बुधवार, ३० मे, २०१८

अगदी नकळत!

वयाच्या तिसऱ्या वर्षी .. 
झोपेत असताना मायेने तळपाया वरून हात फिरवत..
“कित्ती नाचत असतं ग माझं पिलू..” म्हणत..
आजीने कौतुकाने पायात चाळवाळे घातलेले..
अगदी नकळत!
सातव्या वर्षी.. सायकल शिकवताना..
बाबांनी अलगदपणे सायकलचा सोडलेला हात..
अगदी नकळत!
लुटुपुटू च्या भांडणात.. दादाने नाकाला काढलेला चिमटा..
आणि मग रुसल्यावर घेतलेला गालगुच्चा..
अगदी नकळत ..!
घट्ट पेडांची वेणी घालत आईने
टोकाशी रीबिनीचे फुलपाखरू करून.. चेहऱ्यावरून हात ओवाळून
घेतलेली आलाबला... आणि कानामागे मोडलेली बोटे..
तीही अगदी नकळत!
आणि मग
कुठल्याश्या नकळतश्या पण भेकड अशा क्षणी..
नशिबाने बदलेला रस्ता.. घेतलेलं भयाण वळण..
आणि मग नुसती ओढाताण.. फरफट.. घुसमट
... कळत नकळतची  !

नेमक काय कळत आणि काय नकळत..!
चाळवाळ्याच्या जागी खुळखुळणारा पैसा
पायावरून.. मांड्यांपर्यंत फिरणारे ओंगळ हात..
सायकल च्या जागी वस्त्रे विलग करणारे हात..
गालगुच्च्या च्या जागी.. चावे घेणारी मद्यधुंद तोंडे
वेणी ला रिबिनीच्या फुलपाखरा ऐवजी... लागणारा मादक गजरा..
सगळंच कस अगदी नकळत..!

आणि आता तर.. मेलेल्या शरीराला, जाणीवांना,
सरावलेल्या शहाऱ्यानाही.. काहीच कळत नाही..!
कोणी आलं काय,  गेलं काय.. झोपलं काय..
कि शरीराशी खेळलं काय!
सगळेच सोपस्कार कसे व्यवस्थित पूर्ण होतात..
अगदी सगळ्यांच्याच नकळत.. !

राजमार्गाने चालणाऱ्या समाजाला सुद्धा
एका कोपऱ्यात लागतात असली यंत्रे..
चालू अवस्थेतली... अगदी नकळत!

-    प्राजू 

मंगळवार, २९ मे, २०१८

वाघीण ..

मातीवरती लहरत होती गहू शाळवाची कणसे
वारा फुंकर घाली आणिक खेळ जरा त्यांचा बिनसे
चालत होती गोंजारत ती कणसांना अलवारपणे
स्पर्शामधुनी फुलवत होती चैतन्याचे नव गाणे

पान्हा पाझरला अन् उठली कळ मायेची त्या हृदयी
व्याकुळ होउन धावत सुटली वेडी रखरखत्या समयी
तिथे दिसेना जीव तिचा त्या हलत्या झुलत्या झोळीतं
खसखस येई कानी कुठुनी सरसरणा-या जाळीतं

कापत जाई निरवतेस आक्रोश कसा इवला इवला
काळीज होइ पाणी पाणी सृष्टीचा श्वासच थमला
क्षणभर केवळ .. भय सरसरले हृदयाचा ठोका चुकला
जागी झाली रणरागिणी अन् धैर्याला पान्हा फुटला

घेउन खुरपे धावत सुटली सळसळत्या झुडपा पाठी
चवताळुन ती चालुन गेली आपल्या तान्हुल्यासाठी
सुरू जाहली तिथे लढाई नरभक्षक त्या वाघाशी
वाघिण होती तिच्यामध्ये जी झगडत होती जिवानिशी

वार किती अन् घाव किती ही मोजदाद होती कोठे
अंगावरती नख दातांचे ओरखडे उमटत होते
घाव लागला वर्मी त्याच्या क्षणात धडपडही शमली
ममतेची घनघोर लढाई प्राणपणाने ती लढली

उचलुन घेता जिवास इवल्या भाव अनावर होताना
घेत मुके आवेगाने त्याला छातीशी धरताना
चंद्र नदी वारा धरतीही क्षणैक पण थबकुन गेली
रक्त सांडले आईचे त्या हिरवाई पावन झाली

- प्राजू 

सौख्याला मी मृगजळ म्हटले

सौख्याला मी मृगजळ म्हटले, .. कुठे बिघडले
अन दु:खाला वाकळ म्हटले .. कुठे बिघडले..

जीव नकोसा करती माझा तुझ्या सयी या
एकांताला वर्दळ/गोंधळ म्हटले .. कुठे बिघडले

येताजाता काळजास फटकारत असतो
मेंदूला मी फटकळ म्हटले.. कुठे बिघडले

आशा नाही ! पण सारे होइल व्यवस्थित
करू जराशी अटकळ म्हटले.. कुठे बिघडले

पपईच्या झाडागत बुंधा होता.. तुटले
नात्याला मी पोकळ म्हटले .. कुठे बिघडले

कळला नाही नया जमाना नवीन नियम
स्वत:स मी गावंढळ म्हटले .. कुठे बिघडले

उभी राहिली पोटासाठी सजून ती अन
तिलाहि मी मग सोज्वळ म्हटले .. कुठे बिघडले


-    प्राजू 

Page copy protected against web site content infringement by Copyscape