अशी दे मिठी..
अशी दे मिठी तू मला आज सखया
फ़ुलावे असे रोमरोमातुनी
जरा टेकता ओठ ओठांवरी या
सरी कोसळाव्या जणू आतुनी
तुझा श्वास माझाच होऊन जाता
हळूवार वितळून जाईन मी
जसा मंद गंधीत प्राजक्त बहरे
तशी अंतरातून बहरेन मी
तुझे मौन करते किती आर्जवे अन
नजरही मला मागते चांदणे
नसे जाणिवांना इथे भान काही
झणी मुक्त होतात अन बंधने
इथे जन्मजन्मांतरीची कहाणी
लिहावीस हळुवार देहावरी
मिटावेत डोळे तुझ्या चुंबण्याने
जडावी नशा पापण्यांच्यावरी
अनाहत अशी तू मिठी दे मला की
विसावा मिळावा तुझ्या संगती
घडी मीलनाची जरी संपलेली
खुणा राहिल्या माझिया सोबती
-प्राजु
2 प्रतिसाद:
प्राजु, कविता खुप आवडली अलीकडे. अभावानच एवढी चांगली कविता वाचायला मिळते.
khup chaan....vegali kavita pan...sahaj aani saral
टिप्पणी पोस्ट करा