रविवार, १७ मे, २००९

मदर्स डे..!!

२६ नोव्हेंबर २००३ हा दिवस खर्‍या अर्थाने म्हणजे अगदी शब्दशः माझ्यासाठी मदर्स डे होता.
नववा महिना लागून २-३ दिवसच झालेले .. थोडे कॉप्लिकेशन्स होऊनसुद्धा, महिनाभर आधी झालेलं माझं पिलू .. मला मिळालं. सी-सेक्शनसाठी दिलेली भूल उतरल्यावर जेव्हा मला जाग आली, तेव्हा फक्त मान वळवून पाहिलं तर शेजारच्या पलंगावर माझी आई बसली होती आणि तिच्या बाजूला, माझ्या आजीच्या नऊवारी साडीच्या मऊसूत कपड्यात गुंडाळून माझं येडू झोपलं होतं.. डोक्यालाही टोपड्यासारखा कपडा बांधला होता त्याच्या, त्यामुळे त्या कपड्याच्या कडेवरून मला फक्त त्याचं सरळसोट नाकच दिसत होतं.. इवलंस, गोरं गोरं..!

तसं पाहिलं तर , स्त्रीने बाळंत होणं ही समाजाच्या दृष्टीने एक अतिशय सामान्य बाब असली तरी, प्रत्येक स्त्री साठी हा एक सोहळा असतो. आणि का नसावा? 'त्या'ची चाहूल लागताच, 'त्या'च्या रूपाची स्वप्नं रंगवणं.. 'त्या'च्यासाठी चांगलं म्हणून आपल्याला न आवडणार्‍या गोष्टी करणं, किंवा आपल्याला न आवडणारे दूधासारखे पदार्थ सुद्धा खाणं-पिणं... आणि ते खाऊनही ते न पचणं.. उलट्या होताना पिळवटून निघणं.. चक्कर येऊ नये म्हणून सावध असणं.. सुहास शिरवळकर वाचायचे सोडून, भगवत गीता वाचणं.. , 'कजरारे कजरारे काले काले नैना ' ऐकायचे सोडून रामरक्षा, गर्भसंस्कार ऐकणं.. नेहमीची आपली धडाधड चाल सोडून अगदी जपून एकेक पाऊल टाकणं.. सटरफटर ,पाणीपुरीसारखे रोड साईड पदार्थ अगदीच जपून खाणं.. डॉक्टर विझीट ला जाणं.. हळूहळू 'त्या'ची वाढ होताना पाहून मोहरून जाणं.. इवले इवले हात्-पाय अल्ट्रासाऊंड मध्ये पाहून नकळत डोळे ओलावणं.. रात्री अपरात्री लत्ताप्रहार सहन करणं.. त्या प्रहारांनी दचकून जागं होणं.. आपली पाऊले दिसायची बंद झाल्यावर दिवस मोजणं.. आणि सगळ्यांत कठीण म्हणजे प्रचंड ताण, त्रास, धोका पत्करून प्रसंगी आपल्या जीवावर बेतायची शक्यताही असताना त्या जीवाला या जगात आणणं... हात्-पाय आणि इतर अवयव असलेला आपल्याच मांसाचा गोळा आपलं रूपडं घेऊन आलाय हे पाहणं... बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असं म्हणतात ते उगाच नाही. जीवघेणा असला तरी हा नऊ महिने चालणारा सोहळाच असतो. आणि गंमत अशी की, पहिल्या वेळी जितका उत्साह असतो या सोहळ्यांत तितकाच दुसर्‍या-तिसर्‍या वेळी असतो.. फरक इतकाच की दुसर्‍या -तिसर्‍या वेळी अनुभव गाठीशी असतो.

माझी अवस्था काही याहून वेगळी नव्हती. फक्त २८ डिसेंबर दिलेली तारीख असताना, माझं येडू २६ नोव्हेंबरलाच आलं या जगात.. दोघेही सुखरूप होतो हे आमच्या घरच्यांसाठी आणि माझ्यासाठीही खूप होतं. पोटावर टाके होते.. २-३ दिवस उठून बसता येत नव्हतं.. जेव्हा पहिल्यांदा उठून बसले तेव्हा आईने त्याला माझ्या मांडीवर दिलं.. तेव्हा त्याला निरखून बघण्यातच किती वेळ गेला कोणास ठाऊक! सरळसोट नाक, अतिशय नाजूक जिवणी, लांब पापण्या, लाल गुलाबी ओठ किंचीत मुडपलेले.. मोठं कपाळ.. हनुवटिवर हट्टीपणा दाखवणारी खळी.. .. हा एक दिवस जो माझ्या अयुष्यात मी कधीही नाही विसरणार. पिलू हळूहळू एकेक लिला दाखवत होतं.. हुंकार भरत होतं.. झोपेत हसत होतं.. मध्ये रडत होतं.. कित्ती नानाप्रकार होते ते! जागं असताना, काही गप्पा मारायला लागलं त्याच्याशी तर, डोळ्यांत अनेक प्रकारचे भाव दाखवत होतं. शी-सोहळा चालू झाला की, अत्यंत आनंदीत होऊन कुठेतरी छताकडे पहात वेगवेगळे आवाज काढायचं. माझी आजी म्हणायची "हगर्‍या गप्पा चालू झाल्या का?". बघता बघता लेकरू आठ महिन्यांचं झालं.. बाबाबाबा--- मामामा.. आदलाआदला--फादलाफादला... काकालकाअका असे काहीही न समजणारे शब्द बोलू लागलं. पिलू ६ महिन्याचं असताना त्याचा बाबा अमेरिकेला गेला. ... तो त्याचा वर्षाच्या वाढदिवसालाच आला. मात्र बाबाकडे बघताना काहीदिवस पिलूला "हा माणूस कोण?" असा प्रश्न कायम पडलेला असायचा. पहिले काही दिवस बाबाकडे बघून चुकून सुद्धा हसण्याचा प्रयास त्याने केला नाही. हळूहळू पिलूला खात्री पटली की "बाबा नावाचा माणूस आपल्याच घरात राहतो आणि आपल्यातलाच आहे." पिलूनं पहिलं टाकलेलं पाऊल ... त्यात इतकं नाविन्य वाटलं त्याला की, अखंड २५ मिनिटे ते इतकं चाललं .. इतकं चाललं की, बहुधा पाय खूप दुखले असावेत. त्यामुळे पुढचा महिनाभर अजिबात चाललं नाही. अखंड बोबडी बडबड.. तुरूतुरू पळणारी पाऊलं.. आणि त्या पाऊलातून छुमछुमणारा नाद.. अख्ख घर झपाटून गेलं. देवघरातल्या देवांना बेडरूम, लिव्हिंगरूमची सैर होऊ लागली. देवघरातली घंटा, घरात - बाथरूमधल्या बादलीत कुठेही सापडू लागली. सगळ्यांना प्रमोशन मिळालं. वरची जागा! रॅकमधले कणकेचे, डाळ्-तांदळाचे डबे आपोआप वरच्या कप्प्यांमध्ये गेले. बाथरूम मधले मग्स रोज आधी शोधायचे आणि मग अंघोळ करायची हा एक उद्योगच झाला. हळूहळू हे ही कमी झालं.. मग कधी कधी टिव्हीवरची सीआयडी सारखी सिरियल ऐन रंगात आलेली असताना, अचानक फॅशन टीव्ही चालू होऊ लागलं.. खिडकीत येणार्‍या चिमण्यांना पोळीचे तुकडे, तांदूळ.. घातले जाऊ लागले, आजीनं फ्रीजमधून नुकतंच बाहेर काढून ठेवलेलं गंजभर ताक, देवघर झाडण्यासाठी असलेल्या छोट्या झाडणीने ढवळून निघालं, कधी कधी रांगोळी, देवापुढे छोट्या वाटित ठेवलेली दूध-सखर, आणि हळद कुंकू यांची लाल-पिवळी खीर होऊ लागली.

पिलू २ वर्षाचं झालं .. आणि आई आणि पिलू दोघेही भुर्रर्रर उडून बाबा पाठोपाठ अमेरिकेत आले. अमेरिकेतल्या सर्कलमध्ये दोन-सव्वादोन वर्षाचं अखंड बडबड करणारं आणि अजिबात डायपर न वापरणारं पिलू म्हणून फारच कौतुक झालं.. नुकतंच बोबडं मराठी बोलायला लागलेलं पिलू तितक्याच उत्साही बोबडेपणानं अमेरेकन ऍसेंट मध्ये इंग्रजी बोलू लागलं अगदी "आय्लबी लाईत बॅक.. यू स्ते हिअल.." असं दिमाखात बोलू लागलं. २ वर्ष ९ महिन्याचं झालं आणि प्रिस्कूल ला नाव घातलं. शाळेच्या पहिल्या दिवशी घरातून उत्साहात निघालेलं पिलू, नंतर आई सोडून जाताना मात्र मोठे मोठे पाण्याचे थेंब डोळ्यांमध्ये घेऊन, "तू जाऊ नाकोशना" असं नजरेने सांगत तोंडाने मात्र हमसत हमसत हुंदका रोखून ," तू लवकल ये काय... खूप लवकर ये काय.. अगदी खूप लवकल ये काय..." असं कपर्‍या स्वराने म्हणत होतं. त्याला शिक्षकांचा स्वाधीन करून खाली आल्यावर.. का कोण जाणे माझ्या डोळ्यांतही ओल आली असल्याची जाणीव झाली. समोरच्या लायब्ररीत फक्त २ तास थांबायचं होतं मग शाळा सुटणार होती.. आणि पिलूला घेऊन घरी जायचं होतं. 'काय करत असेल, रडत असेल का?, रमला असेल का?, ' असे विचार चालू होते. .. मात्र लगेच सेलफोन वाजला.. पुन्हा शाळेत गेले. पिलू रडून लालेलाल झालेलं.. "तू इथेच बश... नको जाऊश" .. झालं !!! त्या शाळेची कोपर्‍यात बसणारी, २७ वर्षाची मी... महिनाभर विद्यार्थिनी झाले. पण रमलं पिलू. हळूहळू बोलण्यात स्पष्टपणा आला. बोबले बोल कमी झाले.. शाळेतून रोज एकेक नवनवीन क्राफ्ट घरी येऊ लागलं. पहिलावर्षीच्या कॉन्फरन्सला गेले... त्याची प्रगती, त्याचं वागणं.. त्याचं काम करणं.. याचे रिपोर्ट्स वाचून उगाचच अभिमान वाटला. एक गोष्ट टिचरनी सांगितली "ही डजन्ट लाईक टू गेट डर्टी..!" मला यात काही नविन नव्हतं. साधा वरण-भात भरवताना, एखादं शीत अंगावर पडलं.."हेऽऽऽऽऽऽअय" करून ओरडणारं माझं पिलू.. डर्टी कसं राहणार? लिबलिबित, गिळगिळीत असते म्हणून आंब्याची कोय कधीही त्याने हातात नाही घेतली. त्यामुळे 'ही डजन्ट लाई़क टू गेट डर्टी.."हे नेहमीचंच होतं माझ्यासाठी.

