बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

.... तुला तर पाहिजे श्रावण!

नको प्राजक्त देऊ तू मला सजवावया अंगण
जमीनीला तडे माझ्या तशातच माजलेले तण

न आंब्याचे न झेंडूचे, न मोत्यांचे न नक्षीचे
कधीचे बांधलेले मी मनाला बाभळी तोरण..

बर्‍यापैकी अता पडले मनांमध्ये पहा अंतर
कशाला वेगळे होण्या उगा तू शोधसी कारण??

कधीची वाट बघते मी, अता ना सोसवे काही
कधी पासून रे मरणा, तुलाही लागते अवतण??

बरसते मी कधी केव्हा, खुळ्या वळवापरी लहरी
भरवसा काय देऊ मी, तुला तर पाहिजे श्रावण!

कधी आले, समजले ना, कधी गेले, समजले ना!!
सुखानेही व्यथेचे रूप केले वाटते धारण!

अताशा वाटते गोडी, सवे तुमच्याच जगण्याची
पहा एकांत दु:खांनो तुम्हा केलाय मी अर्पण !

भिडावे वाटते 'प्राजू' तुला, तर त्या व्यथेपाशी
कशाला आत्मविश्वासास तू मग ठेवले तारण??

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape