सोमवार, १६ जुलै, २०१२

सूर जोगियाचा जुना..
सांज पेटवून गेला, सूर्य अस्ताचलाकडे
दीप काळजाचा घाली, दाट छायेला साकडे
ओलांडतो पापणीच्या, ओल्या कडा पुन्हा पुन्हा
अंतरात भिनलेला , सूर जोगियाचा जुना

उठतात दूरवर तरंगही माझ्या मनी
फ़ेर धरतात उरी खोल तुझ्या आठवणी
पिंगा घाली घेऊनिया सोबतीस तुझ्या खुणा
अंतरात भिनलेला , सूर जोगियाचा जुना

सुक्या ओठांवरी माझ्या, ओल्या व्यथांचेच ठसे
फ़िकुटल्या गालावरी, वेदनांचे कवडसे
अविरत डोळ्यातून, साद घालतो हा कुणा
अंतरात भिनलेला , सूर जोगियाचा जुना

गूढ रितेपण माझ्या, मनी ओसंडते नवे
सुखासीन वाटांचे मी, आज टाळतेच दुवे
आर्ततेच्या ओठावर, छेडूनिया साज सुना
अंतरात भिनलेला , सूर जोगियाचा जुना

अंगावर येते जणू, जिणे एकटीचे आता
यंत्रवत वरखाली, श्वासांचाही हले भाता
सजा देतो ज्याची मला, केला ना मी कधी गुन्हा
अंतरात भिनलेला , सूर जोगियाचा जुना

-प्राजु


Page copy protected against web site content infringement by Copyscape