गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३

नकाच येऊ कोणी

शिवार माझे उजाड सारे नकाच येऊ कोणी
फ़ुलण्यावर वैशाख पहारे नकाच येऊ कोणी

पहाट झाली स्वप्ने विरली भकास वास्तव बाकी
आशेचे मावळले तारे नकाच येऊ कोणी

माझ्या नशिबावरती रडण्या, किंवा सांत्वन करण्या
तुम्हास करते पुन्हा इशारे नकाच येऊ कोणी

नर्तन नाही अता व्हायचे मेघ पाहुनी देखिल
मिटले माझे मीच पिसारे, नकाच येऊ कोणी

भणंगतेची बाधा झाली, थारा नसे मनाला
उपदेशाचे देत उतारे नकाच येऊ कोणी

मोहरण्याची, हुरहुरण्याची आस न उरली आता
पुन्हा फ़ुलवण्या नवे शहारे नकाच येऊ कोणी

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape