बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

माळा श्रावण-स्मरणांच्या..

श्रावण म्हणतो गावे गाणे, तारा छेडून किरणांच्या
साथीला मेघांचा ठेका आणि सुरावटी धारांच्या..

लवलव नाचे गवत पोपटी, गिरकी घेऊन झुलताना
ऊन बागडे हरणाच्यापरी, गवतावर झिरमिरताना
तान टपोरी झरली ओठी हिरव्या रेशिम पात्यांच्या
साथीला मेघांचा ठेका आणि सुरावटी धारांच्या..

घुमू लागला श्रावण सोडून रंगित शेला जरतारी
सतरंगी चापास कुणी अन कधी घातली हाकारी
कुण्या खुळीने रचल्या त्यावर ओळी हळव्या कवनांच्या
साथीला मेघांचा ठेका आणि सुरावटी धारांच्या..

बघता बघता निसर्ग अवघा श्रावणप्रेमाला भुलला
तर्‍हेतर्‍हेने रंगून, गंधून, चहू दिशांतून मोहोरला
उरात घेतो साठवून तो माळा श्रावण-स्मरणांच्या
साथीला मेघांचा ठेका आणि सुरावटी धारांच्या..

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape