बुधवार, २५ मार्च, २००९

वक्तृत्वाचे कथन..

प्रमोद काकांच्या कडून प्रेरणा घेऊन..

नमस्कार मंडळी,सगळे जण बालपणीच्या आठवणी सांगताहेत. जुने दिवस सांगताहेत. मग आम्हीही होतोच की लहान.. आम्ही ही बालपण अनुभवलेलं आहेच. भलेही ते व्हेळ्यातल्या दिवसांइतकं थ्रिलिंग नसेल किंवा प्रमोद काकांच्या गीतापठणा इतकं सुरेल आणि खणखणीत नसेल.. पण म्हणून काय आम्ही आमच्या बालपणाच्या आठवणी सांगूच नये की काय्..(पु.लंच्या असामी असामी तल्या "आत्मचरित्र लिहूच नये की काय" च्या चालीत)

असो.. !!! तर मंडळी मी एकदा लहान होते.. म्हणजे लहान होते तेव्हा मी नेहमी शाळा-शाळा खेळताना शिक्षिका असायचे आणि बाकी मित्र मंडळ विद्यार्थी. म्हणजे तसा तो अलिखित्(मीच केलेला) नियमच होता. प्राजक्ता-शिक्षिका आणि बाकी सगळे विद्यार्थी!!! मग मी सगळ्यांना धडे शिकवायचे. पहिला धडा.. दुसरा धडा. आजूबाजूच्या बाया-बापड्या आईला म्हणायच्या ''प्राजक्ता नक्की शिक्षिका किंवा वकिल होणार.." (त्यांना काय माहिती मी रेडीओवर तोंडसुख घेणार आहे मोठेपणी ते!!!!). तसंही आमच्या घरी केवळ वकिलच जन्माला आले होते आज पर्यंत. म्हणजे माझे पणजोबा भालचंद्र गोखले.. उत्तम वकील, माझे आजोबा रामचंद्र गोखले ते ही वकिल ... पणजोबांचे वडिलही त्या काळात दरबरात वकिल होते म्हणे. माझ्या बाबांनी मात्र यामध्ये मोडता घातला आणि गोखल्यांच्या घराण्याला कलंक लावला असं आजोबा म्हणत. म्हणजे बाबांनी बीएस्सी नंतर लॉ लाच प्रवेश घेतला होता.. पण अचानक मुंबईला फिरायला म्हणून काय गेले आणि परत आले ते वीजेटीआयला टेक्टाईल इंजिनियरिंगला ऍडमिशन घेऊनच. त्यामुळे बाबांनी ही वकिलांची प्रथा खंडीत केली. मी त्यांच्यापुढे एक पाऊल.. असो..!!!! तर मूळ विषय असा की, सगळे म्हणत की मी वकिल किंवा शिक्षिका होणार. कारण मी खेळताना जे काही बोलायचे ते इतकं स्पष्ट आणि नीटनेटकं ... की बस्स!! म्हणजे माझ्या आणि माझ्या आईच्या तोंडावर तरी असंच म्हणायचे सगळे.

तिसरीत असताना.. शाळेत एकदा सहज नोटिस फिरली वक्तृत्व स्पर्धेची. आमच्या केतकर बाईंनी ती नोटी फळ्यावर लिहिली आणि वहीत लिहून घ्या ..अशी आज्ञा केली. ती लिहून घेतलेली नोटीस घरी पालकांना दाखवा असेही बजावून सांगितले. मी ती नोटीस लिहून घेतली. घरी आल्यावर माझी सगळी महत्वाची कामं उरकून.. म्हणजे बाहेर खेळणे, बरोबरीच्या मुलांना तंबी देणे, त्यांच्याशी भांडणे.. ही सगळी कामं आटोपून मी घरचा अभ्यास सारख्या फालतू कामासाठी बसले. पूर्ण पणे विसरून गेले की नोटीस आईला दाखवायची आहे. सकाळी उठून शाळेत पुन्हा दाखल. शाळेत बाईंनी सगळ्यांना विचारलं "घरी नोटीस दाखवली का? कोण घेणार आहे वक्तृत्व स्पर्धेत भाग??". लक्षात आलं अरे!! आपण दाखवलंच नाही आईला. बाकी आजूबाजूच्या मुलींमध्ये १-२ जणींनी नावे दिली. मी त्यांना विचारले "भाषण तयार आहे का? आणि कोणत्या विषयावर बोलणार आहात?? " कारण ३ विषय होते १. माझा आवडता सण २. माझा आवडता नेता ३. माझा भारत देश.. मी ठरवले आपणही नाव द्यायचे. मी नाव दिलं. माझी मैत्रिण नंदा म्हणाली ," भाषण आहे का तयार तुझं?? बाईंना द्यायचं आहे वाचायला मधल्या सुट्टीनंतर." झालं!!! आता भाषण कुठून आणणार?? वास्तविक मी त्यादिवशी घरी जाऊन ती नोटीस दाखवून.. भाषण लिहून आणलं असतं तरी चालणार होतं. २ दिवस होते नावं देण्यासाठी. पण मला तितका पेशन्स नको का? मी नाव दिलं... म्हंटलं जेवणाच्या सुट्टीनंतर खेळायला जायचं नाही भाषण लिहून काढू. ठरवल्याप्रमाणे (हो!! ठरव्ल्याप्रमाणेच्....!!गुणी बाळ होते मी ) मी लिहायला बसले. माझा आवडता सण- रंगपंचमी. काय भाषण लिहिलं आठवत नाही.. पण चांगलं वहिची २ पानं भरून खरडलं होतं. मधल्यासुट्टीनंतर बाईंनी सांगितले ,"कोणी कोणी भाषणं लिहून आणली आहेत.. आणा इकडं.." माझ्या त्या मैत्रीणींच्या नाकावर टिच्चून मी माझी वही घेऊन गेले दाखवायला. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर कौतुक मिश्रीत कुतुहलाचे भाव पहायला मी अजिबात विसरले नाही. (सवयच पहिल्यापासून..!!) बाईंनी विचारलं.. "आईने सांगितलं की तू आपापलं लिहिलं?" काही चुकलं की काय या विचारानं मला थोडं ओशाळल्यासारखं झालं. (हसू नका.. !! मीही कधी कधी ओशाळते.) बाई म्हणाल्या ,"चांगलं आहे... घरी आईकडून आणखी थोडं व्यवस्थित करून घे." आपलं चुकलं नहीये या विचारानं .. मस्त वाटलं एकदम.

आता मात्र घरी आल्या आल्या आठवणीने आईला दाखवलं.. आधी ती नोटीस.. आणि मग माझं भाषण. आईने वाचलं.. आणि म्हणाली ,"छान लिहिलं आहेस.एक-दोन सुधारणा करूया. " आईने पुन्हा नीट लिहून दिलं भाषण. ते पाठ केलं. आरशापुढे उभं राहून हात-वारे करत बोलण्याचा सराव केला. हे चालू असताना.. कंटाळा आला की, आई पुस्तक वाचायला बसवायची. पं. नेहरूंच्या गोष्टींचं एक पुस्तक तेव्हा मी वाचायची. .. की पुन्हा भाषण.. मग कुठेतरी बाहेर खेळायला जाणे. मग घरी कोणी आलं की, त्यांना माझं भाषण म्हणून दाखवणे ... या गोष्टी चालू होत्या. अखेर स्पर्धेचा दिवस आला. एकून २०-२२ मुलांनी भाग घेतला होता. माझा ९ वा नंबर होता. शाळेच्याच एका रिकाम्या वर्गात स्पर्धा चालू होती. सगळे स्पर्धकच श्रोते होते.. माझ्या आधीच्या ८ स्पर्धकांपैकी ६ जणांनी माझा आवडता सण आणि उरलेल्या दोघांनी माझा भारत देश यावरच भाषण केलं होतं. माझं नाव पुकारलं ..मी पुढे जाऊन उभी राहिले . परिक्षक असलेल्या बाईंनी विचारलं ,"कोणत्या विषयावर बोलणार आहेस?" काय डोक्यात आलं कोणास ठाऊक पण मी बोलून गेले, " माझा आवडता नेता." भाषण पाठ केलं होतं "माझा आवडता सण"... सरावही केला होता त्या आरशापुढे उभं राहून. आणि आता एकदम नेता.....!!! पण.. मी हाडाची शिक्षिका..(खेळातली का होईना..) होते ना मी. आईने वाचायला लावलेल्या पं. नेहरूंच्या कथांमधल्या दोन कथा.. उभ्या उभ्या सांगून टाकल्या.. आणि त्याला पुस्ती जोडली.. "असे हे पं. जवाहरलाल नेहरू.. त्यांना लहान मुले खूप आवडत म्हणून सगळे त्यांना चाचा नेहरू म्हणत. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.. जय हिंद!!!".. जागेवर येऊन बसले.. आणि इकडे तिकडे पाहिलं. सगळी मुलं आणि इतर शिक्षक माझ्याकडेच बघत होते. ते मला हसताहेत असंच वाटू लागलं. उगाच रडू येऊ लागलं.... सरळ उठून पाणी पिऊन येते असं सांगून बाहेर आले आणि वर्गात गेले. निकाल ऐकण्याची इच्छाही नव्हती. मधल्या सुट्टीपर्यंत गप्प गप्पच होते. कोणाशी विशेष बोलले नाही. मधल्या सुट्टीत जेवणानंतर दगड माती खेळत असताना.. स्पर्धेबद्दल पार विसरून गेले होते. शाळा सुटल्यावर.. रिक्षापर्यंत जाताना ड तुकडीतली एक मुलगी मला म्हणाली ," ए, तूच प्राजक्ता गोखले ना?" मी म्हणाले ,"हो". ती म्हणाली "तुझा दुसरा नंबर आला आहे स्पर्धेत". अतिशय कुसक्या म्हणजे तुसड्या स्वरात "हल्ल्ल" असं म्हणत मी आमच्या रिक्षात जाऊन बसले. तिथे रिक्षात तिसरीतच मात्र ब तुकडीत असलेली स्नेहा मला म्हणाली.."तुझा दुसरा नंबर आला ना? आमच्या बाई होत्या ना परिक्षक म्हणून त्यांनी सांगितलं वर्गात आमच्या." मला नक्की काय बोलावं समज्त नव्हतं..." हो का?? हो... आला दुसरा नंबर.. " असं काहिसं बरळंत.. ट्रान्स मध्ये गेल्यासारख्या आवस्थेतच मी घरी आले. आईला घट्ट मिठी मारून माझा नंबर आल्याचं सांगितलं. आमच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वगैरे काही नाही आले.. पण आनंद नक्कीच झाला होता. त्यातही तयारी एका विषयाची आणि भाषण दुसर्‍याच विषयावर केलं हे जेव्हा सगळ्या शाळेत समजलं तेव्हा तर कौतुकच कौतुक..!

दुसरं भाषण केलं ते प्राथमिक शाळेच्या निरोप समारंभावेळी. म्हणजे चौथीत असताना. तेव्हाही असंच. मैत्रीणींच्या वह्यांमध्ये बघून .. इकडच्या २ ओळी... तिकडच्या २ ओळी असं करत निरोप समारंभाचं माझं भाषण तयार केलं. आईने व्यवस्थित ते कचर्‍यात टाकलं. म्हणाली,"असं इकडचं तिकडचं बघून नाही लिहायचं काही.. आपापलं भाषण लिही.. नाहीतर मि लिहून देते." आइने निरोप समारंभासाठी भाषण लिहून दिलं.. गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णू.. या श्लोकाने सुरूवात होते इतकंच आता आठवतं आहे. भाषण झाल्यावर मात्र तेव्हा खरंच कौतुक करत होते सगळे जण. आमच्या बाईंनी आईला घरी फोन करून माझं कौतुक केलं होतं.

तर अशी ही माझ्या वक्तृत्वाची झूल अंगावर बाळगतच मी हाय्स्कूल ला प्रवेश घेतला. माझ्या १-४ थी पर्यंतच्या अनेक मैत्रीणी माझ्यासोबत होत्या. त्यामुळे त्यांच्यासोबत माझ्या वक्तृत्वाचं कौतुकही आलं होतं माध्यमिक शाळेत. अशीच एकदा नोटिस फिरली.. वक्तृत्व स्पर्धेची. खुला गट होता.. म्हणजे ५ वी ते १० वी. आणि अनेक गंभिर विषयांपैकी मी एक निवडला. आईने भाषण लिहून दिलं. १० मिनिटाचं होतं भाषण. एका मोठ्या आखिव तावाची पाठपोट पाने भरून आणि दुसर्‍या मोठ्या आखिव तावाचे एक पान पाठपोट... इतकं जम्बो भाषण मी पाठ केलं.... स्पर्धेच्या ठिकाणी गेले तेव्हा खुल्या गटात मी एकटीच १० वर्षाची होते. बाकी सगळे ८ वीच्या पुढचे स्पर्धक. तिथे अर्धं अवसान गळून पडलं.. इतक्या मोठ्यांसमोर माझा काय टिकाव लागणार?? माझं नाव पुकारल्यावर जाऊन भाषण केलं.. एकदाच अडखळले.. पण पूर्ण केलं भाषण. माझं भाषण झाल्या झाल्या.. आमच्या शाळेतून माझ्यासोबत आलेल्या शिक्षकांकडे भुणभुण सुरू केली.."चला जाऊया".. बराच वेळ मला थोपवून धरत शेवटी त्यांनी हार पत्करली आणि आम्ही तिथून बाहेर पडलो. सर म्हणाले ,"तुला सोडून मी परत येतो इकडे.." त्यांनी मला सोडलं आणि ते परत गेले स्पर्धेच्या ठिकाणी. संध्याकाळ पर्यंत मी माझे कसले कसले क्लास करून त्या स्पर्धेबद्दल विसरूनही गेले होते. संध्याकाळी ७च्या सुमारास सरांचा फोन आला. मीच घेतला... सर म्हणाले,"तुझा पहिला नंबर आला आहे..".................... तो क्षण मला आभाळ ठेंगणं झालं होतं. दहावीच्या स्पर्धकांमध्ये माझ्यासारखीचा पहिला नंबर!!!!!!!!!!!!!!! खूप खूप आनंद झाला होता. आईला तर माझ्यापेक्षा जास्ती आनंद झाला होता.. कारणमाझं वय होतं १० आणि माझ्या भाषणाचा विषय मात्र एकदम गंभिर होता... एकदम ज्वलंत..! ज्या विषयावर मी भाषण केलं होतं...त्या विषयाचा मला अजून नीटसा अर्थही माहिती नव्हता.... विषय होता.. "हुंडाबळी एक सामाजिक समस्या..!!"

यानंतर मात्र वक्तृत्व , कथाकथन, नाटक, नाट्यवाचन स्पर्धा खूप खूप गाजविल्या हा भाग वेगळा. पण या तीन स्पर्धा मात्र नेहमी लक्षात राहिल्या आणि राहतील.

- प्राजु

1 प्रतिसाद:

Sam म्हणाले...

साधारणपणे च्या क्षेत्रात अंतर्मुख प्रकारच्या (introvert) व्यक्ती आढळतात. वक्तृत्वस्पर्धा गाजवणारी मंडळी blog पासून लांब रहातात. पण आपण blog ही तितकाच चांगला लिहिता. keep it up...

Page copy protected against web site content infringement by Copyscape