शनिवार, ७ जुलै, २०१२

जणू वेदना जात्यावरती दळते आहे


कसे म्हणावे नशीब हे फ़ळफ़ळते आहे
उथळ सुखांच्यासवे जरा खळखळते आहे!

नव्हते ठरले कधी आपुले भेटायाचे
कशास मी त्या पाराशी घुटमळते आहे?

थुंकुन देता आयुष्याला नशिबावरती
हळू हळू ते आता थोडे कळते आहे

मन्मानीला लगाम त्यांच्या घालू जाता
नात्यांमधली गोडी का साकळते आहे??

पुरुषासाठी जन्म पणाला नारी लावे
येत तटाशी लाट सुधा आदळते आहे!

आज-उद्याला अथवा परवा येशिल तू रे
पावसा बघ वेधशाळा गोंधळते आहे!

आयुष्याची भुकटी भुकटी होउन गेली
जणू वेदना जात्यावरती दळते आहे

'प्राजू' का ना कधीच धरली खपली त्यावर?
जखम कधीची अजूनही भळभळते आहे!

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape