रविवार, १९ एप्रिल, २००९

शीत कणग्या ..

काय!!!! समजलं नाही ना, नक्की काय नाव आहे लेखाचं??
सांगते.
मित्रहो,
बर्‍याच वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण ३० एक वर्षापूर्वी, दूध नासण्याचे प्रकार फार होत होते. मग गृहीणी, बाया-बापड्या, नोकरदार स्त्रीया दूधाचं विरझण लावायच्या आणि मग नंतर त्याचं ताक, लोणी शेवटी तूप. घरात माणसंही भरपूर होती.. आणि डायटींगची ओझी नसल्याने "अरे घे रे भरपूर तूप" असं सर्वसाधारण प्रकृतीच्या माणसाला आग्रहाने सांगितलं जायचं. केवळ दूधाचंच नव्हे.. तर भाज्या, फळे, आमटी.. तोंडीलावणी. या सगळ्याचीच सांगता कामवालीला देऊन, नाहीतर थलीपीठात बेमालूम पणे घालून नवा पदार्थ बनवण्यात व्हायची. .. ताक जास्त असेल तर परसातल्या कढिलिंबाला मिळायचं. एकूण काय.. तर घरातला पदार्थ खराब होऊ नये.. आणि झालाच तर बागेला खत.. अशी एकूण परिस्थिती होती. सगळीच खुश होती. घरातली माणसं, बागेतली झाडं, कामवाल्या ...

पण अचानक माणसाच्या भुक्कड डोक्यातून एक कल्पना बाहेर आली आणि बघता बघता रेफ्रिजरेटर नावाचा बर्फाळ प्रकार घरात आला. तो आला काय... आणि सगळीकडे हाहा:कार उडाला. मोठमोठ्या जाहीराती... व्होल्टास काय, बिपिएल काय.. ऑल्विन काय!! बघता बघता सगळीकडे फ्रिज फ्रीज फ्रीज!!! मग त्यात नवे नवे मॉडेल्स.. मोठ्ठा.. लहान.. डबल डोर... सिंगल डोर! त्यातही मग.. दूध ठेवण्यासाठी वेगळी जागा, बर्फासाठी ३-४ ट्रे.. अंड्यांसाठी वेगळी जागा.. भाजीसाठी त्यात सुद्धा फळ भाज्यांसाठी वेगळा कप्पा स्लायडिंगवाला, बाकी भाज्यांसाठी वेगळा कप्पा... एकूण काय कप्पेच कप्पे! शीत जगातील क्रांती! बायकांचे खास करून नोकरदार स्त्रियांची उत्तम सोय झाली. तो त्यांचा सखा सोबती बनला. आदल्या दिवशी कणिक मळून ठेवणे. भाजी चिरून ठेवणे. चटण्या करून ठेवणे. रवा, मैदा अशा प्रकारात नेमक्या आळ्या-किडे होतात .. तेव्हा या कोरड्या पदार्थांचीही फ्रीज मध्ये वर्णी लागली. इतकेच नव्हे.. तर ज्यांच्या घरी रोजच्या रोज जेवणात दही लागते त्या ४-५ दिवसांचे दही लावू लागल्या. दूध नासण्याचं प्रमाण कमी झालं. आईस्क्रिम्स घरी करता येऊ लागली. त्यात चायना ग्रास, जेलिज यासारख्या पदार्थांना मागणी येऊ लागली. उन्हाळ्यांत वापरण्या आधी माठाला पोटमाळ्यावरून काढून, धुऊन .. एक दिवस उन दाखवण्याचा त्रास कमी झाला. बर्फाचं आकर्षण खूप होतं तेव्हा. लिंबू सरबतात, कोकमच्या सरबतात, अलगद उसळणारा तो बर्फाचा चौकोन पिण्या आधीच मनाला उल्हासीत करू लागला. तर अशा या फ्रिजने केव्हा घरं आणि मनं काबीज केली हे त्याला स्वतःलाही समजलं नसावं. आणि बघता बघता तो घरातलाच एक होऊन गेला. घरात एखादं माणूस कमी असलं तरी चालेल.. पण फ्रीज नाही!!!!!!!! छे!! काहीतरीच!!!

आमच्या घरी फ्रीज आला तो मी ५ वर्षाची असताना. .. आणि आला तो पिस्ता रंगाचा व्होल्टास चा. त्यावेळी खरंच त्याचं इतकं आकर्षण होतं..मी थाटात सगळ्या मैत्रीणींना जाऊन सांगून आले होते. दूध, दही, फळं.. बर्‍याच गोष्टी मग त्यात विसावू लागल्या. हळूहळू त्यातली नवलाई संपली. कोपर्‍याकोपर्‍यावर दिसणार्‍या टेलिफोन बूथ प्रमाणे घरोघरी फ्रीज दिसू लागले. टिव्ही वर जाहीराती बघून नवा फ्रीज घेण्यासाठी आधीचे फ्रीज विकले जाऊ लागले. आणि यातूनच कामवाल्यांच्या, वॉचमन , माळी.. अशा लोकांच्या घरातूनही फ्रीज दिसू लागले. त्यातलं नाविन्य कमी होऊन, तो फ्रीज अन्न साठवण्याचं साधन कधी बनला समजलंही नाही. पूर्वी धान्याच्या कणग्या असयाच्या तसं आता शिजवलेल्या अन्नाच्या शीत कणग्या झाल्या. भारतात इतक्या प्रकारचे फ्रीज पाहून झाल्यावर जेव्हा अमेरिकेतली शीत अलमारी/तिजोरी पाहिली तेव्हा तोंडात बोटं.. आपलं ...बर्फ घालायचा बाकी होता फक्त! काय तो दांडगा फ्रीज!!

मित्रहो, फ्रीज अमेरिकेतला असो.. की भारतातला.. त्याचा भारतीय पद्धतीचा वापर मात्र गृहीणिंनी अगदी पुरेपूर केला. दूध, दही, वाडग्यात काढलेली भाजी, आमटी, सरबते...
फ्रीज जितका मोठा, तितकी जास्त जागा, तितके जास्त कप्पे आणि मग तितके जास्त वाडगे. घरातली माणसांची संख्या जशी कमी झाली.. त्रिकोणी-चौकोनी कुटुंबाच्या आवडी षटकोनी, सप्तकोनी झाल्या. त्यातच भारतीय असे निगुतीने करण्याचे पदार्थ चितळें सारख्या गोड लोकांनी फ्रीज करून देण्यास सुरूवात केली. मग काय, त्या फ्रीज च्या कप्प्यांमध्ये श्रीखंड आम्रखंड, बासुंदी, रस मलाई, गुलाब जाम यांची भरच पडत गेली. "मी घरी ना नेहमी आम्रखंडाचा डबा ठेवतेच, अचानक आलं कोणी तर गोड काय करायचं असा प्रश्न पडत नाही.." अस्सं अगदी अभिमानने सांगता येऊ लागलं. (बोंबलायला, पुण्यासारख्या गावांत अचानक येण्याचे असे प्रकार किती??, त्यातून जेवायला येण्याच्या शक्यता किती आणि.. आलेल्याला जेवूनच जा चा आग्रह असा तो किती!!!). पण तरीही अभिमान तो अभिमान! ठरवून कोणी आलंच जेवायला तर, "आदले दिवशीच मी गुलाब जाम करून ठेवले होते.. नाहीतर फार हेक्टीक होतं गं" असंही सांगता येऊ लागलं. त्यातच जर, फ्रीज जर महागडा आणि अगदी नविन मॉडेल असेल तर त्यातल्या एका कप्प्यात जेली, पुडिंग.. असं काहीसं करून "डेसर्ट मी घरीच केलंय" असा भावही मारता येऊ लागला. मग जेवायला आलेल्या जोड्या मधली 'ती'.. "अय्या हो... कसं केलंस गं?" असं म्हणायचा आवकाश की, "तुमच्या फ्रीज मध्ये ****** सोय आहे का? " नाहीये... ओह! मग नाही होणार.. त्यासाठी **** ही सोय असावी लागते" असं म्हणत आपला फ्रीज किती कॉस्टली आहे हे ही नमूद करता येऊ लागलं. या फ्रीज चा महिमा तरी कित्ती वर्णावा! काय काय नसतं हो त्यात?? ४-५ दिवसांच्या थोड्या थोड्या राहिलेल्या भाज्या, २-३ प्रकारच्या आमट्या, उकडलेले बटाटे, टॉमॅटो, भाजी, दूध, दही, ताक, (कधी कधी पिवळं पडलेलं) लोणी. कस जाऊ नये म्हणून ठेवलेली पिठं, लिंबाच्या फोडी, चिरलेली कोथिंबीर, मळून ठेवलेली कणिक, (कधी कधी काळी पडलेली) कणिक, उसळी... लेवाड्या पडलेल्या मिरच्या, सुकलेलं आलं... नोकरदार स्त्रीयांसाठी फ्रीज म्हणजे खर्‍या अर्थाने अन्न साठवण्याचं गोदाम असतं. सोमवार ते शुक्रवार वाडग्यांमध्ये भर पडणार आणि विकेंडला म्हणजे शनिवार्-रवीवारी त्या वाडग्यांमधून काही खाण्या लायक असेल तर ठीक नाहीतर सरळ कचरा पेटी दाखवणे. शिळोपा साजरा करणं म्हणजे उरलेल्या अन्नातून थोडंफार वापरणे आणि उरलेलं कामवालीला देणे.. ! तसंही आजकाल शनिवार रवीवार घरात अन्न शिजवणे हा गुन्हाच समजला जातो. त्यामुळे शुक्रवारीच त्या शिळ्याची विल्हेवाट लावणं महत्वाचं असतं. एकूण काय तर फ्रीज हा शीत गोडाऊन असतो असं म्हंटलं तर वावगं ठरू नये.

सगळ्यांत महत्वाचं असतं ते फ्रीज स्वच्छ करणे. कित्येक वेळेला, आमटी भाजी फ्रीज मधून काढताना सांडते, लवंडते.. एखादा थेंब सांडतो.. फ्रीज ज्या दिवसी काढला जातो... त्यावेळी त्याचे प्रत्येक कप्पे स्वच्छ करणे म्हणजे काढून स्वच्छ करणे हे तान्ह्या मुलाला आंघोळ घालण्यासारखे असते. कोमट पाण्याने धुऊन घेणे.. एक्स्पायर झालेले मसाले टाकून देणे, पालेभाज्यांच्या काड्या, पाने सुकून चिकटून बसलेली असतात ती काढून टाकणे, सांडलेले थेंब साबणाच्या पाण्याने पुसून घेणे. फ्रीजचं दार लख्ख करणे.. की मग व्वा!! आपल्याच कामावर खुश! नेमकं हे काम शुक्रवारी करायचं म्हणजे (हुश्श दमले बाई!!म्हणत) रात्रिचे जेवण बाहेर करण्याची नांदी आधीच घरच्यांना देता येते. पुढचे २ आठवडे फ्रीज ला काहीही डाग पडू न देता काम सुरू असतं. काही जास्त उरू नये, फ्रीज मध्ये गर्दी होऊ नये, आमटी -भाजी सांडू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते आणि त्यानंतर मात्र पुन्हा फ्रीज नक्षीदार होऊ लागतो. सजू लागतो.

दोस्तांनो, अमेरिकेत फ्रोजन प्रकार खूप जास्ती आहे. भारतीय दुकानातून फ्रोजन पराठे, रेडी टू इट भाज्या, डोसे, कटलेट्स.. असे कित्येक भारतीय प्रकार गोठवलेल्या रूपात मिळतात. इथल्या फ्रीजचे फ्रीजरही मोठ्ठाले असतात. कोणाही भारतीय कुटुंबात गेलात तर फ्रीजर मध्ये असे पराठे, भाज्या नक्की दिसतील. भारतीय पदार्थच नव्हे, पण फ्रेंच फाईस, चिकन नगेट्स, फिश स्टिक्स, आणखी बरेच पदार्थ या फ्रीजर मध्ये असतात. कित्येक अमेरिकन घरातून केवळ फ्रोजन अन्न माय्क्रोव्हव करून खाणे हीच पद्धत असते. (म्हणूनच फ्रीज इथे ढम्माले असावेत) इथे ही पद्धत असल्यामुळेही असेल पण भारतातून आई-वडील येतात त्यावेळी, एकेकट्या राहणार्‍या आपल्या मुलासाठी ती आई जाताना किमान पुढे आठदिवस तरी त्याला घरचे अन्न मिळावे या मायेने, ती वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून हवाबंद डब्यात घालून फ्रोजन करून ठेवून देते. बायको-मुले भारत वारीला निघाली की, एकट्या राहणार्‍या त्या नवर्‍यासाठी तीही असंच काहीबाही करून फ्रीज करून ठेवते... नाही म्हंटलं तरी, प्रेम्-माया य गोष्टी सुद्धा फ्रीजमध्ये साठवल्या जातात आपोआप. हो ना?

- प्राजु

2 प्रतिसाद:

Unknown म्हणाले...

अप्रतिम.! अगदी मनांतील बोललीस.! मी अगदी १००%सहमत आहे तुझ्याशी. स्वानुभव.! दुसर काय.! अस्साच एक उत्तम जेवणाच्या भोक्त्यांचा मोठा शत्रु गेल्या कित्येक वर्षां पासून स्वैपाक गहरा मधे घुसलेला आहे. तुमचा प्रेशर कूकर हो.! त्याबद्दलही लीही काही.teamp

Unknown म्हणाले...

अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे..?
रीसेंट्ली, मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला " क्विलपॅड " /
आप भी "क्विलपॅड" www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

Page copy protected against web site content infringement by Copyscape