शुक्रवार, २१ मार्च, २००८

फुलराणी...

इवलिशी कळी
दवांत निजली..
चिंबचिंब भिजली
लाजेत थिजली...

पाहूनी तिजला
भ्रमर सावळा
आळवित जाई
राग आगळा....

प्रेम तिजवर
जडले तयाचे
नियम त्याने
मोडले जगाचे...

रूणझुण त्याची
वेड लावती
गंधित होई
वेडी कळी ती..

लाल गुलाबी
रंग कोठला
केशरी अबोली
अंतरी दाटला...

फुलविण्या तिला
झपाटला तो
सुंदर फूल हे
म्हणतो जो तो...

राजकुमारी..ती.
येई हासत
फुलांस त्या मग
नेई सोबत...

भ्रमराची त्या
मग प्रेमकहाणी
फुला विना त्या
झाली विराणी

बागेमधूनी
शोधित त्या फुला
फिरतो वेडा
भ्रमर एकला.. भ्रमर एकला....

- प्राजु.

Page copy protected against web site content infringement by Copyscape