सोमवार, ८ सप्टेंबर, २००८

हू एम आय!

"चांगला धुतला त्या शोएब ला धोनी ने" असे उद्गार बर्‍याच वेळेला ऐकायला वाचायला मिळतात. इथे हे उद्गार एक भारतीय एका पकिस्तानी बद्दल बोलत असतो. कित्येक वेळेला सहज गप्पांमधून जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सिमा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान बद्दल वाईटच बोललं जातं. पाकिस्तानातून होणारि घुसखोरी, मुशरर्फ सरकारचा ओसामाबीन लादेन ला असणारा पाठींबा, दाऊद इब्राहिम ला पाकिस्तानात राहण्यासाठी आश्रय देण्याच्या बातम्या यांनी भारतीय मनात पाकिस्ताना बद्दल एक अढी निर्माण झाली आहे. भारतीय सामान्य जनता ही पाक सामान्य जनतेचा विलक्षण तिरस्कार करते. त्यामुळे भारत - पाकिस्तान क्रिकेट मॅच ला सुद्धा एखाद्या युद्धाचा दर्जा प्राप्त होतो आणि सगळे व्यवहार थांबवून लोक ही मॅच पहात बसतात. या मॅच मध्ये जर भारताने डाव जिंकला तर जितका जल्लोष होतो तितका जल्लोष जगतज्येत्या ऑस्ट्रेलियन संघाविरूद्धा मॅच जिंकल्यावरही होत नसेल. या द्वेषाची मुळं फाळणी मधून आढळतात. फाळणीच्या वेळी झालेली जाळपोळ, पाडलेल्या कत्तली.. स्त्रियांचि झालेली विवंचना. असं म्हणतात की, लाहोर वरून ३ रेल्वे गाड्या भरून हिंदू लोकांची प्रेतं पाठवली. आणि जेव्हा तशीच एक गाडी जेव्हा अमृतसरहून लाहोर ला गेली तेव्हा हा प्रकार थांबला. मला त्या विषयाबद्दल सध्या काहीच बोलायचं नाही. पण आताचा भारतीय नागरीक आताच्या पाकिस्तानी नागरीकाशी जवळीक साधू शकेल का? याचं उत्तर अर्थातच ५०%-५०% आहे.भारत- पाकिस्तान संबंध सुधारावेत म्हणून आजपर्यंत जे काही प्रयत्न झाले त्यातलाच एक प्रयत्न होता भारत - पाक क्रिकेट मॅच चा. त्यावेळी पेपरमधून दिलिप वेंगसरकर, सुनिल गावस्कर, संदिप पाटील यांसरख्या ज्येष्ठ खेळाडूं ना पाकिस्तानात आलेले अनुभव वाचयला मिळाले. आणि जे वाचले त्यातले ९०% चांगले अनुभव होते. आणि ते वाचून खूप बरं वाटलं होतं. भारतात पुण्यासारख्या शहरात रहात असताना, काही बांगलादेशी विना परवाना रहात होते, तसेच एका प्रतिष्ठीत शिक्षण संस्थेतला एक चांगला शिक्षक हा एका कुप्रसिद्ध अतिरेकी संघटनेचा कार्यकर्ता होता .. या अशा बातम्या वाचताना पाकिस्तान किंवा बांग्लादेश यांच्याविरूद्ध मनात एक अढी निर्माण झाली. माझ्याच काय पण ८५% भारतीयांच्या मनांत अशिच अढी असणार याची खात्री आहे. पण जेव्हा तुम्ही सीमा ओलांडता तेव्हा...??मी भारत सोडून अमेरिकेत आले ती ही अशी अढी मनांत ठेवूनच. कर्मधर्म संयोगाने जिथे जिथे राहिले तिथे मराठी, गुजराथी, आणि दक्षिण भारतीय लोक आजूबजूला होते. त्यामुळे भारतातल्याच एका गावात आल्यासारखे वाटत होते. एशियन ग्रोसरि स्टोअर्स मधून जेव्हा किराणा भुसार सामान आणायला जायचो तेव्हा तिथे पाकिस्तानी उत्पादनेही असायची पण चुकुनसुद्धा कधी पाकिस्तानी पदार्थाला हात लावला नाही. का?? मानसिकता. पण जसजशी इथे रूळले .. ओळखी वाढल्या तसतसा या माझ्या विचारांमधला फोलपणा लक्षात आला. कारण इथे 'इंडियन' या बिरूदावली सोबतच तुमची आयडेंटीटी असते "ऍन एशियन'! मग त्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, चायना, मलेशिया, कोरिया .. हे आणि संपूर्ण आशिया खंडातले देश समाविष्ट होतात. त्यातही भारत - पाकिस्तान आणि बांग्लादेशी त्यातल्या त्यात जवळचे त्यामुळे एकमेकाशी अतिशय जवळीकीने वागतात.याचा प्रत्यत मला २-३ वेळा आला. मुलांना खेळण्यासाठी बनवलेल्या प्ले एरिया मधे जेव्हा एखादी आपल्यासारखी स्त्री भेटते , ती तिच्या मुलीला खेळायला घेऊन आलेली असते. माझ्या मुलाशी तिची मुलगी अतिशय छान खेळत असते. मी आणि ती अगदी आनंदाने दोघांचा खेळ पहात असतो. आम्हाला एकमेकीची नावही माहिती नसतात. पण हळू हळू संभाषण वाढतं . ती विचारते की, "आप कहॉ से हो?" मी सांगते "पूना, महराष्ट्रा". मी तिला विचारते, 'और आप??" अपेक्षा असते तिने हैदराबाद किंवा लखनौ असे काही सांगवे कारण तिचे नाव "रझिया" असते आणि तिच्या मुलिचे " अल्मास". पण ती अचानक सांगते, " लाहोर से ." मी एकदम तिच्याकडे पहाते आणि विचारते, "पाकिस्तान से हो?" असे विचारताक्षणी तिचा चेहरा थोडासा उतरलेला मला जाणवतो. का?? ती पाकिस्तानी असल्याचे मला समजताच मी तिच्याशी निट बोलणार नाही असे तिला वाटले असावे का?? किंवा कदाचित आजपर्यंत पाकिस्तान ने दहशत वादाला खतपाणी घालण्याची चोख बजावलेली भूमिका या पाकिस्तानी लोकांना अपराधी भाव देऊन जाते का? किंवा पाक मधून होणारी घुसखोरी जी भारतीय लष्कर हाणून पाडते आहे.. ती तर कारणीभूत नसेल?? मी विचार करत असतानाच ती मला विचारते, 'क्यों.. क्या हुआ??" आणि माझ्या मनांत चाललेल्या विचारांची झळ तिच्यापर्यंत पोहोचली या विचाराने माझी मलाच लाज वाटते. कारण ती पाकिस्तानी आहे हे समजे पर्यंत तिच्याशी अनेक विषयांवर माझ्या गप्पा झालेल्या असतात. इतक्या की ,गोर्‍या लोकांची मुलं आपल्या मुलांपेक्षा जाडजूड असतात.. कारण त्या बायका आपल्यासारख्या भात- दाल- भाज्या- रोटी असलं काहीही देत नाहीत, रेडिमेड बेबी फूड देतात. आणि या गप्पा मारत असताना "आपली मुलं" , "आपल्या सारखं जेवण" इथे प्रत्येक ठिकाणी "आपण" हा शब्द मी तिला माझ्यासोबत गृहीत धरून वापरलेला असतो. मी स्वत:च्या मनाला आवरते. आणि पुन्हा तिच्याशी नीट बोलू लागते. कारण आता आम्ही भारतीय किंवा पाकिस्तानी नसून 'एशियन" असतो. अर्थातच ती तिच्या भागाबद्दल सांगते आणि मी माझ्या.
मुलाच्या प्रिस्कूल मध्ये मागच्या वर्षी त्याच्या शिक्षिकेनी सांगितलं की, मुलांना बनवता येतील असे सोपे भारतीय गोड पदार्थ आम्हाला सांग. आम्ही मुलांच्याकडून ते करवून घेणार आहोत. उदाहरणादाखल त्यांनी मला एका डब्यामध्ये खीर होती, ती टेस्ट करायला सांगितली. मी म्हणाले 'मस्त आहे". शिक्षिकेने सांगितले सोहेल नावाच्या पाकिस्तानि मुलाच्या आईने ती पाककृती दिली होती. तो शिरखुर्मा होता. तिने मला विचारले, ' तुला ह पदार्थ माहिती असेलच" मी ही " हो. " असं म्हणाले. त्यानंतर जेव्हा त्या मुलाची आई भेटली तेव्हा मी तिला सांगितले की, खिर सुंदर झाली होती. ती म्हणाली, ' ये गोरे लोग क्या जाने, असली घी क्या होता है?? इन्होने सारे बादाम और काजू ओलिव्ह ऑइल में फ्राय किये है. अब इनको क्या बताना की, घी क्या होता है??" ती मला गृहीत धरून बोलत होती. असली घी फक्त आपल्यालाच माहिती या फिरंग्याना कसे समजणार या तिच्या बोलण्यातून तिला माझ्याबद्दल वाटलेली आत्मियता दिसून आली.
मुलाला एकदा प्ले ग्राऊंड वर खेळायला घेऊन गेले असता तिथे आमच्यातला संवाद ऐकून एक गोरी बाई आली म्हणाली, "यू आर फ्रॉम इंडिया ऑर पाकिस्तान ऑर बाग्लादेश??' मी म्हणाले " इंडिया". तिने नंतर सांगितले की, ती बांग्लादेशात काम करते आणि सध्या सुट्टीवर आलि आहे. ती म्हणाली की, भाषा खूपशी सिमिलर वाटली म्हणून ती बोलायला आली. "यू पिपल आर रिअली व्हेरी नाइस बाय नेचर" या तिच्या वाक्यात "यू पिपल" मध्ये तिने भारतीय उपखंडात असणार्‍या सगळ्या लोकांना गृहीत धरले होते. बांग्लादेशात राहून ही एक अमेरिकन बाई एका भारतीय स्त्रीला म्हणते की, तुम्ही सगळे खूप चांगले आहात. म्हणजे शीतावरून भाताची परिक्षा करण्यासारखं वाटलं. यात नेमकं तिला काय म्हणायचं होतं?? म्हणजे या देशाच्या सीमा फक्त जोवर तुम्ही तुमच्या देशांत असता तोवरच असतात का?माझा नवरा जेव्हा एकटाच मिशिगन मध्ये होता तेव्हा त्याच्या ऑफिस मध्ये एक पाकिस्तानी होता. नवर्‍याशी त्याची खूप चांगली ओळख झाली होती असं नाही. पण नवर्‍याला परत भारतात जाताना विमान तळापर्यंत सोडण्यासाठी तो पाकिस्तानी त्याची गाडी घेऊन तासभर ड्रायव्हिंग करून आला होता. त्याच्या बोलण्यातूनही कोणत्याही प्रकारची घृणा किंवा हिंदुस्थानी आहे म्हणून द्वेष दिसला नाही. गोर्‍या फिरंग्यांमध्ये आपल्या कातडीच्या रंगाशी जुळणारा रंग,आपल्या संस्कृतीशी साधर्म्य असणारि संस्कृती, आपल्या बोली भाषेशी मिळती जुळती असणारी बोलीभाषा या घटकांमुळेच बहुधा इथे भारतीय किंवा पाकिस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एशियन' अशी होते. गोर्‍यांपेक्षा जवळची वाटतात ही माणसं. माझी मानसिकता बदलली हे मात्र निश्चित. परदेशात राहून काय मिळवलं?? तर ही मानसिकता, जी कदाचित भारतात राहून मिळाली नसती.भारतीय दुकानांतून, पाकिस्तानी, बांग्लादेशी माल दिसतो. पण आता तो घेताना किंवा खरेदी करताना देशाच्या सीमा मनात येत नाहीत. स्ट्रॉबेरि जॅम हा किसान इतकाच अहमद फूड्स चाही चांगलाच असतो. बासमती तांदूळ हा दिल्लीहून येणारा आणि इस्लामाबादहून येणारा दोन्ही सारखाच असतो. आता वावरताना, कोणी पाकिस्तानी, बांग्लादेशी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणि आपल्या सारखाच सामान्य आहे ही आणि हीच भावना फक्त मनांत येते.

- प्राजु

1 प्रतिसाद:

Yatin Gambhir म्हणाले...

ही गोश्ट तेवधीच खरी आहे जेवढी आपण पाहतो.
इथे माणूस म्हणून प्रतिक्रिया देणे सोपे आहे पण भावनाही समजली पाहिजे.

खूपच छान अनुभव आहे हा !

Page copy protected against web site content infringement by Copyscape