गुरुवार, २६ फेब्रुवारी, २००९

पराठा किंवा तिखट पुरणपोळी.. ;)

नमस्कार मित्रहो..
असं म्हणतात की, तहान लागली की, विहिर खोदण्यापेक्षा आधीच पाण्याची सोय करून ठेवावी. छे! पण माझं इतकं कुठलं डोकं चालायला! आधी उल्हास त्यात फाल्गुन मास.. म्हणजे आधीच बर्न फूड स्पेश्शालिस्ट त्यात लेकाचा डबा.. काय करणार? करा इनोवेशन्स.मी आणि माझी एक मैत्रीण .. दोघी नेहमीप्रमाणे आपापले रडगाणे गात होतो.. की, मुलांना डब्यात काय काय द्यायचं. माझ्या परीने मी माझा प्रश्न सोडवला होता. म्हणजे ५ दिवसांपैकी, २ दिवस तूप सारख पोळी चा रोल, २ दिवस पालक, मेथी, अशा भाज्या घातलेल्या पुर्‍या आणि एक दिवस ब्रेडचं सँडवीच. पण हा जळ्ळा इथला ब्रेड टोस्ट केल्याशिवाय खावासा वाटतच नाही. त्याचं सँडवीच केलं की, खातना हमखास टाळ्याला चिकटणार आणि सँडविच नको पण ब्रेड आवर असं म्हणायची वेळ येणार. त्यात माझ्या लेकाचे नखरे. माझ्या म्हणजे माझ्या मैत्रीणीच्याही लेकाचे!
सहज बोलता बोलता मी तिला म्हणाले की, अथर्वला पटेल मध्ये मिळते ती गरम कचोरी खूप आवडते. भलेही पटेल वाला, ती माय्क्रोव्हेव करून देतो पण त्याला आवडते. ती सहजच म्हणाली की, कचोरीचं स्टफिंग थोडासा फरक करून त्याच्या पराठा करून द्यायला हरकत नाही.झालं!!!!!!!!! हे बोलणं झालं आणि माझ्या डोक्यात चक्र सुरू झाली. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला सारखी मी आले स्वयंपाकघरात. माझं स्वयंपाक घर खर्‍या अर्थाने प्रयोग शाळा आहे. म्हणजे तिथे इतके प्रयोग सुरू असतात, एखाद्या शस्त्रज्ञ काय करेल त्याच्या लॅबमध्ये!
तर.. आता हा पराठा कम तिखट पुरणपोळी.. करणार असाल तर स्वतःच्या जबाबदारीवर.
कणिक - २ कप
मूग डाळ १ कप
बडिशेप - १ चमचा
मीठ, धणे जीरे पावडर - १ चमचा
गरम मसला - १ चमचा
आमचूर पावडर १ चमचा .. नसल्यास चिंचेचा कोळ १ चमचा.
गूळ - सारण ज्याप्रमाणात गोडसर हवे आहे त्याप्रमाणात अथवा साखर २ चमचे.
तेल.तवा, फ्राईंग पॅन, पोळपाट लाटणे.

१. मूगाची डाळ सुट्टी शिजवून घ्यावी. ती गरगट्ट नाही झाली पाहिजे. पाणी जास्ती असल्यास निथळत ठेवावी.
२. पॅनमध्ये, थोडे तेल घालून फोडणी करावी. फोडणीत बडीशेप, जीरे, ओवा, कढीपत्ता, हळद, हिंग घालावे. त्यात मूगाची शिजवलेली डाळ घालावी. ती ओलसर असेल.. त्यात मीठ, गरम मसाला, गूळ, चिंचेचा कोळ अथवा आमचूर पावडर घालावी.
३. हे मिश्रण आता हळूहळू शिजू लागते आणि डाळ मोडू लागते. आणि ते कोरडे होते. साधारण कोरडे झाले की, गॅस बंद करावा. ते पूर्ण गार झाले की, ते व्यवस्थित कोरडे होते.
४. हाताने सारखे करून घ्यावे.
५. कणिक, २ चमचे तेलाचे मोहन घालून, थोडी हळद, मीठ घालून घट्ट मळून घ्यावी. सैल असू नये. दहा मिनिटे कणिक झाकून ठेवावी.
६. आता कणकेच्या पारीमध्ये वरील सारण भरून पोळी लाटावी.
७. तव्यावर दोन्ही बाजूनी तूप्/तेल सोडून खरपूस भाजून घ्यावी.
८. सारणात कांदा बारिक चिरून घातला तरी छान लागेल..

हाच तो जगप्रसिद्ध पराठा..


सारण कोरडे असल्याने या पोळ्या ४-५ दिवस तरी अगदी छान टीकतात. प्रवासाला नेता येतील. मात्र त्यात कांदा घालू नये.
तर माझ्या ताई आणि मैत्रीणींनो.. नक्की करून बघा. तुमच्या पिल्लाला डब्यात काय द्यावे असा प्रश्न असेल तर एकदिवसाचा तरी हा प्रश्न मिटेल हे नक्की.
माझ्या दादा, काका आणि मित्रांनो.. तुम्हीही तुमच्या अन्नपूर्णेला (आई, पत्नी, बहीण, मुलगी) अगदी जरूर करायला सांगा आणि स्वतःच करत असाल तर नक्की करून बघा.माझ्या प्रयोग शाळेतले प्रयोग नेहमीच टाकाऊ नसतात याचा प्रत्यय मला आला... जेव्हा माझ्या लेकाने अगदी आवडीने हा पराठा खाल्ला.
- प्राजु

2 प्रतिसाद:

Unknown म्हणाले...

मला अथर्वचा हेवा वाटतो.
आवडीने खाणार त्याला प्राजू देणार.!तुझ्या उपक्रम शीलतेला आणी कल्पकतेला सलाम!
ही कचोरीच आहे."पराठा रुपी कचोरी."
फ़क्त त्यांत कांदा बारीक चिरून ( की कीसून ?) घालण्याची कल्पना तेव्हाधीशी रुचली नाही.

shekhar म्हणाले...

प्राजू ताई आपल्या अकल्पित ,आणि वादळ कथा वाचल्या
दोन्हि क़थांचा धक्कादायक शेवट एकदम अनपेक्षित.

ठेवणीतले आवाज,हू एम आय!,डोळे हे जुलमी गडे.
फ्लाईंग टू यु.एस हे लेख पण छान.
वाचून वेगळे वाचल्यासारखे वाटले.



ता. क.

तुमचा अथर्वला बघून मला माझ्या भाच्याची-अनीश ची आठवण झाली,
दोघे ही एकदम सारखेच दिसतात !

Page copy protected against web site content infringement by Copyscape