रविवार, १५ जानेवारी, २०१७

सावली विसरली आज .. सूर्य सरताज

सावली विसरली आज
सूर्य सरताज
शुभ्र जरतारी
धावते सोडूनी हात
रंग बरसात
गगन किनारी
अलवार वाकली सांज
राऊळी झांज
मुग्ध गाभारा
लहरून पसरतो गंध
फुलाचा मंद
वाहतो वारा
हृदयास पिसे सावळे
सूर कोवळे
कोठुनी येती
थिरकती बांधुनी चाळ
किती लडिवाळ
मनाच्या मीती
ओढाळ मनाला ध्यास
खुळा अदमास
निळ्या स्वप्नांचा
हृदयास लावतो पंख
हवासा डंख
तुझ्या ओठाचा
सोडूनी चालले गाव
कुठे ना ठाव
कोणती बाधा
स्पर्शात रंगले अंग
उरी श्रीरंग
जाहले राधा
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape