मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

आभास तू..

मनांत माझ्या फ़ुलून आल्या
रातराणीचा सुवास तू
रंगबिरंगी वसंत फ़ुलांची
ओंजळितली रास तू

क्षणैक खांद्यावरी विसावे
तो असा निश्वास तू
मित्रत्वाच्या नात्यामधला
तो अभंग विश्वास तू

अखंड कोसळणार्‍या झिरमिर
चिंब सरींचा न्यास तू
क्षितिजावरती रंगलेली
सुवर्णाची आरास तू

डोळे मिटूनी तुला पहावे..
भास तू आभास तू
तुझ्याविना मी कसे जगावे
सांग!.. माझा श्वास तू

प्रेमवेड्या या मनाला
लागलेला ध्यास तू..
प्रणयातील उत्कटतेचा
आगळा उल्हास तू

पुढे पुढेच जात रहावे
न संपणारा प्रवास तू
कधी वेंधळा, कधी प्रगल्भ
जन्मोजन्मी हवास तू..

- प्राजु

3 प्रतिसाद:

अनामित म्हणाले...

vaah!

प्रशांत म्हणाले...

>>
अखंड कोसळणार्‍या झिरमिर
चिंब सरींचा न्यास तू
क्षितिजावरती रंगलेली
सुवर्णाची आरास तू
<<
मस्त!

BinaryBandya™ म्हणाले...

far chhaan aahe

Page copy protected against web site content infringement by Copyscape