मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

दूर कुठेशा राईमध्ये

दूर कुठेशा राईमध्ये घमघमते बासरी
यमन कधी भटियार कधी अन् अवचित आसावरी
पानापानामधून काही झिरमिर झरती सूर
अविरत बरसत गाती गहि-या खर्जामध्ये सरी
सळसळती पाने कसली चाहूल कुणाची कशी
अवचित उतरुन येती किरणे कनक झळाळी जशी
रुंद झावळ्या डूल घालती थेंबांचे कोवळे
आरस्पानी कुणी अप्सरा चाले नाजूकशी
अलगद येतो पाठी मागुन वारा नादावला
कवेत घेतो अलगद भिजल्या प्राजक्ताच्या फुला
किती शहारे येती विरती फांदी फांदीवरी
शुभ्र शेंदरी झुलतो जेव्हा चैतन्याचा झुला
स्वैर जराशी सचैल भिजते दरवळते मी खास
अंगांगातुन बिलगत जाती रम्य सरीचे भास
ऊन कोवळे वारा धारा प्राजक्ताचे फूल
पिसे लागते जिवास माझ्या जडावतो मग श्वास
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape