सोमवार, ७ एप्रिल, २००८

लोणचं..

नाही हो... मी कोणत्याही लोणच्याची रेसिपी इथे देणार नाहिये. तेव्हा लोणचं प्रेमींनी इतके आनंदी होण्याचं काहिही कारण नाही. खरंतर, लोणचं हा विषयच असा आंबट, तिखट आणि चमचमीत आहे ना की नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लोणच्याबद्दल काही लिहिण्यासारखं असं विशेष नाही. पण तरीही लोणचं मला नेहमीच लोणच्यात म्हणजे कोड्यात टाकत आलं आहे. कारण,जर किती प्रकारची लोणची असतात असं विचारलं.. तर आंब्याचं, लिंबाचं, मिरचीचं, मिक्स भाज्यांचं.... अशा अनेक प्रकारची लोणची असतात. पण लोणच्याचे प्रकार किती असं विचारलं तर... ते ही अनेक आहेत. म्हणजे, महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, पंजाबी, राजस्थानी, काश्मिरी.. आंध्राकडचे.. आणि आजकाल खाते ते पिकल...बरेच म्हणजे अगदी बरेच... हे प्रकार तोडिसतोड चवदार असतात हे महत्त्वाचे.

पंजाबी लोणच्यात कचालूचे लोणचे म्हणजे अप्रतिम. हा कचालू नक्की काय प्रकार असतो ते मला आजर्यंत समजले नाही. याची चव कैरी सारखी दिसते ही कैरी सारखे.. पण कचालू.. तसेच पंजाबी मिक्स लोणच्यामध्ये अननसाच्या कापासारखा दिसणारा (अगदी छोटा काप) एक प्रकार असतो. चवीला आंबट तिखट असतो त्याला नक्की काय म्हणतात हे ही आजपर्यंत मला समजलं नाहि. राजस्थानी लोणच्याची चव न्यारीच. भरपूर मोहरीची डाळ घातलेले, लाल-लाल तेलात आणि बडीशेपेची खमंग चव असलेले लोणचे. त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटावे. आंध्रा कडचे लोणचे म्हणजे हिंगाचा उग्र वास नाकात भरलाच पाहिजे. मोठ्या कैरीच्या फोडी, मेथीचे दाणे, मोहरीची पावडर, रंग थोडासा काळपट लाल आणि हिंगाचा दमदार वास... साधारण दक्षिण भारतीय लोणच्याचं असं वर्णन करता येईल. टोमॅटोचं लोणचं , चिंचेचं लोणचं हे ही प्रकार खासच. आंध्राकडे लाल आंबाडीचं लोणचं मिळतं . लैच झ्याक...! लाल आंबाडीची भाजी उन्हात सुकवून, त्यात बरेच मसाले घालून ते लोणचं बनवतात. आईची सख्खी मैत्रिण (बेस्ट फ्रेंन्ड हो..)आंध्राची असल्याने हे लोणचं बर्‍याचदा खाण्यास मिळायचे. गुजराथी लोणच्यांमध्ये भोकराचं लोणचं. हा भोकरं प्रकार इतका मजेदार असतो, दिसताना ते मोठ्या कच्च्या करवंदाप्रमाणे आणि आतून आंब्यासारखी कडक बाठ असते. चवीला एकदम फन्डू. तसेच कैरीचा छुंदा.. कैर्‍या खिसून केलेला प्रकार मस्तच. काश्मिरी ड्रायफ्रुट्सचं लोणचं... त्याला येणारा केसराचा सुगंध.. काश्मिरी पुलावसोबत मस्त लागतं. महाराष्ट्रीयन लोणच्यांमध्ये कैरी चे तिखट, गोडाचे, लिंबू- ते ही तिखट आणि गोडाचे, मिरची-लिंबू, कैरी-मिरची,नुसती मिरची, सिझनमध्ये फ्लॉवर, मटार, गाजर असे मिक्स भाज्यांचं लोणचं,कच्च्या करवंदाचं लोणचं..

माझी आजी (आइची आई) इतक्या प्रकारची लोणची घालायची की, काही विचारू नका. कच्ची पपई, शेन्न्या(हे फक्त मी एकदाच खाल्लं), तिला जमत होते तो पर्यंत इतक्या प्रकारची लोणची खाल्ली तिच्या हातची की त्याला मोजदादच नाही. नेहमीची लोणची तर होतंच होती पण, शिवाय (छोट्या छोट्या कैर्‍यांचं) बाळ कैरीचं लोणचं, तसेच कैर्‍या बारिक चिरून, त्यात तिखट, मीठ, गूळ घालून.. त्यावर हिंग, मोहरी, हळदीची.. खमंग फोडणी घालून केलेले २-३ दिवसांपुरते लोणचे... हे जास्ती टिकत नाही.. अर्थात टिकण्यासाठी उरतच नाही हा भाग वेगळा. माझी आईसुद्धा दर सिझन ला नवं लोणचं घालते. आणि मग तिने केलेल्या लोणच्यावर डल्ला मारून मी बाटलीभर लोणचं इकडे पळवून आणते. एकदा मी बेडेकर की केप्रचा मसाला घालून कैरीचं लोणचं केलं. ते मी सोडून कोणालाही आवडलं नाही हा भाग वेगळा.. पण मी एकदा लोणचं करायचा प्रयत्न केला. आजीला सांगताना ती म्हणाली," कसले, ते मेले बाजारचे मसाले, त्याला ना स्वाद ना रंग.. मिक्सरसारखी उपकरणं आहेत हाताशी.. दळा ना घरी लोणच्याचा मसाला." जातीवंत रेडिओ जॉकी असल्याने बोलण्यात हारणे मंजूर नाही.. मी तिला म्हणाले,"घरी आपल्याला हवा तश्या रंगाचा, हव्या तश्या चवीचा मसाला बनवून कोणीही लोणचं सुंदरच बनवेल.. खरं कौशल्य दुसर्‍यांनी बनवलेला मसाला वापरून उत्तम लोणचं बनवण्यातच आहे. ....... आणि आजी, हा मसालाही घरीच बनवलेला आहे. हां, आता माझ्या घरी नाही पण केप्र / बेडेकरांच्या तरी घरी बनवलाच असेल ना!!" माझा अवखळपणा समजून आजीने "शहाणी आहेस फार!!!" इतकीच टिप्पणी केली..

मला लोणच्याचं वेड इतकं आहे की, कुठे फिरायला म्हणून गेले तरी त्या भागात प्रसिद्ध असलेल्या दुकानात मी पहिल्यांदा नवं लोणचं आहे का कुठलं हेच बघते. सांगलीला कोठल्याशा दुकानातून मी लसणीचं लोणचं आणलं होतं. ते मात्र मला विशेष आवडलं नव्हतं. दिल्लीला गेले होते तेव्हा, रूपक या जगप्रसिद्ध लोणच्याच्या दुकानातून मी ते कचालूचं आणि त्या अननसासारख्या दिसणार्‍या प्रकारचं लोणचं मी आणलं होतं. माझ्या या वेडापायी इथे अमेरिकेत आल्यावरही दुकानातल्या आइल्समधून फिरताना पिकल्स असे लिहिलेल्या बाटलीत व्हिनेगर मध्ये उभ्या ठेवलेल्या छोट्या काकड्या, वेगेवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या, ऍलॅपिनोज.. बघून हे नक्की कसं लागतं हे पाहण्यासाठी मी तेही घेऊन आले. आणि पोळी बरोबर खाताना पदरी जी निराशा पडली ती पचवणे कितीतरी दिवस शक्य नाही झाले. मग समजले की ही पिकल्स सँडविच मध्ये घालतात.. पण आधी पोळीसोबत खाताना, या अमेरिकनांची किव आली. या असल्या पाणचट पदार्थाला पिकल म्हणतात??? भारतीय पिकल खाल्लं तर यांची वाटच लागेल. नवर्‍याच्या ऑफिसमध्ये एकदा तो आम्ही भारतातून आणलेली चितळेंची बाकरवडी घेऊन गेला. त्याच्या फिरंगी मित्राने ती खाऊन डायरेक्ट बाथरूम गाठले. "ओह... दिस इज डायनामाईट....!!" असं म्हणाला. बरं तर बरं त्याने नवर्‍याला सू नाही केलं.. (बाथरूम मध्ये जाऊन केलं असेल कदाचित).

लोणचं घालणे हा प्रकार तसा जिकरीचाच. मला स्वतःला ती मसाल्यांची भाजा-भाजी, परता-परती.... मग दळणे... चाळणे.. हे असले प्रकार अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे केप्र्/बेडेकरांनी कष्टाने केलेली लोणचीच आणलेली बरी. त्यात आता मदर्स रेसिपी आली... मग काय (कोणाच्या तरी)आईच्या हातची लोणची. लोणचं घालणे "त्या" अनुभवावरून मी बंद केले ते बंदच.. लोणचं घालणे हा वाक्प्रचार म्हणूनच जास्ती वापरला जातो. लहान असताना एकदा मी आजोबांच्या बरोबर नदिवर गेले होते तेव्हा तिथुन बरेच पेबल्स (सागर गोटे की गारगोटे.. तेच ते) घेऊन आले होते. तेव्हा आजी म्हणाली होती, "इतकी कशाला दगडं आणलीस ही.. आत याचं काय मी लोणचं घालू?" तेव्हा पहिल्यांदा मी हा वाक्प्रचार ऐकला, आणि तो जाम आवडून गेला अगदी लोणच्या इतकाचं. त्यानंतर.. मी स्वतः लोणचं घालत नसले तरी याचा प्रयोग मात्र बोलण्यात सर्रास करू लागले. आणि कॉलेजमध्ये तरी..कोणत्याही विषयावर चर्चा करणे म्हणजे लोणचं घालणे असा प्रचलित झाला. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर, " सध्या विद्या आणि कुसुम कॉलेजच्या एलेक्शनचं लोणचं घालत बसल्या आहेत" ...

आता लोणचं या विषयावर लोणचं घालतानाही मी आज संध्याकाळी पटेल फुड्स मधून कोणतं नवं लोणचं आणावं याचं लोणचं माझ्या डोक्यात घालते आहे...:))))

का हो डोक्याचं लोणचं नाही ना घातलं मी तुमच्या????
- प्राजु

2 प्रतिसाद:

Mints! म्हणाले...

शेन्न्या che loNache ha agadi khaas kolhapur bhagatala prakar. tasech maaIn muLyache loNache ahaha -
loNachyaitakach chavadaar lekh!

Jaswandi म्हणाले...

waah, tondala paani sutlay!!
mala south-indian lonachi faarashi nahi awadali.. pan gujrathi-rajsthani lonachi sollidd astat!
mala lonachi vargatale "takku" ani "chhunda" he prakar pan khuuup awadatat.. aajch aaichya maage lagate kairya aanayla :)
mast lihilays!! :)

Page copy protected against web site content infringement by Copyscape