रविवार, १६ मार्च, २००८

एकाकी चाफा..!

कात्रज च्या घाटातून जात असताना मला पांढऱ्या चाफ्याचे झाड दिसले. त्याला खूप फुले लागली होती पण एकही पान दिसत नव्हते. मी नेहमी पाहिलेला पांढरा चाफा असा मला पानांशिवायच दिसला आणि पाने असताना झाडाला फुले नव्हती. हेच कवितेत मांडायचा प्रयत्न केला आहे मी.

काय म्हणता माझे नाव
चाफा म्हणूनी वदती सर्व
जात कुळी मध्ये मी एकला
पांढरा चाफा म्हणती मजला

रूप माझे असे की सुंदर
शुभ्र तनू अन नाभी शेंदूर
तारूण्याची लेऊन झालर
एकटेच जग़णे कसला हा वर

जीवन माझे सरता सरता
बहरून येतील वसंत-वर्षा
नवी विरूधा जन्म घेईल
उजळून निघतील दाही दिशा

साथसंगत सोडली त्यांनी
पानगळ आली म्हणोनी
खराट्यावरचे फूल होऊनी
काय पावलो जन्मा येऊनी

वाटते मग असेच करावे
जीवन आपुले सार्थ करावे
उतरूनी अलगद फांदीवरूनी
शिवचरणी त्या अर्पित व्हावे...

- प्राजु.

* इथे विरूधा म्हणजे नवी येणारी पालवी.. विरूध हा संस्कृत शब्द आहे.

Page copy protected against web site content infringement by Copyscape