सोमवार, ८ सप्टेंबर, २००८

तांडव..

दिव्य तांडव सुरू जाहले करूनी ललकार
नित्य होती वार जैसे घुमे तलवार..

वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार
कडाडकडकड अभ्र कोसळे सोसूनी प्रहार

जलौघ बरसे वायूसंगे होऊनी बेजार
कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार

'जलद' चालला बरसत धारा टाकीत फुत्कार
कसा जाहला हिरवाईचा त्यासी साक्षात्कार

युद्ध होते ग्रिष्माशी, तो होता ऐसा स्वार
जाती धावूनी हाक देण्या, अवनीची पुकार

रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार
मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार

जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार
मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार..

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape