शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

विषण्णतेची छाया ..वहात होते धरूनिया मी तुझा किनारा
ओढत खेचत घेउन गेला सुसाट वारा
भिती दाटली, मागमूस ना सजीवतेचा
दु:खावरती अथांगतेचा जणू पहारा

आणा-भाका, शपथा-वचने झाल्या अंती
पोकळ घर वाळूचे, अन वाळूच्या भिंती
हवा-पाणी, वारा कुणीही ठोकर द्यावी
अन मनातली ध्वस्त करावी नाजुक वस्ती

सभोवताली वाटे मजला सारे जहरी
खात्री नाही, ऋतू तुझ्या प्रीतीचे लहरी
ग्रिष्मानंतर पाऊस यावा जरी वाटले
वळीव व्हावा, तोही का सांजेच्या प्रहरी?

देही संदेहाचे जाळे गर्द दाटते
गाली खार्‍या अश्रूंचे शव जणू ताठते
खोल मनाच्या मनातली स्पंदने थांबती
विषण्णतेची छाया मजला पूर्ण गाठते

तुझ्या परतण्याची कोणीही द्यावी ग्वाही
त्यासाठी मग मंजुर मजला सारे काही
वणवणणार्‍या जिवा मिळावी जरा उभारी
साचुन बसले जीवन व्हावे पुन्हा प्रवाही

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape