मंगळवार, ७ मे, २०१३

बिंबही माझे न भेगाळे अता अरश्यातले


शब्द थोडे कल्पनांनी न्हाउ-माखू घातले
जाहले काही गझल तर राहिलेले मातले

वेळ तुमच्यावर सुधा येईल ही.... हासू नका!
हे सुपामधल्यांस ऐका सांगती जात्यातले

भेट आधी तू तिथे ठरल्या ठिकाणी एकदा
अर्थ मग काढू, जुन्या अपुल्यातल्या वादातले 

मी स्वत: बनले मनाने एकसंधागत अशी
बिंबही माझे न भेगाळे अता अरश्यातले 

उन्मळूनी जायची भीती न आता राहिली
घेतले आहेत गुण मी कोवळ्या गवतातले

कोटराचा दे वसा आता मला तू पाखरा
एकपाठी होत मी बाधेन घर स्वप्नातले

सारखे मज वाटती सगळेच येथे,.. ना कळे
कोण बाहेरून आले , कोण आहे आतले??

हासते आहे भुई बघ वाळल्या शेतासवे
पावसाळे आठवूनी ते पुन्हा स्मरणातले!

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape