मंगळवार, १६ जून, २००९

अगं अगं बशी..! - (अंतिम)

मैत्रीणींचं नशिब चांगलं .. त्यांच्यामुळे मला बस मिळायची. मी एकटी मैत्रीणींशिवाय उभी असले स्टॉपवर तर आजूबाजूच्या लोकांना माझ्यामुळे बस मिळायची नाही. आमचं वाकडंच ना!! म्हणजेच काय.. तर आम्हा दोन समांतर रेषांना जोडणारी तिसरी रेषा कंपल्सरी हवीच!!

*** *** *** *** *** ***

एकदा कोणीतरी सांगत होतं की, एका मुजोर कंडेक्टरने कुठल्यातरी स्टॉपवर बस खूप वेळ थांबवून ठेवली . लवकर घंटी मारेना.. त्यामुळे इंजिनियरिंगच्या मुलांनी, ती घंटीची दोरी हळूच सोडवून, पुढे पुढे सरकवत ती ओवलेली घंटी बसच्या बाहेर फेकून दिली. .. हे ऐकून तेव्हा खूप हसले होते. आता त्यावर इतकं हसू नाही येत. एका माणसाने कंडेक्टरला ५० पैश्याच्या नाण्यांच्या स्वरूपात १० रूपये दिले आणि ४ तिकिटे मागितली....ते ही गच्च भरलेल्या, ओसंडून वाहणार्‍या बस मध्ये. ते सुट्टे पैसे पाहून कंडेक्टर खवळला ... तर "तुम्हीच नेहमी म्हणता ना सुट्टे द्या सुट्टे द्या..आता घ्या हे सुट्टे" असं उत्तर दिलं.. हा किस्सा ऐकला आणि पुन्हा जोरदार हसू आलं.
आणखी एक, आईकडून ऐकलेला किस्सा .. इचलकरंजीत कोरोचीच्या बस मध्ये एक म्हातारी बाई कसलीशी बुट्टी घेऊन धडपडत धडपडत चढली. कंडेक्टर जवळ आल्यावर तिने त्याच्या हातावर २० पैशाची २ आणि ५ पैशाचं एक असे ४५ पैसे ठेवले आणि म्हणाली, "एक शुगर फॅक्टरी." तो म्हणाला ," आजी हे ४५ चं पैसे हाईत". "व्हय मग ..४५ चं पैसे हाईत!" इति आजी. "अहो आजी, ४५ पैसे हाईत ह्ये.." इति कंडेक्टर. "आरं व्हय..पोरा!! ४५चं पैशे हाईत ते.." इति आजी. "आजी तिकिट ५० पैशे हाय.. ५ पैशे कमी हाईत ह्यात.." इति कंडेक्टर. "माझ्या जवळ त्यवडंचं पैसं हाईत रं.. ! ल्येकरा... पाच पावलं अलिकड थांबिव जरा.. चालल की." इति आजी. बिचारा कंडेक्टर आईकडे बघून म्हणाला, "काय करायचं सांगा आता? घालतो पाच पैशे माझ्या खिशातले.." मला हा किस्सा ऐकल्यानंतर मात्र त्या कंडेक्टर बद्दल आपुलकी वाटली. आणखी एक असाच ऐकलेला किस्सा..इचलकरंजी मध्ये तेव्हा बसचे दोन मार्ग होते. एक होती कोरोची- शिरदवाड आणि दुसरी होति कबनूर-यड्राव सूतगिरणी. राजवाड्यापासून एस्टी स्ट्ण्ड पर्यंत दोन्ही बस एकाच मार्गाने येत मात्र पुढे कबनूरची बस सरळ निघून जाई तर कोरोचीची शिवाजी पुतळ्याला वळसा घालून उजवीकडे वळत असे. एक बाई अशीच जनता बँकेपाशी चढली. आणि बस शिवाजी पुतळ्यापासून कोरोची रस्त्याला लगताच ती जोरजोरात ओरडायला लागली. हात कबनूरच्या दिशेन दाखवत ,"आवं आवं बस थांबवा... मला ह्या रस्त्याला जायचं हाय." कंडेक्टर बसच्या पुढच्या बाजूला होता.. तो तसाच म्हणाला "बस तिकडं जात न्हाय"... असे म्हणून त्याने घंटी मारली .. त्या बाईला उतरता यावे म्हणून. पण ड्रायव्हरने बस रस्त्याच्या कडेला घेईपर्यंत बाईने चालत्या बसमधून खाली उडी टाकली होती आणि रस्त्यावर पडली होती. ड्रायव्हर -कंडेक्टर घाबरले. ते इतर प्रवाश्यांना गयावया करू लागले .." आमची काही चूक नाही.. तुम्ही पाहिलंत सगळ्यांनी . चौकशी झाली तर तुम्ही सगळे सांगाल ना तसं.." अशाप्रकारे ते विनवणी करू लागले. ते विनवणी करत असतनाच ती बाई मात्र कसलंही सोयर-सूतक नसल्याप्रमाणे आपली पिशवी उचलून भराभर मागच्या दिशेने चालू लागली. हे बघून बस मधली इतर लोकं मात्र जोरदार हसू लागली. हे आणि असे किस्से भरपूर ऐकले मात्र असले किस्से कधी माझ्या बाबतीत नाही घडले याची हुरहुर नेहमीच लागून राहिली.

लग्न होऊन पुण्यात आले.. वाटलं इचलकरंजी नाही, कोल्हापूर नाही .. निदान पुण्यात तरी बस आपल्या नशिबात असेल. छे!! कुठचं काय!! एकदा नवरा म्हणाला, "दुपारच्या बसने तू मंडईत ये..(मंडई जवळ त्याचा मामा राहतो) मामाकडे थांब, मी येतो तिथेच ५ वाजे पर्यंत ..मग जाऊ लक्ष्मी रोडवर भटकायला." माझी अवस्था आज प्रीतीला पंख हे लाभले रे.. अशी झाली. अगदी नीट आवरून बस स्टॉपवर आले. संध्याकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत जाणारी प्रत्येक बस माणसांनी उतूच का जात असते.. याचं मला तेव्हा फार आश्चर्य वाटलं. बस येताना दिसली की, थोडासा पावलांना आलेला वेग.. त्या बसमधली हीऽऽऽऽऽ गर्दी पाहीली की आपोआप मंद होत असे. त्यात माझा भरलेल्या बसमध्ये चढण्याचा आणि उरण्याचा असलेला दिर्घ अनुभव!!!!!!!! सगळा आनंदी आनंद्च होता. नवरा वाट बघून घरी आला.. आणि मी मात्र बसची गर्दी बघून दमून गेले होते. लक्ष्मी रोडवर बसने जाण्याचं स्वप्न , स्वप्नंच राहिलं. एकदा, पुन्हा प्रयत्न करावा म्हणून काहीही ठरलेले नसताना बस स्टॉपवर आले. माझ्या सुदैवाने १७४की १७६(आठवत नाही नीट) नंबरची बस आली.. आणि दुर्दैवाने नेमकं त्याच दिवशी त्याच बस वर "पुणे स्टेशन" अशी पाटी लिहिली नव्हती. मी चढले . बस मिळाली.. केव्हढा आनंद!! पण तो ताबडतोब मावळा! .. बसने अलका टॉकीजच्या चौकात न जाता सरळ एफ सी रोडच्या दिशेन रस्ता घेतला आणि धाबं दणाणलं ... आणि खरंच अगं अगं बशी.. मला कुठे नेशी असं म्हणावं वाटलं . पुण्यात नवी होते तेव्हा. कंडक्टर अजून तिकिटासाठी आला नव्हता जवळ. तशीच गर्दीतून वाट काढत त्याच्यापाशी गेले, "ओ, ही बस स्टेशनला जात नाहीये.." निर्विकारपणे तो म्हणाला , "तुम्हाला कोणी सांगितलं जाती म्हणून??".. "पण मला स्टेशनची बस हवीये.."इति मी. तर तो म्हणाला, "ही चिंचवडची आहे.. मनपाला उतरा.. तिथून स्टेशनची बस पकडा.." झालं!! मी उतरले. आता काय करावे?? मामाकडून नवर्‍याला फोन करायचा आणि इथे मी बसने आले.. तू ये इकडे असं सांगून सरप्राईज द्यायचं होतं.. झालं भलतंच काहीतरी. निमूटपणे रिक्षा पकडली आणि घरी आले. नवरा घरी आल्यावर त्याला वृत्तांत कथन केला.. ताबडतोब त्याने त्या आठवड्यात स्कूटी घेऊन दिली.. म्हणाला तुझं बसचं नाटक पुरे आता.

अमेरिकेत आले तेव्हा चकाचक आटो डोर च्या बसमधून फिरताना खूप मजा यायची. नवरा सोबत असला की.. बस नक्की मिळायची. आणि बस टाईम टू टाईम असल्यामुळे इतरांची बस माझ्यामुळे चुकायची भितीही नव्हती. बोस्टनला होतो तोपर्यंत बसने एकटीने फिरायची वेळ आलीच नाही.. त्यामुळे ती बस मिस्स झालीच नाही. पण ज्या कारणासाठी बसने जायचं ते बसमधले किस्सेच इथल्या बशींमधून घडेनात.. हुज्जत घालायला कोणीच नाही. तिकिट तिकिट म्हणत सीटला टेकून उभा राहून, पंच करून तिकिट देणारा, सुट्ट्या पैशाची बॅग खुळ्खुळवणारा, अखंडपणे "चला पुढं चला... चला पुढ चला" असं म्हणणारा.. आणि घंटी मारायला न विसरणार कंडेक्टर.. कुठेच नाही.
बस आली की, खटाक्कन उघडणारे दरवाजे, काळा चष्मा घालून निर्विकारपणे बसलेली ड्रायव्हर आणि समोरच्या मशिनमध्ये पास स्वाईप करा अथवा पैसे टाका.. यात कसलं आलंय थ्रील?? गुळमुळीत प्रकार सगळा.. !! बॉस्टनहून मँचेस्टरला आले. हे तसं लहान गाव. बस फ्रिक्वेंसी तासाला २ बस अशी. बसची वेळ बघून १-२ वेळा निघाले.. मात्र इथेही चुकलीच बस. माझीही आणि माझ्या सोबत असणार्‍या काही फिरंग्यांचीही. मला उगाचच अपराधी वाटलं. मी स्टॉपवर उभी असल्यावर बसने उशिरा येणं समजू शकते मात्र येऊच नये???? ते ही अमेरिकेत?? माझा माझ्यावर आणि त्या बसवर विश्वासच बसेना. माझी बस हिस्ट्री माहित असल्यामुळे इतर लोकांची काळजी वाटून नवर्‍याने इथेही गाडी घेऊन दिली.. बसची भानगड नकोच..

त्यामुळे आता बस दिसली की मी तोंड फिरवते. उगाच नाही ती स्वप्नं कशाला बघा.. आणि अगं अगं बशी असं म्हणत कशाला कुढत बसा?? नाही का?

- प्राजु

3 प्रतिसाद:

भानस म्हणाले...

प्राजू, बसपुराण मस्त जमलयं.लोकांची काळजी वाटून का असेना गाडी मिळाली ना....:)
आजकाल ऒरकुटावर दिसली नाहीस.
भाग्यश्री.

साधक म्हणाले...

झकास आहे तुमचा नवरा. मस्त स्कुटी, अमेरिकेत गेल्यावर कार घेउन देतो ! बेस.

साधक म्हणाले...

एक प्रश्न..
हाच लेख आम्ही मिपा वर वाचला. मिपाचे सदस्य कसे व्हायचे. तात्यांना किती तरी दिवसापूर्वी इमेल केला आहे. अजून अप्रूव्हल आले नाही. २ रिमांईंडर टाकले.
काही सगेस्ट करु शकाल का?

Page copy protected against web site content infringement by Copyscape