शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

का ??

मी या जगांत भरल्या, दु:खास का पुसावे?
अनमोल आसवांना, ऐसेच का वहावे?

राधा न मी न मीरा, ना ती अनारकलि मी
का मीच विष प्यावे? बेड्यांत जोखडावे?

नजरांत खोट त्यांच्या, शापीत भाव सारे
सौंदर्य मीच माझे, मग शाप का म्हणावे?

सारेच ओळखीचे, दिसले ठसे हजारो
मीही तशीच का त्या, वाटेवरून जावे?

धर्मासही न चुकले, जर वागणे अधर्मी
ते पाश संस्कृतीचे मग मीच का जपावे?

भाळी कधीच माझ्या, रेखा न पाहिल्या मी
मग जे घडून गेले, संचीत का म्हणावे?

सृष्टीस निर्मिताना, ना 'तो' मुहूर्त पाही
माझ्या मनांत का मी, पंचांग बाळगावे?

(ते सावलीत जाती, टाळूनिया उन्हाला
तेजोनिधीस, माझ्या मी सावलीत घ्यावे)

- प्राजु

1 प्रतिसाद:

Ganesh Bhute म्हणाले...

(ते सावलीत जाती, टाळूनिया उन्हाला
तेजोनिधीस, माझ्या मी सावलीत घ्यावे)

अप्रतिम कल्पना...

Page copy protected against web site content infringement by Copyscape