बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

माझ्या त्या सार्‍या कविता


शब्दांना स्वप्ने आली, शब्दांची स्वप्ने झाली
स्वप्नातच स्वप्नामधुनी शब्दांची गावे झाली
शब्दांना सूर गवसले स्वप्नाला गाण्याकरीता
स्वप्नातच रंगून गेल्या माझ्या त्या सार्‍या कविता

मी भाव ओतूनी सारे शब्दांना बांधत जाते
कधि मोजून मात्रा वृत्ते ओळींना सांधत जाते
मी लिहिते, लिहित जाते शब्दातच रमण्याकरीता
हृदयात खोल रुणझुणती माझ्या त्या सार्‍या कविता..

बेहोष प्रेम मी लिहिते साकारुनी क्षणांना
मी विद्ध मनावर जपते विरहाच्याही खुणांना
पुन्हा पुन्हा ठरविते हा गिरवायचा ना कित्ता
दुरूनी हसती मजला, माझ्या त्या सार्‍या कविता

मी व्यक्त होत असताना या किती घालती पिंगा
अल्लड परकरी पोरी .. अरे यांना जरासे सांगा
ओठात वेदनेच्याही नवे हासू भरण्याकरीता
कितीक झटती वेड्या माझ्या त्या सार्‍या कविता

शब्दांचे जहरी प्याले अमृतापरी प्राशुनी
कधि गीते दरीशिखरांची मेघातुनी गाऊनी
फ़िरती नसानसातुन, मला जगवण्याकरीता
आजन्म ऋणी मी त्यांची.. माझ्या त्या सार्‍या कविता

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape