रविवार, १६ मार्च, २००८

मी आणि माझा "संत ज्ञानेश्वर"

काही दिवसांपूर्वी मला इप्रसारणवर स्वरसंध्या या कार्यक्रमात "संत ज्ञानेश्वर" या विषयावर कार्यक्रम करायचा होता. तसं पाहिलं तर आम्ही(आदरार्थी एकवचन) पुणे आकशवाणीवर अक्कल पाजळत होतो आणि शब्दांचे कारंजे उधळ होतो. पण तिथे होणारे कार्यक्रम हे केवळ बाल बुद्धिशी निगडीत असत. त्यामुळे "संत ज्ञानेश्वर" या सारख्या गंभिर विषयावर कधी बोलण्याची वेळ आली नाही. तसे इप्रसारणवर इतके दिवस मी केलेले कार्यक्रम म्हणजे गीतकार, संगितकार किंवा गायक , एखादा अभिनेता यांच्याशी संबंधित होते. पण अध्यात्माची जोड असेल असा कार्यक्रम मी केलेला नव्हता. तेव्हा हे शिवधनुष्या पेलायचे असा निर्णय मी घेतला.
माझ्या एकूणच लेखनाच्या शैलीकडे पाहून कोणालाही सांगितले तर पटणार नाही की आमच्या मातोश्री एक प्रख्यात लेखिका , कवयित्री आहेत. आणि ज्ञानेश्वरी सारख्या गहन विषयावर उत्तम प्रवचनही करतात आणि इतके असूनही आजतागायत मी तिच्या एकाही प्रवचनाला उपस्थिती लावू नये ..... याला म्हणतात करंटेपणा..! लोकांकडून ऐकायला मिळायचे की आई सुंदर बोलते ज्ञानेश्वरीवर.. असो. तर आता माझ्यापुढे प्रश्न होता ज्ञानेश्वरांबद्दल १ तास बोलता यावे इतकी माहिती कुठून आणायची?शाळेत असताना एकदा वक्तृत्व स्पर्धेला विषय होता "संत ज्ञानेश्वर".. तेव्हा जोरदार भाषण करून पहिला नंबर मिळवला होता पण तेव्हा माझे वय वर्षे १२ होते. थोडे फार आठवत होते त्यातले. एकतर ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रसंग जसेच्या तसे रंगवून सांगणे म्हणजे लोकांना जे माहिती आहे तेच पुन्हा सांगून त्याना पिळणे. आणि हे प्रसंग सगळ्यांनी सिनेमातून, प्रा. राम शेवाळकरांसारख्या प्रख्यात प्रवचनकाराकडून सरस वाणीत ऐकले असणार.. त्यामुळे माझ्या रटाळ वाणीतून ते मी सांगू लागले तर रेडिओ वरचा तो माझा शेवटचा कार्यक्रम असण्याची शक्यताच जास्ती. :(( त्यामुळे पहिल्या १० मिनिटांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील ..त्यांच्या माता-पित्याची देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेणं, पाठिवर मांडे भाजलेला प्रसंग , रेड्यामुखी वेद वदवलेला आणि चांगदेव भेटीसाठी भिंत चालवलेला .. असे प्रसंग .. हे सगळे अगदी मन लावून लिहिले .. वा वा वा.. एकदम भारी झालं..

आता पुढे पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली आणि लतादिदी आणि आशाबाईंनी गायलेली एकूण ११ गाणी/अभंग मी निवडले. त्या गाण्यांचा अर्थ थोडा सांगायचा आणि ते गाण लावायचं... हे असंच मला करायचं होतं. पण त्यासाठी थोडीफार ज्ञानेश्वरी बद्दल वाचन असणे आवश्यक होते.. इथेच आडलं सगळं. आंतरजालावर शोधावे म्हणून गुगलेआझम्(गुगल सर्च) ला आमंत्रित केले. त्यावर बर्‍याच ज्ञानेश्वरि संदर्भात साईट्स मिळाल्या. पण हाय रे कर्मा...! सगळे विंग्रजी... पुन्हा घोडं आडलं. इन्स्टंटच्या जमान्यात हे सगळे वाचायचे आणि ते मराठीत.. तेही अध्यात्मिक भाषेत अनुवादीत करायचे म्हणजे... छे..छे..! मी इतिहासाबद्दल गाढा अभ्यास असणार्‍र्या प्रियाली ताईंना फोन केला. पण त्यांनी मला जो सल्ला दिला.. तो ऐकून मी आणि प्रियाली दोघीही हसायला लागलो. प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही. तर त्या काकांना मी फोन करणं म्हणजे माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासारखं होतं. तो विषय तिथेच राहिला. आमच्या मतोश्रींना फोन करून गप्पा झाल्यानंतर ज्ञानेश्वरीबद्दल थोडं सांग असं सांगणं म्हणजे १० डॉलरचे कॉलिंग कार्ड एका दिवसांत संपवणे.. कसे परवडावे??? तरीही मी फोन केलाच. आईला म्हणाले की, त्या गाण्यांबद्दल थोडे सांग आणि ज्ञानेश्वरीबद्दलही. तिचे उत्तर, " ज्ञानेश्वरीबद्दल प्रवचन करायला अख्खा दिवस सुद्धा पुरत नाही तिथे तुला १० मिनिटांत काय सांगू?" तरीही तिने २-३ गाण्यांचा जुजबी अर्थ सांगितला आणि म्हणाली," हे बघ, ती गाणी समोर ठेऊन.. पुन्हा पुन्हा वाच.. आणि मनापासून वाच.. तुला अर्थ कळू लागेल. आणि तू सुद्धा सुंदर कविता लिहितेस(मी फ्लॅट्च्...)तुला अर्थ नक्की समजेल..." म्हणजे आता १०-११ गाणी..प्रत्येक गाणे किमान ११ वेळेला वाचणे आले. इंन्स्टंटचे माझे ते स्वप्न पार धुळीला मिळाले...
पण आता मी ठरवले की या गाण्यांचा अर्थ अगदी नीट समजून घ्यायचा. आणि आईने जो जुजबी अर्थ सांगितला होता त्या अनुषंगाने विचार करत ती गाणी वाचू लागले. हळू हळू अर्थ उलगडत होता. मी त्या गाण्यांच्या अभ्यासात इतकी गढून गेले कि... बाकी सुद्धा वाचण्यासारखे बरेच काही असते हेही विसरून गेले. सलग ३ दिवस.. गाणं वाचायचं प्रत्येक कडव्याचा पहिल्यांदा लागलेला अर्थ लिहून काढायचा.. पुन्हा ३-४ वाचना नंतर लागलेला अर्थ आणि पहिला अर्थ यात पुन्हा थोडा गोंधळ.. असे चालू होते. आणि..........

एका रात्री अचानक.. संत ज्ञानेश्वर आले. मला म्हणाले, "प्राजक्ते(मुक्ते सारखं ),........ अगं रडू नको.. इतकी गोंधळून जाऊ नको. मांडे भाजण्यासाठी मुक्ता अशीच रडत होती पण शेवटी तिला जे हवे होते ते तिला करता आलेच.. " मी उठले..मी कुठे आहे ते पाहिलं ...बेडवरच होते(नशिब!). हे नक्की काय होतं , स्वप्न की भास? झोप उडाली. लिहायला बसले. आणि यावेळि समोर होतं "पसायदान".. अचानक प्रा.राम शेवाळकरांचे पसायदानावरील प्रवचन कोण्या एका मैत्रिणीच्या घरी चकाट्या पिटतांना बॅकग्राऊंडला कॅसेट प्लेअरवर चालू होते ते आठवले. थोडे फार आठवले... आणि त्यावर लिहितांना पुढे पुढे.. बहुतेक संत ज्ञानेश्वरच माझ्या हातून लिहित आहेत की काय असा भास होऊ लागला. सकाळी नवरा उठला. शनिवार होता .. सुट्टी होती. मला म्हणाला "खायला काय करणार आहेस?".. एरवी शनिवार्-रविवार महाराष्ट्रीयन अन्नाला "नो" (नवर्‍याला आवडत असून सुद्धा) म्हणणारी मी म्हणाले ,"तुला काय हवं सांग ..पोहे करू की उप्पीट??" नवरा फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होता. मला म्हणाला.. " नक्की काय होतंय आपल्या घरांत? हे असं ?" मी ," जो जे वांछिल, तो ते लाहो." .. मुलाला पसारा घातल्याबद्दल रागावणारी मी, त्याने तुकडे तुकडे केलेले कागद हसत मुखाने आवरत होते.."आई, तू माझ्यावर रागवली नाहीस?" मुलाचा प्रश्न. "अरे, तू लहान आहेस.. तू आता नाही पसारा घालणार तर कधी?".. मी. मुलगा काहितरी विपरीत घडल्याप्रमाणे माझ्याकडे आणि माझ्या आवरण्याकडे बघू लागला. तो संपूर्ण दिवस असा अजिबात न रागवता, न चिडता गेला. काहिअतरी वेगळं निश्चित झालं होतं. मी विचार करत बसले. माझी अवस्था संजय दत्तच्या मुन्नाभाई सारखी झाली. जळीस्थली काष्ठीपाषाणी मला संत ज्ञानेश्वर दिसू लागले. वेळ मिळाला की, कानडावू विठ्ठलू, मोगरा फुलला, अवचिता परिमळू, अरे अरे ज्ञाना झालासि.. अशी गाणी आणि त्यांचे अर्थ समोर दिसू लागत. लागलीच मी लिहायला घेत असे. असे करता करता १०-११ गाणी , प्रत्येक गाणे १०-११ ... छे.. २०-२५ वेळेला वाचून.. अर्थ लिहून झाली. आणि माझं स्क्रिप्ट तयार झालं. हुश्स्श....!
आता रेकॉर्डिंग करायचे होते. ते चालू केले. आधी गाण्यांचा क्रम लावला. त्यानुसार प्रत्येक गाण्याचा अर्थ आणि मग ते गाणे. असे होत सधारण १५-१६ दिवसांत पूर्ण अभ्यास करून तो कार्यक्रम अगदि मला हवा तसा तयार झाला. अध्यात्मिक वातावरणांत असलेल्या माझ्या घराने निश्वास टाकला. कार्यक्रम इप्रसारणला पाठवून दिला. मला आता थोडं हलकं वाटू लागलं.
त्यानंतरच्या लगेच च्या शनिवारी नवरा म्हणाला "मस्त बटाटे पोहे कर नाश्त्याला". मी लगेचच नाक मुरडून म्हणाले ," ह्ह्या.. काहीतरी काय? मी आता मस्त गार्लिक टोस्ट आणि पास्ता इन व्हाइट सॉस करणार आहे. विकेंड्ला कसले पोहे खातोस?" नवरा समजला..'बाईसाहेब मूळ पदावर आल्या अहेत'. मुलाने मला विचारले ," आई, तुला मी मस्त पेंटिंग करून दाखवू?" मी लगेच" कर पण खाली कार्पेटवर पसारा नाही घालायचा, ते रंगीत पाणी सांडेल.. मला चालणार नाही" त्यालाही समजले..ही खरी आई!
माझा कार्यक्रम प्रसारीत झाला. माझ्या आईनेही ऐकला.. आई चक्क ,"किती सुंदर बोललिस तू या गाण्यांवर!" असेहि म्हणाली. इप्रसारणला आलेले फिडबॅकही चांगले होते असे समजले.
एकूण काय मी केलेला माझा "संत ज्ञानेश्वर" कार्यक्रम.... चांगल्या रितिने पार पडला... :))

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape