गुरुवार, १९ मार्च, २००९

कृष्णमयी..

ऐन त्या दुपारी, कालिंदीच्या तिरी
खेळतो मुरारी, पाठशीव..

हसत खेळत, अल्लड गोपिका
अव्खळ राधिका, कान्हा पाही..

घट डोईवर, चाले भराभर
नदी तीरावर, पाण्यासाठी..

भरूनिया कुंभ, घेता डोईवर
खडा घटावर, ट्णकारला..

भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग
निरखे श्रीरंग, राधिकेला..

चोरून ती उभी, अव्घड ओलेती
सावळ्याची मिठी, अंगभर..

मिटले नयन, सुटला पदर
थरारे अधर, चुंबताना..

म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका
झाली ही राधिका, कृष्णमयी..

पावरीचा सूर, आज दूर दूर
प्रणयाचा पूर, गोकुळात..

- प्राजु

वि. सु. = अव्खळ , अव्घड हे मात्रा सांभाळण्यासाठी लिहिले आहे.

2 प्रतिसाद:

अनामित म्हणाले...

खास जमलीय...
सर्वत्र एक धुन वाटते आहे...छान च..

सानिका चा संदर्भ द्याल का?

क्रांति म्हणाले...

khoop surekh!

Page copy protected against web site content infringement by Copyscape