सोमवार, १२ ऑक्टोबर, २००९

पंख लागले..

पंख लागले आज मनाला हर्षाचे
इवल्या इवल्या आनंदाच्या
मंजुळ मोहक स्पर्शाचे..

रंगले पाऊल मातीच्या या मेंदीमध्ये
तरंगते मी मृदगंधाच्या धुंदीमध्ये
क्षण सारे असेच व्हावे आयुष्याचे
इवल्या इवल्या आनंदाच्या
मंजुळ मोहक स्पर्शाचे..

तळहातावर अलगद घेते ओले मोती
वेलीमध्ये गुंफ़ूनी त्यांना माळुनी कंठी
पुसेन मत मी जळाशयीच्या आरशाचे
इवल्य इवल्या आनंदाच्या
मंजुळ मोहक स्पर्शाचे..

दान दिधले इंद्रधनूचे नील कणांनी
गेली भरूनी झोळी माझी रम्य क्षणांनी
चिंब चिंब मी थेंब झेलते वर्षाचे
इवल्य इवल्या आनंदाच्या
मंजुळ मोहक स्पर्शाचे..

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape