रविवार, ७ जुलै, २०१३

फ़ुलाला पोळण्याआधी उन्हाचा श्वास अडकावा

सरींवरती जरा व्हावा उन्हाचा मंद शिडकावा
नव्याने सप्तरंगी ध्वज नभाशी आज फ़डकावा

कधी झालेच नाही जे अता ते होउनी जावे
फ़ुलाला पोळण्याआधी उन्हाचा श्वास अडकावा

किती गोडी गुलाबीने उभा संसार चालू हा
जरा एखाद मुद्दा वाद घालायास हुडकावा

किती कोमट जगायाची मनाला या सवय झाली
निखारा एक क्रांतीचा उराशी आज भडकावा

किती कंटाळवाणी गलबते येती किनार्‍याशी
अता वाटे तडाखा वादळाचा येथ थडकावा

तुला ना पाहिले देवा कधी मी आजतागायत
तरी का ना तुझ्यावरचा अढळ विश्वास तडकावा?

तुझे ना नावही त्याने कधीही घेतले 'प्राजू'
तरी त्यालाच पाहूनी तुझा का ऊर धडकावा?

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape