊ वारीतल्या शालीन, घरंदाज स्त्री सारखे वाटतात. कांदा-टॉमेटो, मिरचीची फोडणी घातलेले पोहे एखाद्या नुकत्याच तारूण्यात आलेल्या मुलीप्रमाणे अवखळ वाटतात.. हिरवं वाटण लावून केलेले पोहे हे एखाद्या कोल्हापूरी (मी नव्हे! ;)) झटकेबाज स्त्री सारखे वाटतात. कोळाचे पोहे कोकणातल्या एखाद्या , अनुनासिक मधाळ कोकणीत बोलणार्‍या स्त्रीसारखे वाटतात. ही आपली माझी मतं आहेत.. शेवटी दडपे पोहे ते दडपे पोहेच..!!

माझं बालपण ज्या ज्या खाद्यपदार्थांनी समृद्ध केलं त्यामध्ये दडप्या पोह्यांचा वाटा खूप मोठा आहे. लग्नानंतर सासरी आले ते दडपे पोह्याची माहेरची पद्धत घेऊनच. सासरी आधीपासूनच दडप्या पोह्याची पाककृती प्रचलीत होती.. किसलेलं आलं आणि सैंधव (शेंदेलोण)थोडंसं घालून केलेले हे पोहे आवडून गेले आणि ओलं खोबरं जसं दडप्या पोह्यात मिसळून जावं तशी मी त्या नव्या घरात मिसळून गेले. हळूहळू इकडून तिकडून अशा कमित कमी दहा प्रकारच्या लावलेल्या पोह्यांच्या पाककृती मी मिळवल्या आणि त्यांचे प्रयोग करू लागले. नुकत्यात आवडलेली एक पद्धत म्हणजे गाजर, बटाटा अगदी बारिक चिरून घ्यावा. नेहमीची मिरच्यांची फोडणी करून शेंगदाणे घालावेत, मग गाजर, बटाटा घालावा आणि थोडंसं झाकून ठेवावं. आच मंद ठेवावी.. मग गाजर आणि बटाटा शिजला की त्यात दही घालावं आणि गॅस बंद करावा. आता ही फोडणी पोह्यांवर घालावी आणि मीठ, साखर, ओला नारळ आणि कोथिंबीर आवडीप्रमाणे घालावी. याचं प्रमाण आपल्या तिखट्/गोड्/अळणी खाण्याच्या ऐपतीप्रमाणे ठेवावे. कांदा नाही , टोमॅटो नाही.. त्यामुळे ज्यांच्याकडे तिखटाचा प्रसाद असतो त्यात चालून जातात. मी ही गणपतीच्या दरम्यान अशाच प्रसादामध्ये खाल्ले हे पोहे.

या पोह्यांबद्दल म्हंटलं तर काय लिहायचं आणि म्हंटलं तर बरंच काही लिहिण्यासारखं आहे.. पण तूर्तास इथेच थांबते.

- प्राजु


1 प्रतिसाद:

PG म्हणाले...

आत्ता रात्री १०:३० नंतर हा लेख वाचत आहे. जेवण छान होऊन आता झोपण्याची वेळ आलेली आहे आणि तरीही नुसत्या "दडपे पोहे" शब्दांनी भूक लागली. एके काळी मी यावर संपूर्ण जेवत असे. म्हणजे दडपे असतील तर फक्त तेच खायचे... घशाशी येई पर्यंत !! पापड आणि दडपे मी सुद्धा तुफान चेपायचो बरका !! भन्नाटच लागतं ते ..
अजूनही दडपे पोहे (पण पिवळे नाहीत बरका.. पांढरे) - भरपूर खोबरे, थोडेसे किसलेले आले, खमंग भाजलेले दाणे, कोथिंबीर, लिंबू असे नुसते आठवले तर जीव कासावीस होतो..

Page copy protected against web site content infringement by Copyscape