मंगळवार, ११ नोव्हेंबर, २००८

तासगांवचं घर..

तासगावचं घर :
श्रीकृष्ण सदन, नरगुंदे बोळ, २ नं. शाळेसमोर, मेन रोड, तासगांव. असा पत्रिय पत्ता. तासगावात विचारायचे झाल्यास गोखले वकिलांचा वाडा. अस जर कोणाला विचारलं तर डोळे झाकून आणून सोडतील.
नरगुंदे बोळात मोठा दरवाजा त्यातल्याच एका दाराला छोटा दिंडी दरवाजा.. दरवाजातून आत गेलं की, उजव्या बाजूला रिकामा गोठा, डाव्याबाजूला एका ओळीत बिर्‍हाड करूंच्या खोल्या. मला आठवणारे बिर्‍हाड्करू म्हणजे माणगांवकर शिक्षक आणि एक कोणितरी नर्स . पुढे गेलं की, मोठ्ठ अंगण .. अंगणाच्या डाव्या बाजूला माडीवर जाण्यासाठी केलेला लाकडी जीना. बरोबर समोर.. सारवलेलं अंगण आणि जुन्या पद्धतीचं घराचं दार.. आत गेलं की, मोठी पडवी, मग मोठ्ठ सोपा.. सोप्याच्या एका बाजूला भला मोठा आजोबांचा दिवाण, दुसर्‍या बाजूला मोठा कडिपाटाचा झोपाळा. एक एकावर एक ५ मोठे कप्पे असलेलं कपाट.. एक टेबल, ब्लॅक एन्ड व्हाईट टिव्ही. कोनाड्यात श्रीकृष्णाची मूर्ती. कोनाड्याच्या चौकटीला रंगित मोत्यांचं तोरण. दुसर्‍या कोनाड्यात आजोबांच्या फ़ाईली. तिसर्‍या कोनाड्यात पितळी फ़ुलदाणी ज्यात कधीहीफ़ुलं ठेवली नाहीत. माजघरात जाण्याचा दरवाजा. त्या दरवाजातून आत जाताना त्या ६ फ़ुटी रूंद भिंतीत काढलेला पोट माळ्यावर जाणारा जीना. माजघारात एका बाजूला वापरात नसलेली मातीची चूल, नव्याने बांधलेला ओटा आणि तरीही खाली बसून स्वैपाक करण्यासाठी खाली ठेवलेला गॅस सिलेंडर आणि शेगडी.त्याच्या बाजूला पाट. आणि त्या पाटावर बसलेली नऊ वारीतलि माझी आजी.
माजघराच्या डाव्याबाजूला कोठीची खोली. त्या खोलीत एक भक्कम जुन्या पद्धतीची शिडि पोटमाळ्यावर जाण्यासाठी लावलेली. एक अंधारि खोली. ती पूर्वी बाळंतिणीची खोली असे आणि मग नंतर आम्हा नातवंडांना भिती दाखवण्यासाठी तिचा उपयोग न चुकता होत होता.माजघरा बाहेरच्या बाजूला एक चिंचोळा बोळ होता. तिथून वाड्याच्या मागच्या बाजूला जाता येत असे. तिथे राहणारे बिर्‍हाडकरू म्हणजे काकडे टेलर, विसापूरे .. आणखी कोणीतरी होतं. नीट आठवत नाही आडनाव. तिथे या बिर्‍हाड करूंच्या खोल्यांच्या समोर भलं मोठं चिंचेचं झाड आणि त्या झाडखाली ओळीने बांधलेले ५-६ संडास. वाड्याचा कुंपणाच्या भिंतीत काढलेले दोन नळ. आणि त्यातून सतत ठिबकणारं पाणी.वरती असणार्‍या खोल्यांमध्ये बॅचलर रहात असत भाड्याने.तासगावला माझे आजीआजोबा या वाड्यात रहात असत.
माझ्या बाबांचं लहानपण याच वाड्यात गेलं. माझे पणजोबा ज्यांना अख्ख तासगांव आप्पा म्हणत असे ते स्वतः वकिल होते शिवाय पैलवानही होते. गोखल्यांचं तिथे तासगांवात मोठं कापडाचं दुकान होतं. पणजोबांबद्दल खूप ऐकायला मिळायचं. पण जेव्हा जेव्हा तासगांवला जाणं व्हायचं अर्थातच सुट्टीमध्ये.. तेव्हा तेव्हा मला नेहमीच त्या घराबद्दल एक अनामिक ओढ वाटायची. असं नाही की, मी त्या घरात खूप वर्षं राहिले होते.. पण तरिही त्याठिकाणी गेलं की, त्या घराच्या प्रत्येक खोल्यातून डोकावून यावं असं वाटायचं.
तासगाव तेव्हा तालुका ठिकाण असलं तरी मी रहात असलेल्या इचलकरंजी- कोल्हापूर या शहरांपेक्षा मागासलेलंच होतं. पाण्याची सतत बोंब. रूक्ष भाग. गणपतीला, दिवाळिमध्ये आणि मे महिन्याच्या सुट्टीत आमचं तासगांवला जाणं व्हायचं. अंगणातल्या नळावरून तेव्हा पाणी भरून आणणं यात जबरदस्त थ्रील वाटत होतं. आजीने मला पेलवेल इतक्या आकारची कळशी आणली होती.. त्यामुळे ती छोटी कळशी घेऊन "अगदी घट डोईवर.. घट कमरेवर" श्टाईल मध्ये मी पाणी आणत असे आणि कळ्शी माजघरातल्या पिंपात ओतून हुश्श असा सुस्काराही टाकत असे...
तासगांवात आणखी एक धमाल असायची ती म्हणजे, सकाळी सकाळी पाणी आलेलं असायचं ... सगळी बच्चे कंपनी दात घासत अंगणात उभी असायची आणि घराच्या वरती पत्र्यांवर, कौलांवर माकडं असायची. खरंच सांगते मंडळी, रोज ही माकडं यायची. ती रोज कशी यायची ?? फक्त आमच्याच भागांत यायची.. की सगळ्या तासगांवात यायची?? बरं.. सकाळिच का यायची ? दुपारी, संध्याकाळी का नाही यायची?? हे असले प्रश्न मला रोज पडायचे. पण कधी त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न नाही केला. माकडं आली की, शेतातून आलेल्या भुईमूगाच्या शेंगाच्या पोत्यातल्या शेंगा हळूहळू एका शिप्तरातून बाहेर यायच्या.. आणि तासाभराने जर अंगणात फेरफटका मारला तर आजोबा खराटा घेऊन शेंगाची फोलपटं लोटताना दिसायचे. माकडांना शेंगा देण्यासाठी केलेला आरडाओरडा.. दंगा.. पूर्ण वाडा दणाणून निघायचा. सकाळी दूध आणायला जाणं यासाठी भावंडांमध्ये मारामारी.. कारण बाबर डेअरी घराजवळ होती आणि तो बाबर त्याच्या त्या मोठ्या किटलीतलं दूध मापट्याने मोजून आपण नेलेल्या किटलित कसा घालतो ते पहाणं. त्याच्या हाताची होणारि सफाईदार हालचाल आणि थोडं ही दूध न सांडता नाजूक धार धरत .. आपण नेलेल्या किटलीच्या चिंचोळ्या तोंडातून दूध ओतणं.. जबरदस्त वाटायचं. दूध घेऊन आलं की, समोर आजोबांनी शेंगाची फोलं पेटवलेली असायची त्याचा तो.. धुरकट वास सकाळी छान वाटायचा. इतक्यात कोणी आत्या आतून आवाज द्यायची "चला चहाला........!". मग आणलेल्या ताज्या दूधाचा तो चहा...! आम्हाला एरवी दूधच प्यायला लागायचं.. त्यामुळे चहाची ऐश फक्त तासगावला आल्यावरच. इथे आई-बाबाही काही बोलायचे नाहीत. चहा पिऊ द्यायचे. मजा असायची.आजोबांनी तो पर्यंत तांब्याच्या बंबात लाकडं घालून पाणी ठेवलेलं असायचं.. आजोबा सगळ्यांना अंघोळ करून घ्या म्हणून मागं लागायचे पण कधीही दुपारी १२.०० च्या आत आम्ही अंघोळ नाही केली. आजीने / आईने/ आत्याने ... केलेला मऊ आटवल भात खायचा आणि मग आम्ही विहिरिच्या बाजूला खेळायला जायचो. तिथली माती घेऊन त्याची बोळकी बनवणे, ती माती चाळण्यासाठी माजघरातून आजीचं लक्ष चुकवून पीठ चाळायची चाळण आणणे ..मग ती माती चाळणे. मग ओरडून घेणे.. आम्ही विहिरीजवळ खेळतो म्हणून आजोबा रागावायचे. पण आम्ही ऐकत नाही हे पाहून त्यांनी त्या विहिरिवर एक तारांची जाळी टाकून विहिर बंद केली.
एकदा दुपारची जेवणं आटोपून आजोबा मला कोर्ट आणि जेल दाखवायला घेऊन गेले होते. आजोबा तेव्हा रिटायर्ड झाले होते. पण.. तिथे गेल्यावर भेटणारा प्रत्येक जण आजोबांना विचारत होता, " काय म्हणताय वकिलसाहेब?? ही कोण नात वाटतं?? " आजोबा म्हणत "हो नात. कोर्ट दाखवायला घेऊन आलो आहे". की पुन्हा, " हो का?? छान छान. नाव काय तुझं बाळ?".. मी "प्राजक्ता" असं थाटात उत्तर दिलं की, " छान छान.. गोड आहेस हं.. येऊ का वकिलसाहेब??" असं म्हणून तो निघून जायचा. मला चिक्कार अभिमान वाटला होता तेव्हा.. म्हणजे माझ्या आजोबांना इतका मान आहे म्हणून की, येणारा जाणार प्रत्येकजण माझीही चौकशी करत होता आणि "गोड आहेस" म्हणत होता म्हणून .. ते नक्की नाही सांगता येणार. पण त्यावेळी आपण कोणीतरी सिलेब्रीटी असल्याचं फिल मात्र नक्की आलं होतं.
दुपारी कित्येक वेळा आजोबा अंगणात शेकोटी करायचे आणि त्यावर शेंगा, कणसं भाजून द्यायचे. उन्हाळ्यात आजी नाचणीची आंबिल करायची. तेव्हा फारशी आवडायची नाही पण तरिही प्यायचो आम्ही. तासगावच्या बाहेर एक दत्ताचा माळ म्हणून एक टेकडी वजा माळ आहे. थोडं चढायला लागतं.. बाबा, माझा काका आणि आम्ही भावंडं तिथे जायचो. बाबांना तो माळ त्यांच्या लहानपणी खूप आवडायचा असं बाबा म्हणतात. तिथे जाऊन भरपूर भटकून, बरोबर नेलेले चुरमुरे, खारे शेंगदाणे.. फरसाण यांचा फन्ना उडवून आम्ही परत यायचो.एकदा संध्याकाळी आजी खाली बसून पोळ्या करत होती. होतील तशा शेजारच्या वेताच्या लहान बुट्टीत टाकत होती. मी गरम पोळी खात होते.. इतक्यात मला आजीने नुकतीच बुट्टीत टाकलेली पोळी बुट्टीतून खाली सरकून कोठीच्या खोलीकडे पळत जाताना दिसली. मी ओरडले "आजी........... ते बघ!!" आजीने ते पाहून आजोबांना आणि बाबांना हाक मारली. आणि मग पोळी पळवणार्‍या त्या उंदराला.. त्या भल्या मोठ्या कपाटाखालून पोळीसकट बाहेर काढे पर्यंत रात्रिची जेवणाची वेळ टळून गेली होती.
तासगावला तसं राहणं खूप कधीच नाही झालं पण त्या घराने मला विलक्षण ओढ लावली.
गणपतीमध्ये ऋषिपंचमीला रथोत्सव असतो. तासगावच्या मंदिरातील गणपतीला.. हरीहरेश्वराच्या भेटीला रथातून ओढत गावकरी मंडळी घेऊन जातात. आणि संध्याकाळी परत घेऊन येतात. ही प्रथा गेले कित्येक वर्ष चालू आहे. दरवर्षी गणपतीत रथाला जायचं हा नेम ठरलेला. रथाला १०१ नारळांचं तोरण बांधायचं. आजोबा तासगावात होते तो पर्यन्त वरचेवर तासगावला जाणं व्हायचं. शेवट्ची १० वर्ष आजी- आजोबां कोल्हापूरलाच होते. आज आजोबांना जाऊनही १० वर्ष झाली. पण हा नेम नाही चुकवला गेला कधी.
तासगावच्या त्या घरात जसं मी म्हंटलं माझं रहाणं असं खूप नाही झालं तरीही खूप छोट्या छोट्या आठवणी साचून राहिल्या आहेत. त्यातलीच एक......सोप्यावर असलेल्या त्या झोपाळ्यावर खेळताना.. तिथे मातीतल्या भिंतीत एकदा मी हातातल्या न उठणार्‍या पेन ने एका ओळीत "प्राजक्ता, प्रज्ञा (चुलत बहिण), विक्रांत (भाऊ), वैभव्(चुलत भाऊ).. " अशी नावं कोरली होती. त्यादिवशी बाबा मला खूप रागवले होते. पण आजोबा बाबांना म्हणाले होते, " नंदू, अरे तिचं अक्षर किती सुरेख आहे ते तरी बघ!" ..
आजोबा गेले.....घर पोरकं झालं. भाडेकरू होते. वर्षातून - दोन वर्षातून एकदा संपूर्ण म्हणजे सगळ्या भाडेकरूंची मिळून भाड्याची रक्कम रूपये १५००.. आम्हाला मिळू लागली. पण आजोबांच्या माघारी ते घरही घटका मोजू लागलं होतं. दुकानाची जागा आजोबा हयात असतानाच विकली होती. कधी गणपतीला म्हणून गेलो तर भाडेकरू सांगायचे.. कौल फुट्लं.. भिंत घुशीने पोखरली.. एका बाजूने दरवाजा मोडला. त्या घराच्या मरंमतीसाठी खूप खर्च करूनही ते घर साथ देइना. भाडेकरूही आता नव्या नव्या ठिकाणी रहायला गेले होते. वाडा विकायचा ठरलं. .. पोटात कालवाकालव झाली. काही सुचेना. आणि अचानक एकेदिवशी समजलं.. एका डॉक्टरने त्याच्या हॉस्पिटलसाठी ती जागा घेतली. त्यातलं असलेलं नसलेलं सामान बाहेर काढण्यासाठी मी ही हट्टाने गेले तासगावला. एकेक जुनी ट्रंक, पिंपं, बंब.. बाहेर आणून ठेवत होती सगळीजण. जेव्हा झोपाळा काढायची वेळ आली.. तेव्हा ती भिंतीवरची लिहिलेली नावं बघून.... माझा श्वास कोंडला आणि इतका वेळ धरून ठेवलेला बांध फुटला. ...... किती वेळ मी नुसतीच रडत होते..
त्यानंतर खूप वर्षानी मी तासगावला गणपतीमध्ये गेले... सहज म्हणून "श्रीकृष्ण सदन, नरगुंदे बोळ, २ नं शाळेसमोर, मेन रोड, तासगांव" या पत्त्यावर गेले... भलं मोठं हॉस्पिटल.. शुभ्र पांढर्‍या रंगात.. आणि दिंडी दरवाज्याच्या जागी एक प्रशस्त मोठा कोरीव काम केलेली लाकडी चौकटी असलेला काचेचा दरवाजा पाहिला.... त्या स्पिरिटच्या घमघमाटात माझ्या आजोबांनी पेटवेल्या शेंगाच्या फोलांचा धुरकट वास कुठे हरवला होता??

(मी खूप वेळा माझ्या या तासगावच्या घराला माझ्या स्वप्नात पाहिलं आहे.. मला ही स्वप्न स्वस्थ बसू देत नाहीत. म्हणून हा खटाटोप केला. माझ्या या भावना अनेक जणांनी आधीच कुणीतरी लिहिलेल्या वाचल्या असतील. पण आज एका बैठकीत हे लिहिल्या नंतर मला जे समाधान मिळालं आहे.. ते कुठेच नाही मिळणार)
- प्राजु

2 प्रतिसाद:

Pradip Ankush Pawar म्हणाले...

Khup aavadala post, aani tyapekshya tumache aata na rahilela Tasgao ch Ghar.
Ugichach hurhur lagun rahili 2 min.

Anand Ghare म्हणाले...

छान लेख. वाचतांना मला आमच्या जमखंडीच्या वाड्याची सारखी आठवण येत होती. सोप्यातला कडीपाटाचा झोपाळा, पत्र्यावरची माकडे, तांब्याचा बंब . . . सगळं अगदी तस्संच होतं. मी तर माझे स्वतःचेच बालपण त्या वास्तूत घालवलेले.

Page copy protected against web site content infringement by Copyscape