शनिवार, १३ जुलै, २०१३

रसग्रहण.. ....सखी साजणी - सारंग भणगे

मराठी कविता समुहाचे संचालक आणि उत्तम कवी सारंग भणगे यांनी  "....सखी साजणी"  या कवितेचे केलेले रसग्रहण.. धन्यवाद सारंगदा..!

प्राजक्ता,

सहभागाबद्दल धन्यवाद!

तुझ्या कविता सहसा गोड असतात. इथे तर एक गोड विषय दिला असताना मधामध्ये साखर घोळून एक महन्मधुर कविता तू लिहिली नसतीस तरच नवल!

सुखाची जणू देत चाहूल........ हि ओळ वाचली आणि मी लिहायला सुरुवात केली. सर्वप्रथम तुझ्या शीर्षक नसलेल्या या गीताला मी ते शीर्षक दिले. इतके सुरेख आणि अगदी समर्पक शीर्षक मिळाले कि मला त्याचाच आनंद झाला. प्रिया येत आहे हि सुखाचीच चाहूल नाही का! खूप छान ओळ आहे ती.

इथे दरवळूनी तिचा गंध आला.....कसा तर उडू लागली का तिची ओढणी! अहाहा! हि कल्पना खूप सुंदर बांधली आहे. तिच्या ओढणीचा गंध वगैरे तशी जुनीच कल्पना, पण या कवितेत ती अशी बांधली आहे कि एक औरच मजा आली.

फुलांनी उन्हाकडे लकाकी मागून घेणे हि एक अभिनव कल्पना आहे. आवडली.

निळ्या आसमंती निळ्या अंबराने – इथे आसमंत आणि अंबर एकच. असे म्हटले तर – निळ्या आसमंती निळ्या पाखरांनी .....

या निळ्या ओळींनी गीताचे सौंदर्य खुलले आहे. निळ्या नक्षीची कल्पना देखील डोळ्या समोर आणली कि नयन मनोहरच वाटते. या साऱ्याचा आपल्या गीताशी काय संबंध? हे काय निसर्ग गीत आहे? असा क्षणभर विचार तरळतो आणि मग त्याचे उत्तर तिसऱ्या ओळीत सापडते. सारा निसर्गच जणू तिच्या स्वागताला सजून-धजून सज्ज झाला आहे. हे संपूर्ण कडवे अतिशय कल्पनाविभोर झाले आहे. सुंदर धृवापादानंतर इतके मधुर कडवे, पुढील कडव्याची उत्सुकता वाढवते.

पुढच्या कडव्यावर मी काय लिहू! अगदी शब्दामुके होऊन गेलो. अतिशय लोभस, मिठास भरलेले अप्रतिम कडवे. प्रथमत: त्या कडव्यातील ‘जीवघेणी खळी’, ‘निशा चंद्रवर्खी’, ‘धुक्याने जणू माझालेली प्रभा’ या शब्दांनाच मी केवळ मुजरा करेन. मधाचा जणू पाऊस पडावा असे हे शब्द मनावर एक मधुर वर्ख चढवत जातात. अनेकदा माझ्या मनात विचार येतो कि आज गेली शेकडो वर्ष इतके काही लिहिले गेले आहे, कवींना आता नवीन कल्पना कुठून मिळणार? प्रेयसीला पहिल्यांदा जेव्हा कुणा कवीने चंद्र म्हटले असेल त्यावेळी त्या कवीला लोकांनी डोक्यावर घेतले असेल. पण आता या कल्पना बोथट झाल्या. मग नवनवीन कल्पना विचार कुठून आणायचे. निसर्ग तर तसाच आहे, मग कवीने रवीच्या पलीकडे काव्यविश्व शोधायचे तरी किती! पण जेव्हा अशा काही ओळी मी वाचतो तेव्हा निर्धास्त होतो कि निसर्ग बदलला नसला तरी कवीची प्रतिभा त्या निसर्गाचा अनेकविध नवीन प्रकारे शोध घेताच आहे आणि राहील. हे सारे विचार मनात येऊन जावेत इतके सुंदर हे कडवे आहे.

प्रियकराचे मन त्याच्या प्रेयसीच्या भोवती किती फिरते, तिला काय काय उपमा द्याव्यात हे त्याला सुचतच नाही. तिचे केस, तिची काया, तिची खळी सारे त्याच्या मनात साचले आहे, त्याचे दर्शन त्याला कदाचित थोड्याच वेळात होणार आहे आणि तो ते सारे मनात साठवलेले आठवतो आहे. आणि मग त्यालाच सुचत नाही कि मी तिला नक्की काय म्हणू, थंड धुक्याची दुलई पांघरलेली उषा कि चंद्राच्या चांदण्याचा वर्ख ल्यालेली निशा, कि सोवळी अशी सांज! यातून किती काही सुचवले आहे, नायक प्रेयसीचा सकाळ, संध्याकाळ आणि रात्री विचार करतो असे सुचविले आहे कि या सगळ्या सुंदर प्रतिमांशी त्याला त्याह्या प्रेयसीच्या सौंदर्याची तुलना करावी वाटते आहे कि या प्रतिमा देखील तिच्या सौंदर्यापुढे खुज्या आहेत आणि यातील कोणती एक प्रतिमा –उपमा तिच्यासाठी पुरेशी नाही....कित्ती काय सांगतात या ओळी!

येथे सांज ‘सोवळी’ हे मुद्दाम योजले आहे का? सहसा सांज सावळी असे पटकन लिहिले जाते. ते इथे योग्य वाटले असतेच, पण सोवळी मधून देखील ती प्रिया केवळ संजेसारखी सावळीच नाही तर ती पवित्र आणि शुभांगी अशी सोवळी आहे असे सुचवायचे आहे का? मला सोवळी आवडले, पण आधी म्हटल्याप्रमाणे सावळी सांज असा लिहायचा असताना एकच मात्र अधिक जोडून सोवळी लिहिताना कवयित्रीने नक्की कसा विचार केला असेल याचे राहून राहून आश्चर्य वाटत राहिले.

कवितेचा आलेख अगदी जसा असला पाहिजे तसा प्रत्येक कडव्याने उंचावत गेला आहे. शेवटचे कडवे म्हणजे या काव्य-गीताचा कलाशाध्यायच जणू! कविता अक्षरश: उंच पर्वताच्या टोकावर जाते इथे. कवितेतील सर्व कडवी स्वतंत्र असली तरी ती एकमेकात गुंफल्यासारखी आहेत. प्रत्येक कडवे जरी एक मोती असला तरी संपूर्ण गीत हे एका विशिष्ट विचाराच्या सूत्रामध्ये बांधले असल्याने त्या विचाराच्या सुतामध्ये कडव्यांचे मोती ओवून हे गीत म्हणजे मोत्याची एक माळ असल्याप्रमाणे झाले आहे. त्या गीतामधून एक abstract चित्र तयार न होता एक नयनरम्य असे सुंदर आकृतिबंध असलेले एकसूत्र चित्र एकवटून आले आहे. इतके कि ती येते आहे हि सुखाची चाहूल निसर्गामध्ये जाणवत जाते आणि मग त्या केवळ चाहुलीचे रुपांतर ती येण्याची प्रचीती येण्यापर्यंत पोहोचते अशी सांगड पहिल्या कडव्यापासून शेवटच्या कडव्यापर्यंत बसते. आपण ट्रीपला कसे जातो? आपल्या घरातून निघतो, मग वेगवेगळी ठिकाणे पाहत पुन्हा आपल्या घरी येतो तसेच वाटते या कवितेत. एका अर्थाने हि कविता ‘संपूर्ण’ आणि ‘परिपूर्ण’ वाटते.

तिच्या पैंजणांचा खुळा नाद हा तिच्या येण्याची प्रचीती देतो हि रोमांचक कल्पना तर आहेच, परंतु तिची अशी हि प्रचीती म्हणजे नायकाची, प्रियकराची स्वप्नपूर्ती आहे असे संबोधून या कल्पनेला एक अंतिम पाडाव दिला आहे. त्यावर कडी म्हणून तिच्या पैंजणांचा नाद हा प्रियकराशी इतका तदात्म आणि एकरूप झाला आहे कि जणू तो नाद म्हणजे त्याच्या हृदयाचे स्पंदच जणू! दोन ओळींमध्ये इतके काही लिहून जाता येते हेच मला केवळ दिग्मूढ करून जाते. आणि प्रीतीने अनावर झालेला, प्रेयसीशी एकरूप झालेला, दही दिशात निशिदिन तिला पाहणारा हा प्रियकर तिच्या प्रितीमध्ये इतका काही समरस झाला आहे कि त्याचे सारे प्राण त्या प्रेयसीला पाहण्यासाठी एकवटून त्याच्या डोळ्यांमध्ये आलेले आहेत. त्याची प्रेयसीप्रतीची तल्लीनता इतक्या भावगर्भ रीतीने इथे वर्णिली आहे कि खरे सांगतो, मला माझे शब्द इथे आता थिटे वाटू लागले आहेत. प्राणाहून प्रिय असणाऱ्या प्रेयसीच्या दर्शनासाठी प्राणांचे डोळ्यात एकवटणे हे त्या प्रियकराची प्रेयसीविषयीची पराकोटीची एकतानता दर्शवितात.

भावगर्भ शब्दमाधुर्य, अभिनव कल्पना, उत्कट भाव, सुंदर वर्णन, एकसंध आकृतिबंध, चढता काव्यालेख, प्रसंगास अत्यंत अनुरूप असे हे गीत आमच्या निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, नायक, नायिका आणि मी सर्वांनाच फार म्हणजे फार आवडले.

व्यक्तिश: उपक्रमाचा भाग म्हणून मला यावर लिहिता आले तरी इतर कवितांचा देखील रसास्वाद घ्यायचा असल्याने इथे थोडे आखडते घेणे भाग आहे. अन्यथा मी यावर अजून बरेच काही लिहायचा प्रयत्न केला असता!

खूप सुंदर गीत!

- सारंग भणगे

Page copy protected against web site content infringement by Copyscape