बापू!! (व्यक्तिचित्रण)
"अरे बापू, जाऊन जरा नविन शेटच्या शेडवरून आपली बिमं घेऊन ये.."
"बापू, इचलकरंजी सहकारी मधे हा चेक टाकून ये..."
"बापू.. ३ नंबरचा माग बंद का पडलाय बघ जरा.."
एक ना हजार! हा बापू म्हणजे पुलंच्या "नारायण" चं पॉवरलूम मॉडेल असंच म्हणावं लागेल. इचलकरंजीमध्ये माझ्या भावाच्या पॉवरलूमच्या कारखान्यात असलेला हा एक नमुना.
नमुना अशासाठी की, कोणतंही काम करायला हा जसा एका पायावर तयार असतो तसंच कोणताही प्रश्न विचारताना तो लोजिकली बरोबर की चूक हा विचार करणं म्हणजे घोर अपराध केल्यासारखं त्याला वाटतं.
अंगकाठी म्हणाल तर हाफ पॅन्ट घालून आला तर दहावी-बारावीचा विद्यार्थी वाटेल. २ मुली आहेत त्याला. धाकटीवर विशेष जीव आहे याचा.
माझ्या भावाच्या अखंड बरोबर असणारा हा बापू.
माझी त्याच्याशी पहिली ओळख झाली ती मी कारखान्यात दिवाळीत लक्ष्मी पूजेसाठी गेले तेव्हा. खरंतर माझी त्याची काहीच ओळख नव्हती .. पण भावाच्या बोलण्यातून "ताई.. ताई.." असं ऐकून असल्यामुळे असेल कदाचित , भेटल्या भेटल्या "कित्ती दिवसांनी आलात ताई!!! आलात तसं र्हावा १-२ दिवस" असं म्हणाला. खरं म्हणजे मी रहायला गेले होते १५ दिवस. पण याचं इतर कामगारांसमोर हे असलं बोलणं एकून नक्की काय प्रतिक्रिया द्यावी मला समजेना. मग माझा भाऊच म्हणाला,"बाप्या... अरे १-२ दिवस काय?? ती १५ दिवस राहणार आहे..." त्यानंतर त्याचा चेहरा गोंधळला आणि त्याच्या लक्षात आलं आपण काहितरी वेगळंच बोलून गेलोय. पण त्याच्या भावना मला समजल्या.
तेव्हा मी पुण्यात रहात होते. हा बापू भावासोबत १-२ वेळा घरीही येऊन गेला पुण्याला. त्याचं माझ्याकडे येणं म्हणजे ,"ताई, काय आणायचं आहे का??" "ताई.. हे करू का? ताई.. ते करू का?" आपण मालकाच्या बहीणीच्या घरी आलोय म्हणजे अखंड काहीतरी काम केलंच पाहिजे अशी काहीशी त्याची समजूत होती.
तो एकदा आला होता पुण्याला त्यावेळी माझ्याकडे आम्ही एक नविन टेबल घेतलं होतं ते लिफ्ट मधून ३ र्या मजल्यावर न्यायचं होतं. झालं!! याला भयंकर उत्साह आला. आमचा नेपाळी वॉचमन आणि हा गावठी बापू.. दोघांचा एकमेकाशी चाललेला संवाद अगदी ऐकण्यासारखा होता.
वॉचमन नेपाळी हिंदी बोलत होता आणि बापू गावरान हिंदी बोलत होता. "टेबल को निचे से हात लगाती का? मै उप्पर से उटाता हय!" इति वॉचमन.
बापू आवेशाने म्हणाला, "नको नको.. मी बाहेरून ढकलता है.. तुम आंदरमे ओढो..." हे असले संवाद करत दोघं अगदी मन लावून हिंदी की चिंधी करत होते.
शेवटी टेबल एकदाचं घरात आलं आणि कानावर आदळणारे हिंदी संवाद थांबले. चहा पिता पिता बापूने वॉचमनला विचारले, "नेपाल मे हम्को काम करना है.. तुम देता है क्या?"
वॉचमन म्हणाला," हमको काम नही वहॉ.. इसीवास्ते हाम इदर को आया.." हे ऐकून बापू खट्टू झाला. नेपाळमधे जाऊन राहण्याची स्वप्नं रंगवायला बापूने सुरूवात केलीच होती.
माझी स्कूटी विकायची होती. भावाचा फोन आला बापू घेणार आहे. मी ती कोल्हापूरला पाठवून दिली. बापूने लग्गेच पैसे पाठवून दिले. त्यानंतर अशीच एकदा पुन्हा इचलकरंजीला गेले होते कारखान्यात तेव्हा बापू भेटायला आला.
"कशा हाय ताई?" बापू
"मस्त. तू कसा आहेस? आणि स्कूटी कशी आहे?" मी काहीतरी विषय काढायचा म्हणून विचारलं.
"स्कूटी एकदम मस्त! परवा नविन सीट कव्हर घातल्यापासून अॅव्हरेज एकदम वाढलंय बघा.." - बापू.
हे ऐकून नक्की हसावं का रडावं हेच मला कळेना. एकतर जोरात हसू येत होतं ... पण त्याच्या निरागस चेहर्याकडे बघून मी हसू दाबण्याचा इतका प्रयत्न केला... पण नाही जमलं. माझ्या भावाला बहुतेक ते लक्षात आलं असावं..." बाप्या.. लेका काहिही काय बोलतोस.. जा आत जा .." असं म्हणून त्याने त्याला आत पिटाळला आणि मग मात्र आम्ही दोघं भरपूर हसलो.
गेल्या वर्षी भारतवारीमध्ये कोकणात गेलो होतो सगळे. गणपतीपुळे, मार्लेश्वर रत्नागिरी अशी ट्रीप करायला. बापू होताच. हरकाम्यासारखा.. अखंड काहीना काही करतच होता. गणपतीपुळ्याला जाताना वाटेत काही आंब्याची झाडं होती. अर्थातच हापूसच्या कैर्या होत्या त्या.. कलमी!! तिथेच जवळ पोलिसांची एक टपरी वजा चौकी होती. आम्हाला २-३ कैर्या काढायची हुक्की आली. गाडी थांबवली. उतरलो आणि बापूला सांगितलं पोलिसाला जाऊन विचार की यातल्या १-२ कैर्या तोडून घेतल्या तर हरकत नाही ना? कारण कोणाच्या बागेतल्या कैर्या तोडल्या म्हणून नंतर उगाच लफडं नको.. बापू गेला. तिथे टपरी बाहेर एका खुर्चित एक हवालदार बसला होता.
त्याला त्याने विचारलं.. "का हो भाऊ.. २-३ कैर्या घेऊ का तोडून आम्ही?"
हवालदार निर्विकार पणे म्हणाला,"मला काय विचारता? हव्या तर घ्या..."
बापू म्हणाला," बाग कुणाची हाय ही?"
हवालदार : " मला काय माहिती?"
बापू : " घेतल्या १-२ कैर्या तर काही प्रॉब्लेम न्हाइ नव्हं.?"
हवालदार थोडा चिडला," मला काय विचारता? माझी नव्हे बाग."
बापू : " मग कुणाला विचारू?"
हवालदारः " बागेचा राखनदार असेल ना .. त्याला विचारा की.."
बापू : " मग तुमी हितं काय करताय?"
झालं.. ! हवालदार चिडला. उठून उभा राहिला तसा बापू पळून आला. कैर्या राहिल्याच शेवटी!
हा नक्की कोणासमोर काय बोलेल याचा काही नेम नाही.
गणपतीपुळ्याच्या त्या दुकानातून मी त्याचा मुलींसाठी मोत्यांच्या २ माळा आणि कानातल्याचे जोड घेऊन दिले. त्याला त्याचं इतकं कौतुक वाटलं.. तिथे जवळच असलेल्या बूथ वरून त्याने त्याच्या भावाच्या मोबाईलवर फोन केला आणि घरी कळवलं,"ताईनी दोघिंसाठी गळ्यातलं आनि कानातलं घेऊन दिलंय.."
मलाही थोडं बरं वाटलं.
याच्याशी खूप अशा गप्पा कधी झाल्या नाहित.. पण भावाकडून अधून मधून असेच किस्से ऐकायला मिळत असतात.
एक मात्र असतं, की बापू बरोबर असला की कोणतीही अडचण वाटत नाही. अगदी मुलांची सुद्धा!!
- प्राजु
3 प्रतिसाद:
मस्त झालं आहे व्यक्तिचित्रण... मजा आली वाचताना.
छान जमलयं. खरचं गावच्या अशा काही व्यक्ती किती निरागस असतात नाही?
" मग तुमी हितं काय करताय?"
ठठो..!!!! :-D
टिप्पणी पोस्ट करा