मंगळवार, ३० जून, २००९

मृगजळ - १

"आबाऽऽऽऽऽ... लवकर चल!!!!!!!!! माय कशी तरीच करतीया... चल रं.. चल लवकर..." राणीनं गळा काढला.
"ए... सटवे... चल जा इथून. तुज्याशी आणि तुझ्या मायशी काय बी संबंद न्हाय माझा..! **** ची औलाद!!! चल चालती हो..." आबा करवादून म्हणाला. तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत स्वतःच्या मिठीत असलेल्या चंदाला तो आणखीनच बिलगला. त्याला तशा आवस्थेत पाहणे राणीसाठी नविन नव्हते. तिला समजायला लागल्यापासून ती बहुतेक रोज दुपारी म्हणजे ज्यावेळी दारू पिण्यार्‍यांची अड्ड्यावर गर्दी कमी असायची तेव्हा दारूच्या भट्टीच्या मागं असलेल्या एका अडगळीच्या खोलीत, ती हेच दृष्य पहात आली होती. पण आज माय अशी मरणासन्न अवस्थेत असतानाही आबाने येऊ नये तिच्याकडे याचं तिला आश्चर्य वाटलं आणि अपरंपार दु:खही झालं. लहानपणापासून मनांत असंख्य प्रश्न घेऊन राणी वावरत होती. दारूच्या भट्टीला लागून असलेल्या खोलीत ती तिची माय आणि कधीमधी शुद्धीत असलेला आबा असे रहात होते. आबा मायशी कधीच नीट बोलत नसे.. साधारण आठवड्यातून एक्-दोन वेळा मायला मारहाण करणारा आणि कधीतरी रात्री अपरात्री अंधारात मायचं तोंड दाबून तिच्या अंगावर आडवा झोपलेला अंधारातही ओळखू येणारा आबा.. इतकीच आबाची ओळख तिला होती. राणी आठवीला होती. नुकतंच न्हाणं तिला आलं होतं.. त्यामुळे मनांत येणारे हजारो प्रश्न तसेच दाबून टाकत ती तिच्या मायसाठी झटत होती. ......... आबाचा नाद सोडून ती तशीच मायकडे धावली. मायचा श्वास जोरजोरात वाजत होता. दार उघडून भरलेल्या डोळ्यांनी ती मायकडे बघत होती.. आणि त्याक्षणी एक अनामिक भिती तिच्या मनाला चाटून गेली. मायच्या डोळ्यांत तिला मृत्यू दिसत होता.

"माऽऽऽऽय!!!!!!!!! माऽऽऽय.. माय.. माझ्याशी बोल गं.. अगं.. माय.. ए माय.. माय गं!" डोळ्यांचा धारा खळत नव्हत्या.
मायनं अतिशय प्रेमळ आणि स्नेहार्द्र नजरेनं राणीकडं पाहिलं. "राणी... नगं.. अजिबात नको रडू गं." माय तिची समजूत घालत होती. "राणी.... तुला माहित हाय का मला काय झालंय?? तू आता ल्हान न्हाईस.. मला एड्स झालाय. मी न्हाय जगत आता. पण तू सांबाळून र्‍हा पोरी.." इतकं बोलताना सुद्धा मायला त्रास होत होता. हळूच राणीचा आधार घेऊन ती त्या एका फळीच्या पलंगावर कशी बशी भिंतीला टेकून बसली. आपल्यानंतर आपल्या पोरीचं कसं होणार या काळजीनं तिला आंतर्बाह्य पोखरलं होतं. तिच्याकडे पहात असताना तिला आठवली ती इवलीशी राणी.. वयाच्या १४ व्या वर्षी राणीमुळे आलेलं आईपण..स्वतःच स्वतःचं केलेलं बाळंतपण, तळहाता एवढ्या राणीला स्वतःच पुसून स्वच्छ करून कुशीत घेतल्यानंतर आलेली अनुभूती..तिच्या एकेक लिलांनी मायचं प्रफुल्लित होणारं मन.. .............. माय एकटक राणीकडं बघतच राहिली. राणी सुद्धा आता वयात आली होती. राणीकडे पहात असताना तिला जाणवलं की, राणी आता बांधेसूद होते आहे. ठसठशीत होते आहे..तिला जपायला हवंय. असा विचार मनांत येताक्षणी तिला आठवला ४ दिवसापूर्वी चा आबाचा चेहरा. राणीला वखवखणार्‍या नजरेनं न्याहाळनारा आबा... आणि तिला लग्गेच जाणवलं राणीला बाहेरच्या जगापेक्षा घरातच धोका आहे... तिच्या काळजीत आणखीच भर पडली. "काहीतरी करायला हवं.. राणीला इथून बाहेर पाठवायला हवी. आपण आपला जन्म आबासोबत घालवला.. मुस्कटदाबी आणि विर्य यांनंच आपलं आयुष्य भरलेलं होतं.. पण राणी?? तिचं कसं होणार? कोणाच्या भरवश्यावर सोडून जाऊ हिला? इथं गुत्त्त्यावर येणारे सगळेच वखवखलेले.. कोण सांभाळिल राणीला? वेडीला वाटतंय आपला आबा हाय आपल्याला.. पण ह्यो आबाच तिचा वैरी हाय याची जाणिव न्हाय पोरीला.. काय करू???" विचारांचं काहूर माजलं मायच्या मनांत. आणि एकदम बांध फुटल्यासारखी ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिचं रडणं थांबेना. राणी नुसतीच्या पाठीवरून हात फिरवत.. "माय तुला काय बी न्हाय होनार.. काय बी न्हाय.. " असं म्हणत राहिली. खूप वेळ रडल्यानंतर मायला ग्लानी आली आणि ती निपचीप पडून राहिली. राणीनं शेगडीवर भात चढवला आणि माय दूधभात खाईल म्हणून दूध आणण्यासाठी पैसे मागायला ती आबाकडे गेली.. खोलीचं दार लावलेलं होतं आणि आबाच्या उसासण्याचा आवाज येत होता. ती तशीच माघारी फिरली. आबाची तिला अतिशय घृणा वाटली. "असला कसला हा आबा? शाळेतल्या मुलींचे वडील त्यांना शाळेत सोडायला येतात.. आणि आबा एक शब्द बोलत नाही आपल्याशी. बाकीच्या मैत्रीणींचे वडील सुद्धा दारू पितात.. बाया ठेवतात .. पण आपल्या मुलिंची किती काळजी करतात. आणि आबा मात्र आपलं तोंड सुद्धा बघत नाही." या विचारानी तिला पुन्हा रडू आलं.
लहानपणापासून तिनं स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये फक्त दोनच नाती पाहिली होती.. बाप्-मुलगी आणि दुसरे फक्त स्त्री-पुरूष.. मग ते नवरा- बायको असतील नाहीतर आणखी कोणी.. पण ते केवळ शारिरीक संबंधा पुरतेच जवळ आलेले. ती रहात असलेल्या कारवानांच्या वस्तीवर ५० % झोपड्यातून केवळ संभोगाचाच खेळ चालत असायचा याची तिला कल्पना होती. प्रत्येकाच्या १-२ दारूच्या भट्ट्या आणि तितक्याच ठेवलेल्या बाया. माय मात्र कधी कुणाच्या झोपडीत नव्हती गेली. माय राणीसाठी जीवाचं रान करत होती. भाताचं पाणी उतू जावून सूंसूं...आवाज आला तशी राणी भानावर आली. तिने मायकडे पाहिलं माय जागी झाली होती.
"राणी..... !" मायने हाक मारली तशी राणी चटकन उठून माय जवळ गेली. जेमतेम तिशीत असलेली माय आज मरणाच्या दारात उभी होती. आजही ती तितकीच सुंदर दिसत होती. मात्र आजार पणामुळे चेहरा काळवंडला होता.. डोळे खोल गेले होते. 'आपली माय आपल्या आबाला का नाही आवडत?' असा विचार एकदम तिच्या मनांत डोकावून गेला पण चटकन तो तिने झटकून टाकला.
"माऽऽय!.. माऽऽय.. " तिचा आवज कापरा झाला.
"राणी...! तू आता मोठ्ठी झाली गं पोर माझी...! आज तुझ्याशी लई बोलायचं हाय गं पोरी. पोरी... मी जे सांगन ते ऐकून तुला माजी लाज वाटल.. पन तुझी माय तुझ्यासाठी इतकंच करू शकली असं समजून माफी कर बाई मला.. " माय बोलत होती.
"असं काय बोलतीयास माय... असलं वंगाळ नगं बोलू.." राणीला काय बोलावं समजत नव्हतं.
"न्हाय पोरी.. जे सांगते ते नीट ऐक्.. ह्यो आबा.. त्यो तुझा बा न्हाई... मी त्याची घरवाली बी न्हाई.. रखेली हाय. " असं सांगून माय पुन्हा बांध फुटल्यासारखी रडायला लागली..
राणीवर वीज कोसळली होती...
"माऽऽऽऽऽय... .. अगं काय सांगतियास ह्ये?? कोन हाय माझा बा? माऽऽय्..कोन हाय गं माझा बा?" राणीने अकांत मांडला..

Page copy protected against web site content infringement by Copyscape