पिलू ४ वर्षाचं झालं.. आवडीनिवडी बदलल्या.. वागणंही बरंच बदललं. प्रश्नांचे भडीमार होऊ लागले.. दिलेल्या उत्तरातून पुन्हा नवनवे प्रश्न येऊ लागले. मित्र मंडळाचा विस्तार झाला. भारतवारीहून परतत असताना विमान चालू होऊन पुन्हा बंद झाले. इंजिन बंद झालं.. लाईट बंद झाले. ताबडतोब प्रश्न आला.."या विमानातले सेल संपले का?" "नाही मनू.. या विमानाला सेल लागत नाहीत.. पेट्रोल लागतं" - इति मी. लग्गेचच " मग आता पेट्रोल पंपावर जाणार का विमान?" .. हे आणि असे.. हजारो प्रश्न. संपूर्ण प्रवासात जितकावेळ पिलू जागं होतं तितका वेळ मी अखंड कसल्या ना कसल्या प्रश्नांची उत्तरं देत होतं. असेच प्रश्न -उत्तरं .. करता करता पिलू केजीला गेलं. स्कूलबसने आता शाळेत जाणार...
पहिला दिवस.. स्कूलबस आली.. कॉम्प्लेक्स मधली खूप मुलं त्या बसमधून जाणारी. बस समोर येताच.. काही जणं ताबडतोब रडू लागली. माझं पिलू रडलं नाही.. मात्र स्कूल बसच्या पायरीवरून मागे वळून.. भरलेल्या डोळ्याने .. "तू येणार आहेस ना.. आजच्या दिवस?" असं म्हणत हात हलवत आत जाऊन बसलं. आजपर्यंत मी जात होते शाळेत सोडायला. आणि आज पिलू एकटंच निघालं होतं शाळेला.. माझ्याशिवाय!!! पहिल्यादिवशी शाळेत आम्हालाही जायचंच होतं.. आम्ही बसच्या मागे जाणार होतोच शाळेत. पण तरीही बस मध्ये निट बसेल ना.. नीट उतरेल ना.. असले विचार पिच्छा सोडत नव्हते. पिलू नियमीत केजीला जाऊ लागलं. इतके दिवस फक्त २ ते अडीच तास शाळेत जाणारं पिलू आता केजीला सकाळी ९ ते ३.१५ असं जाऊ लागलं.. बस मधून ४ वाजेपर्यंत घरी येऊ लागलं. सुरूवातीचे काही दिवस घर अतिशय ओकंबोकं वाटलं.. पण हळूहळू सवय झाली.
आणि आज.. ८ मे २००९ .. म्हणजे मदर्स डे च्या आदल्यादिवशी.. हेच ताकात झाडू घुसळणारं, देवाच्या मूर्तीना अख्ख्या घराची सहल घडवणारं, रिमोटने चॅनेल बदलणारं, बोबलं इंग्रजी बोलणारं.. मला प्रिस्कूलचा पहिला महिना शाळेत एका बाजूला बसायला लावणारं, विमानातले सेल संपल्याबद्दल काळजी करणारं.. आणि मनामध्ये अखंड प्रश्नचिन्हं घेऊन हिंडणारं माझं येडू... स्कूलबस मधून उतरल्या उतरल्या.. शाळेमध्ये गेले २-३ महिने चालू असलेला प्रोजेक्ट... एका मोठ्या , वेगवेगळ्या रिबन्सनी सजवलेल्या डिस्पोजेबल ग्लास मध्ये माती घालून त्यात लावलेलं झेंडूच्या फुलाचं एक फूल आलेलं रोप हातात घेऊन... मला पाहिल्या पहिल्या वर मान करून "हॅप्पी मदर्स डे!!!!!" असं म्हणत खट्याळ भाव भरलेल्या डोळ्यांनी हसत हात वर करून मला तो ग्लास देत होतं...तो ग्लास म्हणजे ते रोप त्याच्या हातून घेऊन..माझ्याही नकळत मी त्याचा एक गोड गोड उम्म्मा (पापा, मुका ..विंग्रजीत किस्स! {मराठी भाषेला माझ्या पिलूने बहाल केलेला हा शब्द} )घेतला.

त्याचा हात धरून घरापर्यंत चालत येत असताना जी काही ५-६ मिनीटं लागली त्या ५-६ मिनीटांत मी जवळ जवळ ५-६ वर्ष मागे गेले.. आणि नुकतंच घडल्यासारखं सगळं एकदम डोळ्यापुढे तरळत राहिलं...

मे महिन्यातला दुसरा रविवार हा जरी जागतिक मदर्स डे म्हणून साजरा केला जात असला.. तरी २६ नोव्हेंबर या दिवशी मी खर्‍या अर्थाने मदर म्हणजेच आई झाले, हा दिवस सुद्धा माझ्यासाठी मदर्स डे च आहे कारण यादिवशी, आई होणं.. किंवा एका मुलाची आई असणं म्हणजे काय याची जाणीव मला झाली. माझ्या आईने मला घडवलं.. आणि शब्दश: घडवलं याचा अर्थ आता कदाचित मला समजायला लागला आहे असं वाटतं.

म्हणूनच मातृदेवो भव असं म्हणत असावेत..कारण आई म्हणजे..
श्वासाची लय असते
विश्वासाचे आलय असते
अशुभाला भय असते
वात्सल्याची सय असते
..... हो ना?

- प्राजु

(प्रत्येकाच्याच आयुष्यात या सगळ्या गोष्टी होत असतात.... यात नविन काही नाही. मात्र मला मन मोकळं करायचं होतं म्हणून लिहिलं.)

8 प्रतिसाद:

tanvi म्हणाले...

खरय हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं पण तरिही ते नवच असतं...........छान लिहिलस....मी काल परवा साधारण असाच ड्राफ्ट लिहिला होता....हेच अनुभव माझ्या पिल्लुचेही....
लेख खुप छान झालाय.....
तन्वी
www.sahajach.wordpress.com

कोहम म्हणाले...

khupach chaan...ha tuza lekh vachanyapurvi yashodharane lihilela tichya babanbaddalacha lekh vachala...tohi khup sundar ahe...ekach relationship che ase don vegale perspectives ekapathopath vachayala khup maja ali..

avantar - comment takayala khupach shodhashodh karayala lagali

meena म्हणाले...

nahi ga praju. everybody does not have a destiny to be a mother. but when I was reading this I have forgotten that I am not mother at the same time I was feeling like a mother.
thank you so much for giving me such nice moment.

भानस म्हणाले...

प्राजू छान लिहीले आहेस. ह्या मदर्स डेला माझे पिल्लू पहिल्यांदा एकटे भारतात गेले.इतरांच्या दृष्टीने तो आता खूप मोठा झालाय गं पण माझ्यासाठी अजूनही....तोच मला बघताच मोठे बोळके पसरून हसून झेपावणारा...असो. सगळीच रूपे तितकीच मोहक असतात.

Deep म्हणाले...

waa mastch lihily he :)

sameer म्हणाले...

Manushya-bijache hote ropan
AAi-chya udaraatun
Vasundhara hi natali, sajali
Srujana-chyaa hya akhand 'vella'tun!!

Vire juna dhaga !
an navin sut ghei
tyaachi jaaga!!
Avirat chaale khel srushticha
AAI-pana ha var dharaticha..

happy mother's day
praaju. nehmi pramaane sunder lekh

नरेंद्र गोळे म्हणाले...

आई म्हणजे

श्वासाची लय असते
विश्वासाचे आलय असते
अशुभाला भय असते
वात्सल्याची सय असते..... हो ना? >>

अक्षरशः खरय हे.
भावना ज्या आवेगांनी अनुभवास येतात त्याच आवेगाने लिहीता येणे फार थोड्यांना साधते. ते तुम्हाला साधले आहे.

लिखाण आवडले. वाचून आनंद झाला.

तुम्ही आणि पिलू दोघांच्याही आयुष्य़ात अशाच सशक्त समजदार अनुभवांची भर सतत पडत राहो हीच शुभेच्छा!

Ninad Kulkarni म्हणाले...

आई
आ म्हणजे आत्मा व इ म्हणजे ईश्वर
तुझ्या लेखनातून आई ह्या शब्दाची महती व मुलांच्या आयुष्यात आईचे स्थान किती महत्वाचे असते ते ठळकपणे जाणवते.
अवांतर
तुझ्यातील कवियत्री तुझ्यामधील लेखिकेवर थोडासा अन्याय करते असे मला वाटते. म्हणजे तू लिखाण कवितांच्या तुलनेत जास्त करत नाही.
कारण कवितेइतकेच तुझे लेखन कसदार व रसाळ आहे. तेव्हा असेच सुंदर अनुभव वाचायला मिळोत हिच अपेक्षा

Page copy protected against web site content infringement by Copyscape