शुक्रवार, ११ सप्टेंबर, २००९

स्पंदने..

आठवून प्रीतपर्व दर्पणात पाहशील,
मोहरून जात जात अन उगाच लाजशील

फ़ूल ते बकूळ आज, कुंतलात माळताच
श्वास श्वास गुंफ़ला सखे तुझ्याच काळजात

नाहशील चांदवर्खी पौर्णिमेत तू टिपूर
आसपास भास माझे लावतील हूरहूर..

वेचशील पारिजात, अंगणात होत गुंग
मम सयीत दर्वळेल, गं तुझेच अंतरंग

प्रेमगीत छेडशील पावसात होत चिंब
स्पर्श माझे आठवून, झेलशील थेंब थेंब

रानभर हिंडशील, फ़ूलपाने वेचशील
वाळल्या फ़ुलाफ़ुलात रंग माझे शोधशील

त्या जुन्या वहीमधेच, चाळशील जीर्ण शब्द,
जाळिदार पिंपळात, पाहशील अब्द अब्द

वाट ना हि संपणार, पाउले ना थांबली ऽ
त्या शिवेवरी तुझीच, स्पंदने का गुंतली ऽ??

- प्राजु

2 प्रतिसाद:

Shridhar 'Aniket' म्हणाले...

sahaj sope shabd aani utsphurt bhavana !! manas aanand deNarya oLi.

क्रान्ति म्हणाले...

kay surekh kavita ahe praaju! khoop khoop aavadali.

Page copy protected against web site content infringement by Copyscape