रविवार, १ जुलै, २०१२

मी कविता होऊन आले..

तू शब्दांसाठी वेडा, मी तुझी कल्पना झाले
शृंगारता मला तू, मी अलंकारही ल्याले
प्रेमात फ़ुलुनी आले, विरहातही जळाले
रचलेस मला तू आणि, मी कविता होऊन आले

तू कागद क्षितिजावरचा, केशर मी विस्कटले
मिळता तुझा किनारा, मी सूर्यशलाका नटले
मी तुझ्यापासुनी निघुनी, मी तुझ्याचपाशी आले
मी पहाट सुंदर झाले, अन रात बावरी झाले

तू गहिवरल्या मेघांचा, अनावर एक पसारा
मी चाळ बांधुनी पायी, छमछम झरणारी धारा
मी हिरव्या पानामधल्या, छंदा सोबत भिजले
मी मातीतुन दरवळले, निर्झरापरी अवखळले

तू पुजारी सूरलयींचा, छेडीत अनावट तारा
कधी यमनाच्या शृंगारा, कधी रुणझुणत्या मल्हारा
मी तुझिया ओठावरची, रंगीन सुरावट झाले
मी ख्यालातुनही खुलले, मी ठुमरी मधुनी फ़ुलले

तू वहीच आठवणींची, मी पान त्यातले एक
त्या कविताचित्रामधली, मी एक पुसटशी रेख
मी पिंपळपाना मधल्या जाळीतुन झिरमिळले
मी पानातुनी सळसळले, मी स्मरणातुन गहिवरले

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape