Sunday, November 23, 2008

रात्र रंग ..

चांदण्यांचे तेज सारे श्यामरंगी रंगले
मोगरीचे चांदणेही भूवरी या गंधले..

शीळ घाली दाट रानी चांदवेडे पाखरू
क्षेम द्यावी चांदण्याला स्वप्न त्याचे भंगले..

सावळेसे होत पाणी बिंब दावी सावळे
काठसोडूनी जळी ते वृक्षही डोकावले..

डोंगरांनी त्या नभाच्या शीर अंकी ठेवले
ते उशाला चांदण्याचा हात घेण्या गुंतले..

पिंपळाचा पार भासे होत बैरागी कुणी
सावळासा भार त्याचा ध्यान त्याचे सावळे..

रानगंधाने जरी ही रात्र सारी दाटली
रातराणी हासली नी गात्र सारे धुंदले..

(क्षेम : मिठी, अंकी : मांडीवर)

- प्राजु

2 प्रतिसाद:

Ganesh Bhute म्हणाले...

beautiful poem, i liked it very much

HAREKRISHNAJI म्हणाले...

great